विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवंतिवर्मा — काश्मीरचा एक राजा. कर्कोटक घराणें जुनें पुराणें होऊन मोडल्यावर काश्मीरच्या सिंहासनावर अवंतिवर्म्यानें आपल्या उत्पल घराण्याची सत्ता प्रस्थापित केली (८५५). या अवंतिवर्म्याचा आजा उत्पल नांवाचा असून कर्कोटक घराण्याच्या र्हासकालीं तो त्याचा मंत्री होता, व त्यानें स्वतःच त्यावेळीं गादी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेंच नांव पुढें त्याच्या घराण्याला मिळालें. अवंतिवर्म्याच्या अंगी कर्तृत्त्वशक्ति आणि जागृत सद्सद्विवेकबुद्धि हे गुण उत्कटतेनें वास करीत होते. त्याच्या कडक न्यायीपणाच्या काहीं कथा राजतरंणींत दिल्या आहेत. त्यानें मिळविलेल्या विजयाप्रमाणेंच त्याची जमीनमहसुलाची पद्धत देखील फार यशस्वी झाली. सुय्य नामक कर्तृत्ववान व बुद्धिमान मंत्र्याच्या साहाय्यानें त्यानें आपल्या राज्यांत वितस्ता आणि काश्मीरांतील इतर नद्या यांनां बंधारे घालून त्यांपासून अनेक ठिकाणीं कालव्यांचीं कामें करून घेतलीं. त्यामुळें त्या प्रांतांत शेंकडों नवीन गावें अस्तित्त्वांत येऊन हजारों एकर पडित जमीन लागवडीखालीं आली. काश्मीरप्रांतांत फार प्राचीन काळापासून चांगल्या सुकाळांत देखील खंडीभर भाताला (धान्य खारीला) २०० दिनार पडत असत, पण त्यालाच आतां या नवीन व्यवस्थेमुळें केवळ ३६ दिनार पडूं लागले असें कल्हणानें म्हटलें आहे. (५.११६— ११७).
अवंतिवर्मा फार धार्मिक होता. त्यानें, त्याच्या राणीनें आणि प्रधानांनीं शिवाचीं व विष्णूचीं अनेक मंदिरें बांधिलीं ऐहिक संपत्तीला तो इतका क्षुद्र लेखीत असे व ब्राह्मणांविषयी त्याचें एवढे औदार्य असे की, छत्रचामरेंखरेजी करून त्यानें सर्वस्व ब्राह्मणानां देऊन टाकिलें. (५.१८). तो महावैष्ण असून अहिंसा—प्रतिपादक होता. त्यानें आपल्या राज्यांत सर्वत्र प्राणिहिंसा बंद केली व तेव्हांपासून दहा वर्षे सगळया काश्मीर प्रांतात पूर्वी मेघवाहनाच्या कारकीर्दीप्रमाणेंच कोणा प्राण्याचा जीव घेण्यांत आला नाहीं असें कल्हणनें लिहिलें आहे. (५.६४); हिवाळयाच्या दिवसांत कांसवे नदीच्या थंड पाण्यांतून बाहेर येऊन काठांवर स्वस्थपणें ऊन खात पडत, (५. ६५) ‘अवंतिवर्म्याच्या कारकीर्दीत भट्ट कल्लट आणि दुसरे अनेक सिद्ध पुरुष देशाच्या उद्धरार्थ जन्मास आले’ (५,६६), अंवतिवर्म्याचें सगळें आयुष्य जसें धर्माचरणांत गेलें तसा त्याचा अंतहि त्याच स्थितींत झाला, म्हणजे भगवद्गीतेचें पारायण चाललें असतां त्यानें देह ठेविला (५. १२५). अवंतिवर्म्याचें देहावसान लौकिक शक ५९ त आषाढ शुक्ल ३ स झालें.(५,१२६). यावर्षीं इ. सनाचें ८४४ (३९५९—३०७५) वर्ष येतें. म्हणजे त्यानें इ. स. ८५५ पासून ८४४ पर्यंत २९ वर्षें राज्य केलें.
[वैद्य— मध्य. भारत १. स्मिथ— अलीं हिस्टरी ऑफ इंडिया. बुद्धेत्तरजग. राजतंरगिणी]