विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवधूत (१) (ज्ञानेंद्रसरस्वती) हे— सातारा जिल्ह्यांतील विटे गांव येथील कुलकर्णी होते. चैतन्य संप्रदायी. यांचे पूर्वीचें नांव भैरव, ज्योतिलिंग व यमुनाबाई यांचे हे पुत्र, यांस यांच्या ग्रंथावरून ज्ञानसागर आडनांव मिलाळें; हें चुलत्यास दत्तक दिले गेलें होते. यांची गुरुपंरपरा—कृष्णचैतन्य—तुलशी—अद्वय—चिद्घन (हे अद्वयांचे पुत्र व शिष्य), नागेश (पुत्र व शिष्य) यांची बहीण निराबाई त्यांचा पुत्र शिवचैतन्य, यांचा बंधु ज्योतिलिंग. शिवलिंगाचा दत्तक पुत्र व शिष्य अवधूत (१७३४ चे पूर्वीं) अशी होती. कुलदैवत क्षेत्रपाल, गोत्र विश्वामित्र, यांचे ग्रंथ— ज्ञानसागर (र. श. १७३४) व ज्ञानसागरानंद (र. श. १७६४). [सं. क. का .सू.]
(२) (निरंजन) यांचे मूळ पुरुष जे चित्तोत्पत्ति ते चितेंतून निघाले, अशी हे आख्यायिका देतात. यांचे पुत्र सिद्धेश्वर, यांचे विश्वेश्वर— त्यांचे श्रीधर व पुढें शामराज अवधूत हे आपले गुरू गोविंद देतात. स्वतःस अवधूतगिर्रजन म्हणवितात. ग्रंथ— कपिलगीता (१६३०) मूलस्तंब, अभंग, फटके वगैरे [सं. क. का .सू.]
(३) एक साधूंचा वर्ग अब्धूत, औधूत, अव्धूत अशीहि नामांतरें आहेत ‘अतीत’ (पहा) व अवधूत जवळ जवळ एकच वर्ग होय. याठिकाणी अतीतांहून अवधूतांचें भिन्नत्व व कांही जास्त माहिती द्यावयाची आहे.
अतीत म्हणजे संसारापासून ‘पलीकडे गेलेला’ व अवधूत म्हणजे जात गोत वगैरे ‘फेंकून दिलेला’ पुरुष. अवधूतांत शैव वैष्णव दोन्हीहि पंथांचे लोक आढळतात; पण अतीतांत बहुधां शैवच असतात. तथापि कांही ठिकाणी (उदा. बिहार) वैष्णव अतीतहि आहेत (रिस्ले— ट्राईब्स अँड कास्ट ऑफ बेंगाल). हा संप्रदायभेद संस्कृत वाङ्मयांतहि पुष्कळ ठिकाणीं आढळतो.
अवधूतांमध्ये शैव अवधूत अतिशय विरक्त असतात. हे जितकीं कमी वस्त्रें वापरतां येतील तितकीं वापरतात व उघडया भागांनां माती फांसतात व मोठयाला जटा वाढवितात. मौनव्रत आचरून भिक्षेवर निर्वाह करतात. थंडीच्या दिवसांत धुनी लावून बसतात. त्यांचे आयुष्य सर्व बाबतींत अतिकष्टप्रद असें वाटतें. कानफाटया— संप्रदायाचा संस्थापक जो गोरखनाथ त्यास अवधूतहि आपला गुरू मानतात. गोरखबोध व ‘गोरखनाथकी गोष्टी’ या ग्रंथांतून गोरखनाथाला ‘अवधूत’ हें उपपद लाविलें आहे. पुष्कळ अवधूत दत्तास आपलें विशिष्ट उपास्य समजतात.
वैष्णवांत ‘अवधूत’ या नांवाला विशिष्ट अर्थ आहे. जेव्हां रामानंदानें रामानुजाच्या अनुयायामध्यें मोठी सुधारणा घडवून आणिली व जातिभेद धर्मपंथांतून अजीबात नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हां त्यानें आपल्या अनुयायांना त्यांनीं निसर्ग व समाज यांचीं बंधनें नवीन संप्रदायांत शिरून पार झुगारून दिलीं आहेत, हें दाखविण्याकरितां ‘अवधूत’ ही संज्ञा योजिली. वमानुजी अवधूत राम आणि मारुति यास फार मानतात. हापकिन्स (रिलजन आफ इंडिया) च्या मतें, सर्व जातिबंधनापासून मुक्तता दर्शविण्यासाठीं अवधूत हा शब्द वापरला असें निश्चित नाहीं तर रामानुजानें घातलेले कडक नियम झुगारले एवढयाच गोष्टीचा सूचक हा उपयोग होत असेल. या रामानंदी अवधूतांचा धर्म ‘रामानंदी’, ‘भक्तिमार्ग’ या लेखांतून पहावयास मिळेल.
धर्माच्या नांवाखाली भीक्षा मागणार्या कोणत्याहि भिकार्याला सामान्यपणें अतीत किंवा अवधूत हें नांव योजितात.
[संदर्भ ग्रंथ— ‘अतीत’ ज्ञानकोश विभाग ६ वा. विल्सन— एसेज ऑन दि रिलिजन ऑफ दि हिंदूज. रिस्ले— ट्राईब्स अँड कास्ट्स ऑफ बेंगाल. कूक— दि ट्राईब्स अँड कास्ट्स ऑफ दि नार्थ वेस्टर्न प्राव्हिन्सेस अँड औध. ए. रि. ए. वगैरे.].