विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवन— लो. सं. (१९११) ४,२५,९३१ पंजाबांतील एक जात. हे लोक आपणांस अगदी परकी समजतात व हिंदुस्थानांतील जातींशी आपला काहीं संबंध नाही असें म्हणतात. अलीचा एक वंशज कुतुबशहा नांवाचा होता व त्याचे आपण वंशज आहोंत असें ते सांगतात. या जातीच्या उत्पत्तीसंबधानें कांहीं वर्षांपूर्वी मोठा वाद चालला होता. त्या वेळेस, सर डेन्झिल इबटसन यांनी सर्व उपपत्तींचा उहापोह केला होता. जनरल कनिंगहॅम— अवन आणि त्याचप्रमाणें जाजजुआ हे अनुयायांचे वंशज असून इंडोसिथियन लोकांच्या स्वारीच्या वेळेस मिठाच्या पर्वताच्या उत्तरेस असलेल्या पठारावर राहत होते असें म्हणतात. झेलम येथील जमाबंदीचा अधिकारी थॉमसन् हा असें म्हणतों की, अवन ही जाट जात असून डेराइस्माइलखानच्या वायव्येकडून पंजाबांत आली. मेजर वॅकसुद्धां अवन लोकांची उत्पत्ति जाट लोकांपासून झाली असें म्हणतो. कालाबाग येथील अवन सरदारांच्या वंशावलींत मुसुलमान नांवापाठीमागें हिंदु नावें पाहून सर डेन्झील इवटसन् यांनां आश्चर्य वाटलें. अवन परकी आहेत, असें सिद्ध करूं पहाणार्यांसहि त्यांच्या वंशवृक्षांत हिंदु नांवे सांपडलीं ही एक मोठी अडचण वाटली आणि म्हणून त्यांनी आपली उपपत्ति सिद्ध करण्याकरिता दंतकथेचा आधार घेऊन एक काल्पनिक गोष्ट तयार केली. ती अशीः—अवन हे मूळचे कुतुबशहाचे वंशज होते; परंतु कुतुबशहाच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनीं एका योग्यानें त्यांनां हिंदु करून घेतलें आणि नंतर एका सय्यद अबदुर रहीम यानें त्यांस पुनः मुसुलमान केलें; परंतु मुसुलमानांच्या स्वार्यांच्या वेळी कोणत्याहि परकी धर्मांतल्या मनुष्यास हिंदु होतां येत नव्हतें, ही गोष्ट ते विसरतात. रोझ यांनी अवचन ही एक देश्यच जात आहे; अवन हा शुद्ध संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ रक्षण असा आहे, असें मत दिलें आहे. थॉमसन व वॅकसाहेबांच्यामतें हे मूळचे जाट आहेत, ही गोष्टहि त्यांनीं मान्य केली आहे. कारण अजून सुद्धां जाट लोकांत अवन म्हणून एक पोटजात आहे. फार प्राचीन काळापासून ते मिटाच्या पर्वताच्या उत्तरेस असेलल्या मैदानावर स्थायिक झाले असावे व मुसुलमानी स्वार्यांस यांनी चांगला विरोध केला म्हणून हिंदु लोकांचे संरक्षक याअर्थीं यांना अवन हें नांव मिळालें असावें, असा रोझ यांचा तर्क आहे. मुसुलमानाच्या स्वार्यानंतर सय्यद कुतुबशहानें त्यांनां मुसुलमान केलें असावें आणि या प्रातांत लष्करी सरंजामी पद्धत प्रचलित असल्यामुळें ज्या वेळेस सरदार लोक मुसुलमान झाले त्या वेळेस त्याचे आश्रित लोकहि लवकरच मुसुलमान झाले असावे. नंतर अवन हे आपणास कुतुबशाही म्हणवूं लागले असें ते म्हणतात. मियानवाली जिल्ह्यातील अवंकरी भागांतील लोकासंबंधी अभ्यास केला असता अवन हे जाटवंशीय आहेत हें आपणास नक्की कळून येतें. मम्मल नावाच्या एका खेडयात एका भाटानें अवन वगैरे पोटजाती रजपूत वंशापासून कशा उत्पन्न झाल्या याचें मोठें बहारीचें वर्णन केलेलें रोझ यांस ऐकावयास सापडलें. त्या सर्व भागांत हिंदु नांवांच्या खुणा सापडतात. उदाहरणार्थ सपाट प्रदेशाच्या मध्यभागावर असलेल्या एका खेडयाचें नांव मझवन—मध्यवन असें आहे.
पुराणवस्तुसंशोधनसास्त्रदृष्टया दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठाच्या पर्वताजवळील अंब नांवाचें एक खेडें होय. हें खेडें पूर्वीं राजा अमरीकची राजधानी होती. मोडकळीस आलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून ती इमारत इ.स. १००० व्या वर्षी बांधली गेलीं असावी व त्याच वेळीं तेथें अवनांची वस्ती होती असें भवन लोकांतील परंपरागत कथांवरून आपणांस दिसतें. याशिवाय या जातींत अजून पुष्कळ हिंदूच्या चालीरीती आढळून येतात. यांच्या पोटजातींच्या नांवाचें तुलनात्मक दृष्टीनें निरीक्षण केलें असता ही अरबी जात असणें आपणास असंभाव्य वाटतें. त्यांच्या पोटजातीचीं कांही नावें अहिर, भाट, चांद, हरपाळ, पसवल, कलाल, करहत इत्यादि आहेत. म्हणून अवन हे जाट किंवा रजपूत वंशीय आहेत हे म्हणणें संयुक्तिक दिसतें. जाट लोकांमध्यें पुष्कळ रजपूत रक्त आहे. कारण मूळचा रजपूत हा एक सरदारांचा दर्जा दाखविणारा शब्द आहे [रोझ— ग्लॉसरी; सेन्सस रिपोर्ट].