विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवलंबन.—हें एक बौद्धसूत्र आहे. ब्राह्मणाच्या धंद्यास प्रथम नांवे ठेवून पुढें तो धंदा म्हणजे श्राद्धें वगैरे भिक्षुकीचीं कर्मे आपल्या ताब्यांत घेण्याकरितां बौद्धांचे जे प्रयत्न झाले त्यांचे फल हें सूत्र होय. अवलंबन ह्या शब्दानें प्रेतयोनींतील मुक्त झालेल्या व अधोमुख अशा आत्म्यांची स्थिति दाखविली जाते. पृथ्वीवर त्यांच्या वंशजांनी यज्ञ केला नाहीं तोपर्यंत त्यांची ह्या दुःखद अवस्थेंतून सुटका होत नाही. पश्चिम सिन घराण्याच्या काळीं (म्हणजे सु. २६५ इ.) प्रसिद्ध भिक्षु धर्मरक्ष ह्यानें चिनी भाषेंत ह्या सूत्राचें भाषांतर केलें आहे. मृतांकरितां यज्ञ करण्याची पद्धति हा त्याचा विषय आहे. हें सूत्र किंगत्सोंग यो—श्वो नामक संग्रहाच्या पांचव्या भागांत दिलें आहे व त्या सूत्राचें तेथे नांव, फो—श्वो— उलम— प्वन—किंग म्हणजे बुद्धानें म्हटलेलें अवलंबन सूत्र, असें आहे.
सू त्रा सा रां श.—बुद्ध एकदां श्रावस्ती नगरींत जेतवनामध्यें राहत होता. मोग्गल्लान हा ॠद्धि संपादन करीत होता. त्यानें आपल्या अंर्तर्ज्ञानशक्तीचा उपयोग करून पाहिलें तेव्हां त्याला अन्नपाण्याशिवाय कृश झालेली आपली माता प्रेतलोकांत आहे असें दिसून आलें. त्यानें तिला भात खाण्यास दिला परंतु त्याचे कोळसे झाले. तेव्हां ती मुक्त होण्याचा उपाय बुद्धास विचारतां, बुद्ध प्रभूनें सांगितलें की, “७ व्या महिन्याच्या १५ व्या दिवशीं दशदिशांचे आचार्य बोलावून सप्तवंशातील पूर्वजांच्या मुक्तीकरितां अन्न, पेय व वस्त्र त्यां आचार्यांच्या हातानें अर्पण कर, म्हणजे तुझ्या पूर्वजांची दुःखापासून सुटका होऊन एकदम स्वर्गांतील सौख्यस्थितींत ते जन्म पावतील. यज्ञार्पणाच्या वेळीं म्हणण्याचे मंत्रहि बुद्ध प्रभूनें सांगितलें. ह्या प्रमाणें मोग्गल्लान यानें केल्यावर त्याची माता दुःखापासून मुक्त झाली. [इं. अँ. पु. ९, पृ. ८५—८६]