विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवलोकितेश्वर —ही बौद्ध लोकांची एक दैवत कल्पना आहे. नैयायिक व भाक्त (भक्तिमार्गी) लोक सगुण परमात्म्याला ईश्वर हें विशेषण लावतात. ईश्वर याचा यौघिक अर्थ राजा (ईश = राज्य करणें) असा आहे. ईश्वर हें विशेषण बोधिसत्त्वाला विशेषतः महाबोधिसत्त्व महासत्त्वाला अगर दशभूमीश्वराला लावतात.
‘अवलोकितेश्वर’ या समासाचा अर्थ स्पष्ट समजत नाहीं. त्याच्या अर्थासबंधांनें विद्वानांत सुद्धां मतभेद आढळून येतो. अवलोकितेश्वर याचा अर्थ जें दृश्य आहे त्याचा म्हणजे या जगचाचा स्वामी असा होईल. अगर दृष्टीचा ईश्वर तो ईश्वर अथवा व्यक्तईश्वर अगर ज्ञात ईश्वर असाहि अर्थ होईल. अगर जो आपणाला दृश्य आहे तो असा होऊं शकेल. तिबेटी ग्रंथकारांनी व त्यावरील हिंदी टीकाकारांनी याचा अर्थ सर्व जगाचें निरीक्षण करणारा ईश्वर असाच केला आहे. कांही अर्वाचीन पंडितांनी याचा अर्थ ‘उंचावरून खालीं पाहणारा’ असा केलेला आहे. पण हा अर्थ समाधानकारक नाही; कारण सर्व बोधिसत्त्वाप्रमाणें अवलोकितेश्वर ‘भगवन्मुखावलोकनपर’ म्हणजे बुद्धाकडे पाहणारा व ‘करुणास्त्रिग्धावलोकन’ म्हणजे करूणादृष्टीनें अवलोकन करणारा आहे. व्याकरणदृष्टया अवलोकितेश्वर याचा अर्थ करुणादृष्टीनें पाहणारा परमेश्वर असा होतो. अवलोकित याचा अर्थ सर्व दिशांना सर्व वस्तू पाहणारा व सर्वांनां मदत करणारा देव असा आहे. त्याला समंतमुख असेंहि नांव आहे.
अवलोकितेश्वराचें सर्वांत अतिशय महत्त्वाचें असें नांव म्हणजे लोकेश्वर अगर लोकनाथ हें होय. दीर्घकालपर्यंत त्याचें जे स्वरूपवर्णन परंपरागत चालत आलेलें आहे त्या स्वरूपाचें यथार्थ निदर्शक असें हें नाव आहे. वर्तमानकालावर अधिकार चालविणारा, जगताचा भार वहाणारा, अमिताभ बुद्धाचा मुलगा, धर्मकार्याचें सगुणस्वरूप, बुद्धाचा वर्तमानकालीन अवतार, प्रकाशाचा जीवांचा ईश्वर असें याचें वर्णन बौद्ध ग्रंथांत केलेलें आढळतें.
बौद्ध ग्रंथावरून असें उघड दिसून येतें की, अवलोकित हें सूर्याचें एक विशेषण होतें आणि अवलोकिताला जे पद्मपाणी म्हणून संबोधण्यात येतें त्याचा देखील अर्थ सूर्यच होतो.
अवलोकितेश्वर याचा अर्थ व्यक्त म्हणजे सगुण अथवा कार्यकर्ता ईश्वर असा घेतल्यास अवलोकितेश्वरासंबंधीची ही कल्पना केव्हां निघाली तें शोधून काढणें अपुर्या साधनांमुळें शक्य नाहीं. अवलोकितेश्वराच्या कल्पनेचा उगम केव्हां झाला, याचें मूळ कशांत सांपडते. वगैरेचा ऐतिहासिकदृष्टया विचार करणेंहि फार अवघड आहे. तथापि अवलोकितेश्वरासंबंधीं कल्पनेचा उगम तर्कदृष्टया कसकसा होत गेला हें पाहण्यासारखें आहे.
महावस्तूमध्यें जरी बोधिसत्त्वांच्या ‘भूमीचें’ वर्णन आलेलें आहे व जरी त्यांत बुद्धक्षेत्राचें हि विस्तृत वर्णन आहे तरी पण बुद्धाचें पालन करणार्या व सर्व भूतांचें रक्षण करणार्या बोधिसत्त्वामहासत्त्वांचा त्यांत उल्लेख नाहीं व अवलोकिताचाहि मागमूस नाही. ललितविस्तरामध्यें बुद्धाचा उपदेश श्रवण करणारे जे ३२००० बोधिसत्त्व सांगितलेले आहेत त्यांत अनेक शिष्यांबरोबर ‘महाकरुणचंद्रिन’ याचाहि उल्लेख आला आहे. तिबेटी भाषेंतील भाषांतरामध्यें या ऐवजी ‘महाकरुणसत्त्व’ असा उल्लेख आहे असें वॅडेलनें म्हटलें आहे. अवलोकितेश्वराला जीं अनेक विशेषणें लावण्यांत येतात त्यापैकीं हें एक आहे. एवढयावरून, ललितविस्तरामध्यें अवलोकितांचा उल्लेख नाहीं असें जें प्रचलित मत आहे त्याला बाध येऊं शकतो की काय हें ठरविणें कठिण आहे.
धर्मसंग्रहग्रंथातील आठ बोधिसत्त्वांमध्यें अवलोकिताचा उल्लेख नाही, व कांहीं ग्रंथ ओवलोकिताचा उल्लेख करतात पण अवलोकितास सर्वांत उच्च स्थान देत नाहींत तर बोधिसत्त्वाहून भिन्न आहे अशा पांचसात दैवीव्यक्तीमध्यें त्याचा उल्लेख करून त्याला एक प्रकारचें महत्त्व देतात; उदाहरणार्थ अवलोकित व मंजुघोष ज्यांचे अग्रणी आहेत असे बुद्धाचे पुत्र, व अवलोकित, मंजुघोष, क्षितिगर्भ आणि वज्रिान यांचे एकत्र वर्णन आढळतें. यांचे विशेष काम म्हणजे दैत्यांशीं युद्ध करणें हें होय.
कांही महायानी ग्रंथांत आपल्याला सर्व बोधिसत्त्वांच मुख्य व सर्व श्रेष्ठ अशा व्यक्तींचें वर्णन आढळतें. यांच्या मताप्रमाणें बोधिसत्त्व हेंच त्रिरत्नांपैकीं तिसरें रत्न जें संघ तें होय. धर्मसंगीतिसारख्या काहीं सूत्रांमध्यें अवलोकितेश्वराचे महत्त्व बरेंच वर्णन केलें आहे. धर्मसंगीतिमध्यें अवलोकितेश्वर हा महत्त्वपूर्वक दृष्ट झाला आहे. बोधिसत्त्वानें पापाची देखील भीति न बाळगता ज्या कार्यी आपल्याला वाहून घेतलें पाहिजे तें व्रत भूतदया हें असून तें अतिशय कल्याणकारक आहे अशी त्याची स्तुति अवलोकितेश्वर करतो. भूतदया दाखवितांना एखादें पापकर्म करावें लागलें तरी पत्करावें, कां की, ज्यानें आपल्यावर विश्वास ठेविला आहे त्याचा आशाभंग करण्यापेक्षां पापकर्म करून त्या पापामुळें नरकांत यमयातना भोगणें देखील अधिक श्रेयस्कर होईल, असें त्यानें म्हटलें आहे.
अवलोकित हा बोधिसत्त्व महासत्त्व आहे खरा पण तो काहीं सर्वश्रेष्ठ नाहीं. अवलोकितेश्वराच्या इतिहासांतील ही वरील पायरीच पूर्वीच्या समजुतीमध्यें म्हणजे पद्मपाणी हा सातआठ बोधिसत्त्वासह बुद्धाच्या भोवती बसलेला आढळतो अशा प्रकारच्या चित्रामध्यें व वर्णनामध्यें व्यक्त झालेली आढळून येते.
मैत्रेय (भविष्यत्कालीन बुद्ध) यालाच फक्त हनियानामध्यें बोधिसत्त्व मानलें आहे व हा अवलोकितेश्वराचा पूर्वगामी असावा असें संस्कृततिबेटी महाव्युत्पत्ति कोशावरून व चिनी कोशावरून दिसून येतें. निदान एवढें तर निश्चित दिसतें की, बोधिसत्त्वाला जी, दयाशील, दैवी, परमार्थ, अभयंदद वगैरे विशेषणें लावण्यांत येतात ती केवळ अवलोकितेश्वराला लाविलीं जाण्यापूर्वी क्षितिगर्भादिकांनांहि लावण्यांत येत होतीं. अर्थांतच वरील मतें हीं केवळ तर्काधिष्ठित आहेत. कारण, ख्रिस्ती शकाच्या सुमारासच कांहीं संप्रदायामध्यें अवलोकिताचें सर्वश्रेष्ठत्त्व प्रस्थापित झालें होतें.
सद्धर्मपुंडरीकामध्यें अवलोकितेश्वराचें प्राधान्य आढळून येत नसलें तरी त्याच्या माहात्म्यवर्णनपर एक संबध प्रकरण आहे. तो आपल्या बरोबरच्या मंजुश्रीखेरीज इतर अक्षयमति वगैरे बोधिसत्त्वमहासत्त्वांपेक्षा फार श्रेष्ठ असून तो जगाचा त्राता आहे. तो हजारों बुद्धांपेक्षा अधिक वंद्य आहे. तो आपलें भूतदयेचें व्रत चालविण्याकरितां बुद्ध, बोधिसत्त्व, महेश्वर, कुबेर वज्रापाणि वगैरेंचे रूप धारण करतो. अक्षयमति त्याला फुलें नजर करतो व तो ती शाक्यमुनीला व पूर्व बुध्दंना अर्पण करितो. या ग्रंथांमध्यें ‘सुखाकर’ म्हणून त्याचा लोक दिला असून तेथें तो कधीं बुद्धच्या उजव्या बाजूस तर कधीं डाव्या बाजूस बसतो असें म्हटलें आहे.
अमितायुर्ध्यानसूत्रांमध्यें व सुखावतीमध्यें अमिताभ व अवलोकित यांच्या ईश्वरत्वविषयक कल्पना दृष्टीस पडतात. भक्तिसंबधाच्या अतिशयोक्तिपर कल्पना यांत आहेतच; त्यामध्यें पूर्वगामी कल्पनांवरील दृढ श्रद्धेची छटा या ग्रंथात दिसून आल्याविना राहत नाहीं.
अमिताभ अथवा लोकनाथ हा अत्यंत प्राचीन काळी धर्माकर नावाचा भिक्षू होता. त्याला बुद्धत्व प्राप्त होऊन दहा कल्पें होऊन गेलीं, व त्याला गुप्त होण्याला देखील पुष्कळच काळ लागेल. तत्त्वतः सर्वच बुद्ध सारखे असून समज्ञानी, व पूर्णावस्थेला पावलेले असतात, पण बुद्ध झाल्यावर यांच्या कार्यामध्येंच काय तो फरक पडतो. उदाहरणार्थ, धर्माकरानें असा पण केला होता की, मी बुद्ध झाल्यानंतर अतिशय शुभ असें जें बुद्धक्षेत्र करीन; तें क्षेत्र सुखावतीच होय आणि याच कारणास्तव निर्वाणपदाला पोहोंचणारे प्राणी बुद्धक्षेत्रापासून त्याच्याभोंवती जमतात. जे दोषयुक्त असून त्यांचें क्षालन करू इच्छितात व तशी शक्ति ज्यांच्या ठिकाणीं असते असे प्राणी अमिताभबरोबर आपले वेळ कमलपुष्पामध्यें घालवितात. याच्याच बरोबर, ज्या बोधिसत्त्वांनां बुद्ध, व्हावयाची इच्छा असते, असे बोधिसत्त्व बुद्धाचा उपदेश श्रवण करण्यासाठी जातात; हेच बोधिसत्त्व पुढें बुद्ध होत्साते आल्याला शाश्वत स्थान प्राप्त करून घेतात. अवलोकितेश्वर मात्र या युगाच्या शेवटी हजारावा व शेवटचा बुद्ध होऊन येईल.
बोधिसत्त्वांमध्यें देखील सर्वांची योग्यता सारखी नसते. आमिताभाच्या स्वर्गामध्यें अवलोकितेश्वर व महास्थामप्राप्त हे बुद्धाइतकेच तेजस्वी व मोठे असतात पण असतात पण त्यांतला त्यात अवलोकित हा अधिक महत्त्वाचा व उच्च दर्जा आहे. कारण सर्व प्राण्यांनां सुखावती मध्यें आणावयाचें त्याचें ध्येय असतें. तो आपल्या तेजोमय शरीरानें सर्व लोकांमध्ये प्रवास करतो, व त्यावेळीं तो अनंत रूपें धारण करतो. अमिताभाप्रमाणें त्याचे अंशावतार असतात. ‘सुखावति प्राप्त करून देणारा’ असें जें त्याचें कार्य आहे तें तो कधीं विसरत नाहीं.
हें गौरवपर पण विशिष्ट कामनायुक्त असें जें अमिताभ व अवलोकित यांच्या संबंधाचें माहात्म्य वर वर्णन केलेलें आहे तें महायानपंथाच्या सर्वसामान्य मोक्ष मार्गाहून अगदी भिन्न आहे. हीनयानपंथाच्या मतें बुद्ध हेच स्वतः उपदेशक असतात. पण महायान पंथाच्याप्रमाणें बुद्ध हे ध्येयात्मक व बोधिसत्त्व हे तत्प्रात्यर्थ असतात. ज्याप्रमाणें मांजरी आपल्या पिलांनां आपल्या तोंडांमध्यें धरून त्यांचा जीव वांचविते त्याप्रमाणें सुखावतीमध्यें अमिताभ व अवलोकित हे आपल्या एकनिष्ठ भक्तांनां रक्षक होतात. पण जे पापी असतील त्यांना मात्र येथें जागा मिळत नाही. अमितायुर्ध्यांनामध्यें मात्र या अटी मुळींच नाहींत. जो पापी मनुष्य अमिताचे ध्यान करील त्याचा उद्धर होईल.
चिनी प्रवाश्यांनीं ज्यासंबंधीं वर्णन दिलेलें आहे त्या मूर्ती याच काळच्या होत कारण अमितायुर्ध्यानामध्यें दवांचा विशिष्ट स्वभाव दाखविणार्या मूर्तीसंबंधी उल्लेख आलेले आहेत. आपल्याला अवलोकिताचे भव्य असे पुतळें आढळून येतात. तसेच मैत्रेय, मंजुश्री, तारा आणि क्वचित् महास्थान यांच्या समवेत असलेल्या मूर्तीही दृष्टीस पडतात. या आश्चर्यकारक मूर्ती ईशान्य हिंदुस्थानापासून तों सीलोन पर्यंत आढळून येतात; व ग्रंथांतरी त्यांच्या संबंधाचें जें वर्णन आपल्याला आढळून येते त्याचेंच मूर्तिमंत चित्र आपल्यापुढें आपण पाहतों आहों असें आपल्याला वाटतें. अमितायुर्ध्यानसूत्रामध्यें अवलोकितेश्वराच्या शिरावर २५ योजनें उंच असा बुद्ध अमिताभाच्या डाव्या बाजूला बसलेला आहे असें वर्णन आलेलें आहे; व अशाच प्रकारच्या मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत.
बोधिसत्त्व, मंजुश्री, अवलोकित व प्रज्ञा यांची: पूजा क्रणें हा जो महायानपंथाचा विशेष आहे, तो चिनी प्रवाश्यांच्या ध्यानांत आलेला असावा असे दिसतें. हीनयानपंथाचा ज्या ठिकाणीं प्रसार होता अशा ठिकाणीं देखील मैत्रेयाच्या मूर्तीची पूजा केली जात असे असें ह्युएनत्संगने म्हटलेलें आहे.
कारण्डव्यूह व शूरगंम यामध्यें अवलोकितांचे विशेषच गौरवपर वर्णन आलेलें आहे. पण त्यांत सांप्रदायिक गुंतागुंतीचे वर्णन फार झालेलें आहे. यामध्यें प्राचीन सूत्र वाङ्मयापेक्षां पौराणिक छटाय जास्त दिसत. उलटपक्षीं मंत्र तंत्रविषयक पुस्तकें व शिल्पशास्त्र यावरून असें दिसून येतें की, अवलोकित व इतर देवता या भिन्न नसून तत्त्वतः एकच आहेत, अशा प्रकारच्या कल्पनावर दिलेल्या अवलोकिता विषयींच्या पुराणान्तर्विषयक कल्पनामुळेंच उत्पन्न झालेल्या आहेत. अवलोकित हा बौद्धांचा शिव असून तो योगी व मांत्रिक होता.
कांही कांही बाबतींत कारंण्डव्यूहमध्यें, सद्धर्मपुंडरीकामध्यें व तसेच अमितायुर्ध्यानामध्यें साम्य दिसून येतें. अवलोकित हा अमिताभापासून धर्माचें ज्ञान प्राप्त करून घेतो. शाक्यमुनीची पूजा करण्यास तो येतो व आपल्याबरोबर पुष्पें व अमिताभाचे आशीर्वाद आणतो. अर्थातच या दृष्टीनें तो बुद्धांपेक्षा खालच्या दर्जाचा ठरतो. उलटपक्षीं तो बुद्धांपेक्षां व समंतभद्रपेक्षांहि वरिष्ठ दर्जाचा आहे. त्याच्या इतकें प्रतिभान कोणत्याहि बुद्धाच्या ठायीं नसतें. सर्व बुद्ध एकत्र केले तरी त्याच्या इतकी योग्यता होणार नाहीं. त्याच्या शिवाय दुसर्या कोणालाहि मायावपु धारण करतां येत नाहीं; बुद्धला ती वपु दृष्टीस देखील पडत नाहींत आणि त्याच्या शरीराच्या प्रत्येक छिद्रामध्यें हजारों बुद्ध व अगणित महात्मे मावतात; त्याच्या शरीरापासून सामान्य देव उत्पन्न होतात; त्याच्या डोळयांतून सूर्य चंद्र बाहेर येतात; महेश्वर हा त्याच्या कपाळापासून उत्पन्न होतो; ब्रह्मा त्याच्या खांद्यापासून बाहेर येतो. हा उत्पत्तिकर्ता असून जगताचा पालक तोच आहे; त्याच्या बोटापासून नरकाग्नि शमविणार्या व प्रेतांना संतृप्त करणार्या नद्या उत्पन्न होतात; तो दैत्यांनां घाबरवितो व वज्रापाणीस पळावयास लावतो; सर्व मनुष्यावर व प्राण्यांवर त्याची सत्ता चालते, यांत कांही आश्चर्य नाही. अवलोकित हा महायोगी असून विद्याधिपति व अनेक मंत्र शतावकीर्ण आहे त्याला गूढमंत्र माहीत आहेत; पण त्यांतल्या त्यांत ‘सर्वोत्तम मणिपद्मे हुम.’ हा षडक्षरी मंत्र दुसर्या कोणत्या बुद्धाला अवगत आहे? कोणालाच नाहीं. कोणाच्या तरी स्वाधीन आहे म्हणावें तर तें सुद्धां नाहीं. फक्त अवलोकितेश्वरालाच ती विद्या अवगत आहे व ती त्याला वाटेल त्यास देतां येते. ‘वंदित’ एवढेंच त्याचें वर्णन पुरेसे आहे. त्याच्यामध्यें, बुद्धधर्म संघ व शरणें हे सर्व एकवटलेले आहेत. जो कोणी त्याच्या शरीरावर ॐ षडधरी बीजाक्षरें खोदिल तो वज्राकायशरीरभाक, तथा गतयानकोटी व धातुस्तूपवान् होईल.
मूर्तिशिल्पशास्त्र व मंत्रग्रंथ यावरून असें खात्रीलायक अनुमान काढतां येतें की अवलोकिताचें देवत्त्व हें केवळ शाब्दिक नसून त्याचा पूजा व मूर्तिपुजा यांच्याशीं संबंध आहे. अवलोकिताचीं तिबेटांतील रूपें हिंदू संस्कृतीची प्रतिकृति आहे. फार काय त्यांवर चीनांतील उद्यान वगैरेंची ही छाप बसलेली आढळते. अवलोकितेश्वराच्या मूर्तीचे समग्न वर्णन देणें अशक्य आहे. शिवाय त्याचें उत्तम वर्णन
फूशेरनें केलेले आहे. मूर्तिकल्पनेंतील कांहीं विशेष गोष्टी तेवढया देतों.
अवलोकितेश्वर हा अनेकाकृति आहे. पण पुष्कळ ठिकाणी मनुष्यकृतीही आढळतो. त्याच्या डोक्यावर जिन अमिताभाची मूर्ती असते.त्याच्या एका हातांत पद्म असतें व दुसर्या हातानें तो पडणारें अमृत, प्रेत आपल्या ओष्ठांनीं पीत आहे असें दाखविलें आहे. अवोकिताच्या नेहमीं जवळ असणारे देव म्हणजे, क्रुद्ध अगर शांत असणारी तारा, (कधीं कधीं तिचीं दोन्हीं स्वरूपें) ३०,५००००० मंत्राचा पालक असा हयग्रीव व मैत्रेयाचा मित्र सुधन हे होत.
शि व स्व रू पी अ व लो कि ते श्व र.— जेव्हां अवलोकिताला चार हात आहेत असें दाखवितात तेव्हां त्याच्या दोन हाताची ओंजळ केलेली असते. इतर दोन हातांत, पद्म व रुद्राक्ष माला असते. जेव्हां अवलोकितेश्वर हा शिव, अमोघपाश, हालाहाल, नीलकण्ठ, पद्मनर्तेश्वर इत्यादिकांची रूपें धारण करतो तेव्हां तो अनेक हस्त व लोचन धारण करतो, व्याघ्रांबर धारण करतो, कमण्डलु हातांत घेतो, नाग आपल्या गळयाभोवती गुंडाळतो, हाडकांची माळ गळयामध्यें घालतो. त्याचें व शिवाचें ऐक्य दाखविणार्या ज्या आकृती आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. (१) सिंहनाद— शाक्यमुनीनें ज्या गंभीर प्रतिज्ञांचा उच्चार केला त्यास सिंहनाद म्हणतात. मंजुश्रीची कल्पना अवलोकित कल्पनेशीं मिश्र होऊन जी आकृति तयार करण्यांत आली आहे ती अवलोकित कल्पनेप्रमाणें सिंहावर बसलेली असून मंजुश्रीचा ग्रंथ व तलवार हातांत घेतलेली (२) मोराच्या पिसार्यासारखे पसरलेले व प्रत्येकांत एक नेत्र असलेली सहस्त्रकरयुक्त आकृति. (३) एकादशमुख व सहस्त्रकरयुक्त आकृति. या संबंधीची गोष्ट अशी आहे. मनुष्यामात्राचे रक्षण जर माझ्या हातून न होईल तर माझें शीर्ष सहस्त्रशः विदीर्ण होवो असा शंकरानें पण केला होता व त्याच्या करवीं रक्षण न झाल्यामुळें त्याचें शीर्ष सहस्त्रशः विदीर्ण झालें व अमिताभानें ते पुढें एकत्र केलें.
नेपाळी शिलालेखावरूनहि आपल्याला अवलोकितेश्वरांच्या अन्य आकृतीची कल्पना येईल. योगिराज त्याला मत्स्येंद्र म्हणतात. शाक्त त्याला शक्ति म्हणतात, बौद्ध त्याला लोकेश्वर म्हणतात; ब्रह्म आहे असें मानून त्याला सर्व मान देतात. चीनमध्यें अवलोकितेश्वराचा स्त्रीप्रमाणें आकार दाखवितात तीं भारतीय कल्पना असावी तशा प्रकारचीच कल्पना अवलोकितेश्वर व शक्ति यांचे वर ऐक्य दाखविण्यांत दृग्गोचर होते.
तिबेटांतील अवतार तत्त्वाविषयी येथें लिहिण्याचें प्रयोजन नाहीं. (‘अवतार’ पाहा) धर्मोपदेशक हे निर्माण असून महालामध्यें अवलोकितेश्वर अवतरित असतो, व अमिताभ हा दुसर्या मठाच्या महापंडितामध्यें अवतीर्ण होतो हें मत अर्वाचीन आहे असे वॅडेलचें मत आहे, पण तें बरोबर आहे असें दिसत नाहीं.
[सं द र्भ ग्रं थ.— सुखावतीव्यूह. अमितायुर्ध्यानसूत्र. बोधिचर्यावतार. कारंडव्यूह व विल्सन— सिलेक्ट वर्कस १; बुद्ध ट्रक्टस् प्लामनेपाळ, ग्रुंडवेल बर्जेस—बुद्धि आर्ट इन इंडिया. गॅझेटियर ऑफ सिखिम १८९३. बर्जेस— आर्कि. सर्व्हें ऑफ वेस्टर्न इंडिया नं. ९ व ५ वाडेल— दि. इंडियन कल्ट ऑफ अवलोकित. शरतचंद्रदास डिक्शनरी. (जे. ए. एम. बी. २, १८८२) बील— दि बुद्धिस्ट पिलग्रिम्स.]