विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अव्वैयार— ही नामांकित कवयित्री द्राविड वाङ्मयाच्या अत्यंत प्राचीन काळांत होऊन गेली. हिचें जन्म तामिळ लोकांच्या जातींत झालें. ही व हिचीं सहा भावंडें मिळून सात माणसें ज्ञानी होतीं म्हणून जशी यांची कीर्ति स्वदेशी होती, तशींच परदेशीं व द्वीपांतरींहि होती असें म्हणतात. या सात भावंडांत अव्वैयार आपग्गा व वालीज आणि मुरग्गा ह्या चौघी बहिणी आणि तेरू वेल्लुर, आधिकनान आणि कपिलर असे तिघे पुरुष भाऊ होते.
अव्वैयार नीतिशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र, भूगोल व रसायन विद्या, यांत इतकी निष्णात होती कीं, त्या प्रत्येक विषयावर तिनें ग्रंथ लिहिले आहेत. अत्तिसुदी, कोनिवेंडन मदुरसी, नादबाली इत्यादि हिचे नीतिशास्त्रावरील ग्रंथ होत. त्याचप्रमाणें इतर विषयांवरहि ग्रंथ असून तामिळ देशांतील विद्यालयांत ते सर्व शिकविण्याची चाल असे. यावरून या स्त्रीची योग्यता केवढी होती हें सहज समजून येतें. अव्वैयार ही इतर विद्यांत जशी पारंगत होती, तशीच पंचशास्त्र, धातुवाद व कल्पविद्या यातहि होती. असें सांगतात की, कल्पविद्येच्या योगानें ही २४० वर्षें जगली होती.
अव्वैयारच्या बाप पिरली या नांवाचा एक तामिळ ब्राह्मण होता व आई अतिशूद्र जातीची होती. ब्राह्मणास अतिशुद्र जातीची स्त्री कशी मिळाली व मुलें होण्याचा योग कसा घडून आला तो वृत्तांत ‘पिरली’ या शब्दाखालीं दिला आहे. अव्वैयार हिचें जन्म झाल्यावर पिलरीनें हिला अरण्यांत सोडून दिले असता तिला एका कवीनें पोशिलें व ती बुद्धिमान आहे असें पाहून तिला विद्या शिकविली. त्यामुळें ही विद्वान होऊन मोठया प्रख्यातीस आली. मरेपर्यंत हिनें लग्न न करितां, आपला काळ ब्रह्मचर्यव्रतानें विद्याभ्यासांत व कविता करण्यांतच घालविला अशी हिची कीर्ति अजून लोक गातात (कवि च.)