विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अॅव्हबरी — विल्टशायरच्या डेव्हाइझेस पार्लमेंटविषयक विभागांत मार्लबरोपासून रस्त्यानें ८ मैलांवर केन्नेट नदीवर हें एक खेडें आहे. येथे सेंट जेम्सचें एक सुंदर चर्च आहे. येथें कांहीं पूर्वकालीन अवशेष आहेत, तथापि त्यांच्या स्वरूपाविषयीं बराच मतभेद आहे. परंतु ब्राँझकाळाचें हें आहे असें अनुमान करितां येतें. अव्हबरीचें चर्च आणि अव्हबरीचा मॅनार या दोहोंनां इतिहास आहे. डूम्सडेच्या मोजणीच्या काळी अॅव्हबरीचें चर्च रेन बोल्ड नावाच्या एका धर्माध्यक्षा (प्रीस्ट)च्या ताब्यांत होतें. तिसर्या हेन्रीनें तें सिरेन्सेस्टरच्या अॅबटला व मंकांना देऊन टाकिलें. तें सातव्या हेन्रीच्या राज्यापर्यंत त्यांच्या ताब्यांत होतें. नॉर्मडींतील सेंटजॉर्ज ऑफ बुवेरव्हिलच्या बेन डिक्टाइन मंकांना पहिल्या हेन्रीच्या काळांत अॅव्हबरीचा मॅनार दिला होता. तिसर्या एडवर्डच्या राज्यांत फ्रान्संमध्यें जी लढाई झाली तिच्यामुळें राजानें हा मॅनार परदेशस्थ भिक्षूंच्या नियंत्रणापासून सोडवून आपल्या राज्याला जोडला आणि सर्व हक्क व ताब्यांतला वस्तूंसह न्यूकॉलेज ऑक्सफोर्डला अर्पण केला.