विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अॅशबर्टन् — डेव्हन्शायर नामक अॅशबर्टन पार्लमेंटविषयक विभागांतील ही एक बाजारी पेठ आहे. हें प्लेमथहून २४ मैलांवर ग्रेट वेस्टर्न रेल्वेच्या एक शाखेवर आहे. जिल्ह्याची लोकसंख्या (१९०१) २६२८ आहे. हें टेकडयांनीं वेढलेल्या एका खोर्यांत आहे. डार्ट येथें सेंट अड्रचें देवालय आहे. येथें लोकरीचें सर्व नांवाचें कापड तयार करितात. येथें दारू गाळण्याचे, रंग करण्याचे कारखाने व चिरकामाच्या गिरण्या आहेत. पाटीचा दगड व तांबे आणि टिन यांच्या खाणी पूर्वी बर्याच होत्या. जवळचें सर्जच्या व्यापाराचें ठिकाण बक्फास्टलेचा शहरी जिल्हा होय. ह्या दोन शहरांमध्यें बक्फास्ट अॅबे आहे.
अॅशबर्टन् हे शहर वहिवाटीच्या हक्कानें पार्लमेटांत प्रतिनिधी पाठविणार्या शहरांपैकी एक शहर होते. येथें कथलाच्या खाणी होत्या. पूर्वीं येथील कारभार दरवर्षीं तेथील सरदारानें भरविलेल्या सभेंत निवडलेला एक प्रतिनिधी व एक बेलीफ पाहत असत.
डूम्सडेप्रमाणें अॅशबर्टन हें एक्झीटरच्या बिशपच्या ताब्यंत होतें. सन १५५२ त अॅशबर्टनबरो व अॅसबर्टन् फॉरेन हे दोन्ही मॅनॉर्स बिशपनें विकले व नंतर ते राजाच्या ताब्यात गेले. कांहीं वर्षांनीं याचा अर्धा भाग क्लिन्टन कुटुंबाकडे गेला. याला दोन प्रतिनिधी पाठविण्याचा हक्क होता पण १८३२ व १८८५ च्या रिफॉर्म अॅक्टांनीं तो नाहींसा झाला.
येथें गुरुवारी व शनिवारी बाजार भरतो. वर्षांतून चार वेळ जत्रा भरतात.