यूरोपियनांची दृष्टि अठराव्या शतकांत प्रथम अशांटीवर वळली. अशांटी राज्याचा खरा संस्थापक ओसाई टुटु होय. यानें कुमासी शहर बांधून व शेजारचें डेनकेराचें राज्य जिंकून राज्यमर्यादा बरीच वाढविली. १८०० मध्यें ओसाई टुटु काभिना हा राजा होता. ब्रिटिशांचा व अशांटीचा संबंध प्रथम याच्याच अमदानींत आला. १८०७ मध्यें यानें आनामाबो नजीकच्या किनार्यावरील ब्रिटिशांच्या किल्ल्याला वेढा दिला. तेव्हां इंग्लिशांनीं त्याला त्या किल्ल्याबद्दल व केप कोस्ट येथील किल्ल्याबद्दल कांही भाडें देण्याचें कबूल केलें. १८१७ च्या तहांत हीच गोष्ट कायम करण्यांत येऊन किनार्यावरील शहरांतील देश्य लोकांचें संरक्षण ब्रिटिशांनीं करावें असें ठरलें. याच संबंधात १८१९ त भानगड उपस्थित होऊन अशांटीचा राजा देश्य प्रजेस ब्रिटिशांच्या ताब्यांत देण्यास कबूल होईना. तेव्हां १८२० त फिरून तह होऊन देश्य प्रजेस अशांटीच्या ताब्यांत देण्यांत आलें. पण केप कोस्टचा सुभेदार जे. होप स्मिथ हा तह मान्य करीना, व त्याला लंडन येथील सरकारानें ब्रिटिश ठाण्यांचा ताबा प्रत्यक्षपणें आपल्याकडे घेतला. त्यामुळें ओसाई टुटुक्काभिना याचा क्रोधानल भडकून त्यानें ब्रिटिशांविरुद्ध रणशिंग पुंच्कलें. १८२४ त पहिलाच ब्रिटिश गव्हर्नर सर चार्लस मॅकार्थी याचा पराभव होऊन तो मारला गेला. याच दिवशीं ओसाई टुटु क्काभिनाहि मरण पावला. ओसाई ओकोटो या नव्या राजाचा डोडोवा येथें १८२६ त पराभव होऊन अशांटीची किनार्याजवळील जातींवरची सत्ता डळमळीत झाली व प्रा नदीचे दक्षिणेकडील सर्व जाती ब्रिटिश संरक्षणाखाली घेण्यांत आल्या. पहिल्या काका डयुआचं अमदांनीत (इ. स. १८६३) पुन्हां ब्रिटिश व अशांटी यामध्यें लढाई उपस्थित झाली. त्यांत अशांटीला दोन महत्त्वाचे विजय मिळाल्यामुळें त्यांची मान्यता फारच वाढली. नवीन राजा कोफी कारीकारी यानें तर राज्यावर येतांच आपलें लढाईचें धोरण जाहीर केलें. १८७३-७४ च्या युद्धाचें कारण ब्रिटिशांनीं एलमिनांचा किल्ला डचांपासून आपल्या कबज्यांत घेतला व अशान्टीनें ४ यूरोपियन तुरुंगांत टाकले हें होय. एलमिना येथील लोकांनां अशांटीचा राजा आपल्या प्रजेप्रमाणें मानी अर्थातच हें कृत्य त्याल आवडलें नाहीं. अशांटी सैन्यानें प्रा नदी ओलांडून ब्रिटिश मुलुखावर हल्ला केला. परंतु सर गारनेट बूलसले याची कुमासीवर चाल करून जाण्याची तयारी दिसतांच ते मागें पाय घेऊं लागले व व्यवस्थितपणें कुमासी येथें येऊन पोंचले, सर गारगेट याच्या सैन्यानेंहि दरकूच दरमजल करीत कुमासींत प्रवेश केला. गारनेटचे मागून क्याप्टन ग्लोव्हर हाहि येऊन पोंचला. तेव्हां कोफी कारीकारी याला तहाचें निशाण उभारून अपमानास्पद तह करणें भाग पडलें.
लढाईनंतर लवकरच कोफी कारीकारी याला लोकांनीं पदच्युत करून त्याचा भाऊ मेन्सा याला गादीवर बसविलें. हा राजा अतिशय जुलमी निघाल्यामुळें राज्यक्रांति होऊन दुसरा क्काका डयुआ हा राज्यावर आला. पण तो लगेच मरण पावल्यामुळें प्रेंपे याला गादीवर बसविण्यांत आले. कुमासीला ब्रिटिश रेसिटेंड ठेवण्याचें यानें नाकारल्यामुळें ब्रिटिशांनीं कुमासीवर स्वारी करण्याचें ठरविलें. १८९६ च्या जानेवारीच्या सतराव्या तारखेस ब्रिटिशांनीं कुमासी काबीज केलें व प्रेंपेला हद्दपार करण्यांत आलें अशांटी येथें ब्रिटिश रेसिडेंट ठेवण्यांत आला. इ. स. १९०० मध्यें कुमासीच्या सरदारांनीं बंडाचें निशाण उभारलें. कुमासी येथील रेसिडेंटला पळ काढावा लागला. परंतु कर्नल विलाक्स हा वेळेवर कुमक घेऊन आल्यामुळें कुमासीचा बचाव झाला व बंडवाल्यांचा मोड करण्यांत आला.
१९०१ च्या सप्टेंबर महिन्याच्या २६ तारखेस अशांटी ब्रिटिश राज्यास जोडण्यांत आला. गोल्ड कोस्टचा गव्हर्नर येथील राज्यकारभार पाहत असून त्याला चार कमिशनर व तितकेच असिस्टंट कमिशनर यांची मदत असते. न्याय इनसाफाचे वेळीं देश्य कायदे पाळण्याबद्दल हुकूम आहेत.
१९०६ मध्यें अशांटी प्रोटेक्टोरेट व गोल्डकोस्ट ही क्राऊन कॉलनी यांच्यामधील सरहद्दी, भौगोलिक परिस्थिती व लोकजाती या गोष्टी लक्षांत घेऊन ठरविण्यांत आल्या. राज्यकारभार व्यवस्थेकरितां अशांटीचे मध्य, दक्षिण, पश्चिम, व उत्तर असे चार प्रांत पाडून प्रत्येकावर कमिशनर हा मुख्य अधिकारी नेमला. सर्वांवर चीफ कमिशनर हा अधिकारी असून तो अशांटीची राजधानी कुमासी येथें राहतो व तो गोल्डकोस्टच्या गव्हर्नराच्या नियंत्रणाखालीं असतो. चीफ कमिशनरच्या मदतीला कुमासी चीफांचें कौन्सिल असतें. कुमासी सेकोंडी ही रेल्वेहि झाली आहे. या देशांतील जातींवर त्या त्या जातींतील चीफची सत्ता चालते. हे चीफ त्या त्या जातींतील लोकांनीच निवडलेले असतात. पण ही निवड वंशपरंपरागत राज्यकारभाराचा हक्क असलेल्या सरदारी घराण्यांतूनच करतात. वारसा हक्क स्त्रीवंशजांनां मिळण्याची चाल असल्यामुळें अधिकारूड चीफ मयत झाल्यावर त्याच्यामागून त्याच्या भावाला किंवा मावशीच्या मुलाला किंवा बहिणीच्या मुलाला अधिकार मिळतो. खुद्द मयत चीफच्या मुलाला कधीच मिळत नाही. मुख्य दिवाणी व फौजदारी दावे चालविण्याकरिता ज्यूडिशियल कमिशनर हा न्यायाधीश १९२१ पासून नेमण्यांत आला आहे. पण कोर्टात वकील वर्ग मुळींच नाही त्यामुळें न्याय मिळण्याचें काम फार खर्चाचें होतें, पण कज्जेदलाली फार वाढते, या कारणस्तव चीफांचा वकिलीच्या धंद्याला जोराचा विरोध आहे.
सन १९०० पासून १९१४ चें महायुद्ध सुरू होईपर्यंत अशांटीमध्यें अंतर्गत शांतात नांदून देशाची बरीच सुधारणा झाली. बासेल मिशननें चालविलेल्या शाळांच्या संख्येंत सरकारी शाळांची भर पडून शिक्षणप्रसार होऊं लागला. व कोकोची लागवड बरीच वाढली. १९१४ च्या रिपोर्टात अशांटीचे लोक पूर्ण राजनिष्ठ असल्याचें चीफकमिशनर फुल्लर यांनीं म्हटलें आहे, व महायुद्धकालीहि ती राजनिष्ठा कायम राहिली. पण नवीन लष्करी शिक्षणपद्धती न रुचल्यामुळें सैन्यांत मात्र अशांटी लोक फारसे शिरले नाहींत. [संदर्भ ग्रंथ— ए. ब्रि. लंडन येथून कोलनियल ऑफिस प्रसिद्ध करीत असलेले अशांटीसंबंधीं रिपोर्ट. एलिस— ए हिस्टरी ऑफ दि गोलडकोस्ट ऑफ वेस्ट आफ्रिका. ब्रॅकनबरी— नॅरेटिव्ह ऑफ दि अशांटी वार स्टॅन्ले—कुमासी. फ्रीमन—ट्रॅव्हेल्स इन अशांटी ऍंड जमन. स्टेट्समन ईयर बुक इ.]