विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अशोक (राजा) — (ख्रि. पू. ३७३—२३२) मौर्य वंशांतील तिसरा राजा; चंद्रगुप्त मौर्याचा नातू. ज्याच्यासंबंधी आपणांस आज समकालीन अस्सल लेखांवरून माहिती मिळूं शकते असा हा हिंदुस्थानच्या इतिहासांतील पहिलाच राजा होय. हे अस्सल लेख म्हणजे अशोकाचे शिलालेख होत. त्यांशिवाय बौद्ध वाङ्मय व सीलोन येथील बखरी यांमध्यें याच्याविषयीं बरीच हकीगत सापडते. परंतु ग्रीक लोकांनीं याचें नांव सुद्धां उच्चारलेलें दिसत नाहीं किंवा प्राचीन ब्राह्मणवाङ्मयांत याचा कोठें उल्लेखहि आढळत नाहीं. यूरोपीय विद्वानांनीं अशोकासंबंधी शोध ज्या वेळीं चालविले होते त्यवेळीं सीलोन बखरीच त्यांनां उपयोगी पडल्या. सीलोन येथील पुस्तकांच्या सहाय्याशिवाय शिलालेखांतील पियदस्सी राजा व इतिहासांतला अशोक या दोनहि एकच व्यक्ति होत्या हा शोध कधींहि लागला नसता, असें र्हीस डेव्हिड्सला वाटत होतें. परंतु १९१५ सालीं रायचूरजवळ निजामाचया राज्यांत मस्की गांवीं हुद्दी येथील पुरातन सोर्याच्या खाणीच्या आसमंतांतील प्रदेशांत सापडलेल्या शिलाशासनलेखांत इतरत्र कोठेंहि नसलेलें अशोकाचें नांव आढळून येऊन त्यानें मागील शोधास अगदीं आकस्मिक रीतीनें पुष्टि मिळाली आहे. जेम्स प्रिन्सेप या विद्वानानें हे शिलालेख वाचून त्यावरून त्यानें हा शोध लाविला व त्याच्या सहाय्यानें आतां शिलालेखांचा अर्थ आपणांस चांगला लावितां येतो. सीलोन येथील बखरी ऐतिहासिक दृष्टया तितक्या निर्दोष नाहींत ही गोष्ट जरी खरी आहे; तथापि त्या टाकून केवळ शिलालेखांवर अवलंबून राहून याबद्दल माहिती मिळवावी असें म्हणणेंहि वाजवी नाहीं. कारण शिलालेखांत सुध्दां त्यांच्या परीनें दोष आहेतच. तेव्हां उत्तरकालीं लिहिलेल्या हकीकती वाचल्याशिवाय शिलालेखांवर योग्य तो प्रकाश पडणें अशक्य आहे असें र्हीस डेव्हिड्स म्हणतो.
अशोकाची माहिती सुसंगत तर्हेनें दिलेली अशी चार ठिकाणीं सापडते. (१) नेपाळ मधला बौद्ध संस्कृत भाषेंत लिहिलेला, “अशोक अवदान” नांवाचा ग्रंथ (२) ब्रह्मदेशांत असलेलें पाली भाषेंतील दीपवंश नांवाचें पुस्तक (३) विनयावरील टीकेंत बुद्धघोषानें दिलेली हकीकत व (४) सीलोनमधील पालींत असलेलें महावंशाचें पुस्तक.
या हकीकतीची ऐतिहासिक रीतीची तुलना र्हीस डेव्हीड्स या पंडितानें रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांत एका ठिकाणी (१९०१ सालचा अंक पृ. ३९७—४१०) दिली आहे ऐतिहासिक दृष्टीनें तुलना केल्यास या लेखकांच्या काव्यमय ग्रंथांतूनहि बर्याच गोष्टी गोळा करतां येतात.
अ शो का चे शि ला ले ख.—तथापि त्यांच्या प्राचीनतमतेमुळें अशोकाचे शिलांलेख हेच हिंदुस्थानच्या इतिहासाच्या अभ्यासकास अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिन्सेंट ए. स्मिथनें या लेखांचें सेनार्ट व एफ. डब्ल्यू थॉमस यांच्या मतांशी शक्य तोपर्यंत विरोध न होऊं देता पुढें दिल्याप्रमाणें कालानुक्रवार वर्गीकरण केलें आहे—
शा स न ले ख.
दोन (किंवा तीन) दुय्यम
शिलाशासन लेख ..... ख्रि. पू. २५७
भाब्रू शासनलेख ... ... ... अजमासें याच काळांतील
चौदा शिलाशासनलेख ... ख्रि. पू. २५७— २५६
कलिंग शासनलेख ... ... ,, २५६ किंवा २५५
सात स्तंभलेख ... ... ... ,, २४३ व २४२
चार दुय्यम स्तंभलेख ... ... ,, २४१ व २३२
२ कि र को ळ अं कि त ले ख
अशोकंची लेण्यांची दानें ... ख्रि. पू. २५७ व २५०
तराईचे स्मरणतिथिविषक अंकित लेख ... ,, २४९
दशरथाचीं लेण्यांचीं दानें ... ... ,, २३२
दुय्यम शिलाशासन लेखः — पहिल्या व महत्त्वाच्या वर्गांत पहिल्या दुय्यम शिलाशासनलेखाचे दोन पाठ वेगवेगळे धरल्यास एकूण ३१ दस्तऐवज आहेत व दुसर्या वर्गांत दशरथाच्या अंकित लेखाचा त्याचें मजकुराच्या व परिस्थितीच्या बाबतींत अशोकाच्या लेखाशीं साम्य असल्यामुळें अंतर्भाव केल्यास एकूण ३५ दस्तऐवज होतात.
पहिल्या दुय्यम शिलाशासनलेखांत अशोकाची मतांतरासंबंधी कबुली आहे. याच्या उत्तर हिंदुस्थानांत तीन प्रती सांपडल्या असून, त्यांपैकीं एक जबलपूर जिल्ह्यांत रूपनाथ येथें (ई. आय. आर वरील स्लीमनबाद रोड स्टेशनच्या १४ मैल पश्चिमेस), दुसरी शहाबाद (दक्षिण बहार) जिल्ह्यांत सहस्त्राम येथें, व तिसरी राजपुतान्यांतील जयपूर संस्थानांत बैराट येथें,कोरविलेली आहे. या प्रतीपेक्षां किंचित निराळया अशी तीन प्रती दक्षिण हिंदुस्थानांत म्हैसूर संस्थानाच्या उत्तर भागांतील चित्रदुर्ग जिल्ह्यांत एकमेकांच्या जवळजवळच ब्रह्मगिरी, सिद्धपूर व जतिंग रामेश्वर येथें सांपडल्या आहेत. दुसरा दुय्यम शिलाशासनलेख लहान व पहिल्यास पुरवणीदाखल असून त्याची भाषाशैली इतरांहून निराळी आहे. हा लेख दक्षिणेच्या सुभेदारीवर असलेल्या राजपुत्रानें सुवर्णगिरी येथें रचून प्रसिद्ध केला असावा, असा अंदाज करण्यांत आला आहे.
भाब्रूचा शासनलेख.— हा पूर्वीं राजपुतान्यांतील उपर्युक्त बैराट गांवाजवळ एका बौद्ध मठाच्या आवारांत शिळेवर होता; परंतु सुरक्षित राहावा म्हणून हल्लीं तो कलकत्यांस नेऊन ठेविलेला आहे. याच विशेष म्हटला म्हणजे यांत यामगधराजानें बुद्धाच्या धम्माबद्दल व संप्रदायाबद्दल आपला आदर व्यक्तकेला असून त्यानें धर्मग्रंथांतील जी वचनें उद्भृत केलीं आहेत त्यांपैकीं पांच उपलब्ध बौद्ध सात वाङ्मयांत असल्याचें दाखवून देण्यांत आलें आहे.
चौदा शिलाशानलेखः— हा अशोकाच्या अंकित लेखांपैकी अतिशय महत्त्वाचा वर्ग असून त्यांत अशोकानें आपल्या तत्त्वांची व वास्तविक आचारांची सविस्तर हकीकत दिली आहे.
या जौदा शासनलेखांपैकी पहिला अहिंसेवर, दुसरा अशोकाच्या धार्मिक कृत्यांवर, तिसरा अधिकार्याच्या पंचवार्षिक फिरतीवर, चौथा धर्माचरणावर, पांचवा धर्ममहामा त्यांवर, सहावा कामाच्या उरकेवर, सातवा धार्मिक गुणांवर आठवा धर्मयात्रांवर, नववा मंगल समारंभांवर, दहावा यश व कीर्ति यांवर, अकरावा धर्मदानावर, बारावा परमतसहिष्णुतेवर व तेरावा धर्मविजयावर असून चौदावा उपसंहात्मक आहे.
या लेखांच्या प्रती उत्तरेस पेशावरापासून दक्षिणेस म्हैसूर पर्यंत व पश्चिमेस काठेवाडपासून पूर्वेस ओरिसापर्यँत व हिंदुस्थानच्या सर्व भागांत सांपडल्या आहेत. व आणखीहि सांपडण्याच्या संभव आहे. पाटलीपुत्रापासून हजार मैलांहूनहि अधिक अंतरावर देखील बारावा खेरीज करून हे सर्व शासनलेख एका टेकडीवरील प्रचंड काळवथरी (ट्रॅप) शिलेचया पूर्वपश्चिम भागावर २४ फूट लांबा व १० फूट रुंद एवढया एसेपैस जागेंत कोरविलेले आढळतात, परमतसहिष्णुतेवरील बारावा शासनलेखाह थोडक्यात वर्षापूर्वी मुख्य शिलालेखापासून ५० यार्ड अंतरावर एक स्वतंत्र शिलेवर कोरलेला आढळून आला. हजारा जिल्ह्यांत मान्सेरा (अॅबटाबादच्या उत्तरेस सुमारें १५ मैल) येथें जी प्रत आहे तींतहि बाराव्या शासनलेखांस स्वतंत्र स्थान दिलें आहे. या शासनलेखांचा सर्वांत उत्तम पाठ डेराडून जिल्ह्यांत खालसी (सहाराणपूरहून चकतला जाणार्या सडकेवर, मसुरीच्या १५ मैल पश्चिमेस) यथ १८६० सालीं सापडला तो आहे. यां व अगदी वायव्य भागांतल्या खेरीज सर्वच शिलालेखांत जिच्यापासून देवनागरी वगैरे हिंदुस्थानांतील लिपी निघाल्या ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी ब्राह्मी लिपी वापरललेली आहे. शहाबाजगढीच्या लेखाची लिपी मात्र यांच्याहून भिन्न, इराणांत जन्म पावलेंली, उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी अशी आहे. ठाणें जिल्ह्यांतील सोपारा (मुंबईच्या उत्तरेस) येथील व काठेवाडांतील गिरनार येथील शिलालेख हे या शासनलेखांचे पश्चिमेकडील पाठ दर्शवितात. सोपारा येथें आठव्या शासनलेखाचे थोडके शब्द असलेला तुकडाच फक्त हातीं लागला आहे. गिरनारच्या लेखाचा विशेष म्हणजे अर्वाचीन पंडिताचें लक्ष वेधून घेणारा तोच पहिला असून त्याचें वर्णन कर्नल टॉड यानें १८२२ मध्यें प्रथम केलें आहे. तो गिरनार व इतर टेकडयांच्या दरम्यान एक प्रचंड वज्रतुंड (ग्रॅनाइट) जातीच्या शिलेवर कोरलेला असून ही शिला प्राचीन काळीं सुदर्शन नामक एका मानवनिर्मित तळयाच्या कांठी होती. हे तळें अशाकोचा आजा चंद्रगुप्त याच्याच हुकुमावरून बांधलें गेलें असून अशोकाच्या काळी त्यांत सुधारणा करण्यांत आली होती. याच शिलेच्या दुसर्या भागांवर एक उत्तरकालीन (इ. स. ४५५) लेख असून त्यांत या तळयाचें धरण फुटल्याचें नमूद केलें आहे. ओरिसात धौली येथें व गंजीम जिल्ह्यांत जौगड येथें असलेले शिलालेख या शासनलेखाचें पूर्वेकडील पाठ होत.
कलिंग शासन लेखः— हे दोन असून ते ओरिसांतील धौली (पुरी जिल्ह्यातील भुवनेश्वरच्या दक्षिणेस ७ मैल) येथील व गंजम जिल्ह्यांतील जौगड येतील शिलालेखांतील पाठांत ११ व्या, १२ व्या व १३ व्या शासनलेखाच्या जागीं आले आहेत; त्यात अशोकानें आपल्या अधिकार्यांस या नवीन जिंकलेल्या प्रदेशांतील रानटी लोकांचा स्वतःवर विश्वास बसवून घेण्याविषयी व राजा आपले लेकरांप्रमाणे पालन करील अशी त्यांची खात्री पटवून देण्याविषयीं आज्ञा केली आहे. यांपैकी एक वर्षातून तीनदां, व दुसरा दर महिन्यास ठराविक दिवशीं, लोकांनां वाचून दाखवावयाचा होता.
सात स्तंभलेखः— यांत अशोकानें आल्या मागील कृत्यांचें समालोचन केलें आहे. पहिल्यांत व दुसर्यांत त्यानें आपली धम्माच्या ठायीं आसक्ति व्यक्त केली आहे. आत्मपरीक्षण हा तिसर्याचा विषय आहे. चौथ्यांत त्यानें आपल्या अधिकार्याच्यांची (राजुकांची) कर्तव्यें व अधिकार नमूद केले आहेत. पांचव्यांत प्राण्यांच्या हिंसेला मर्यादा घालण्याविषयीं नियम आहेत. साहाव्यांत ज्यानें त्यानें आपल्या धर्माप्रमाणें वागावें, माझी स्वतःची इच्छा जेणेंकरून मनुष्यमात्राच्या सुखाची अभिवृद्धि होईल तें करावें अशी आहे, असे सांगितले आहे. सातवा स्तंभलेख सर्वांत मोठा व महत्त्वाचा असून त्यांत अशोकानें धम्माच्या प्रसारासाठीं काय काय उपाय योजिलें त्याचें परीक्षण केले आहे. पण यात अशोकानें परदेशी पाठविलेल्या उपदेशकमंडळाचा उल्लेख कोठे आलेला नाही. अशोकाचे एकंदर दहा कोरविलेले स्तंभ उपलब्ध झाले आहेत; पण सातचे सातहि स्तंभलेख, जो तोपर्याहून दिल्लीस आणला त्या दिल्ली- तोपरा स्तंभावरच पूर्ण शाबूत सापडले आहेत. दिल्लीमीरत स्तंभावर १—६ लेख छिन्नविच्छिन्न स्थितींत आहेत. अलाहाबाद स्तंभावर लेख असून शिवाय राणीचा व कौशांबीचा लेख आहे, पण ते सर्व अपूर्ण स्थितीत आहेत. चंपारण्यातील लौरिया- अरारज व लोरिया- नंदनग स्तंभावर पहिले सहा लेख बहुतेक चांगले शाबूत आहेत. चंपारण्यातील रामपूर्वीच्या पडलेल्या स्तंभावरहि हेच लेख उत्तम स्थितींत आहेत. सांचीच्या स्तंभावर दुय्यम स्तंभलेखाचे काहीं काहीं भाग आहेत. सारनाथच्या लेखात तेच लेख पण अधिक पूर्णावस्थेंत आहेत. याशिवाय रुम्मिनदेयी व निग्लिव येथें दोन स्मरणतिथिविषयक स्तंभ आहे. ह्युएनस्तंग यानें १६ स्तंभाचा उल्लेख केला असून आपणास ठाऊक असलेल्या स्तंभापैकीं फक्त दोघांचाच त्याच्या स्तंभाशी खात्रीपूर्वक मेळ घालता येतो.
दुय्यम स्तंभलेख:— हे चार आहेत. सारनाथच्या शासन लेखांत बौद्धसंप्रदायांतील वाढत्या पंथभेदाचा धिककार केलेला आहे. कौशांबी व सांची येथील शासनलेखाचाहि विषय तोच आहे. बौद्ध संप्रदाय चिरकाल टिकावा अशी आपली स्वतःची इच्छा त्यांत अशोकाने व्यक्त केली आहे. चौथा लेख राणीसंबंधी असून त्यांत दुसर्या राणीची दानें तिच्याच नांवावर चालावींत अशी आज्ञा आहे.
स्मरणतिथिलेख.— तराईतील या लेखांपैकी रुम्मिनदेयी स्तंभावरील लेखांत अशोक बुद्धजन्मभूमीच्या दर्शनास आला त्याबद्दल माहिती असून निग्लिव स्तंभावरील लेखांत म्हटलें आहे की अशोकानें आपल्या राज्याभिषेकानंतर १४ वर्षांनी कोनकमन (बुद्धचा एक पूर्वींचा अवतार) बुद्धच्या स्तूपाचा दुसर्यांदा जीर्णोद्धार केला, व त्यानंतर सहा वर्षांनी त्यानें स्वतः दर्शनास येऊन तेथें स्तंभ उभारला हा स्तूप कोणता याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
अशोकाची व दशरथाचीं लेण्यांची दानें.— अशोकाच्या लेण्यांच्या दानासंबंधी लेख तीन असून त्यांत बराबर डोंगरांतील तीन लेण्याचें आजीविकांस यावच्चंद्रदिवाकरौ दान केलें असल्याचें नमूद केले आहे. नागार्जुनाचा लेख अशोकाचा नसून त्यांत अशोकामागून राज्यारूढ झालेल्या दशरथानें आपल्या राज्यभिषेकानंतर लागलींच तीन लेणीं आजीविकांनां राहण्यासाठीं दान केल्याचा उल्लेख आहे.
अ शो का चें च रि त्र.— वरील शिलालेखांतील माहितीस बौद्ध ग्रंथातल्या माहितीची जोड देऊन अशोकाचे चरित्र लिहितां येतें. अशोकानें आपल्या शिलालेखांत स्वतःची खाजगी माहिती जवळजवळ मुळींच दिलेली नसल्यामुळें तिच्यासाठीं आपणांस बौद्धग्रंथांतील दंतकथात्मक माहितीवरच विसंबून राहावे लागतें. या साधनांवरून अशोकाच्या कारकीर्दीतील ज्या प्रसंगावर प्रकाश पडतो ते थोडक्यांत पुढें दिल्याप्रमाणें आहेत. त्याच्या बापाचें नांव बिंदुसार असून त्याची आई चंपा येथील कोण्या ब्राह्मणाची कन्या होती असें म्हणतात. बापाच्या हयातींत प्रथम तो तक्षशिलेचा व नंतर उज्जनीचा सुभेदार होता. उज्जनीला असताना त्यानें वेदिस (विदिशा?) येथील एका वैश्य स्त्रीशी लग्न लाविलें असून तिच्यापासून त्यास (ज्यांनां दुसरे त्याचा बंधु व भगिनी म्हणतात ती) महिंद्र व संघमित्रा ही दोन अपत्यें झालीं असें सर्व सिलोनी ग्रंथ म्हणतात. अशोकानें या आपल्या वैश्य पत्नीस उज्जनी सोडतांना मागेच ठेविलें होतें. बापाच्या मरणानंतर ख्रि. पू. २७३ (कांहीच्या मतें २७२) मध्यें त्यानें तक्षशिलेच्या सुभेदारीवर असलेल्या आपल्या वडील भावांशीं युद्ध करून बापाची गादी बळकाविली. ख्रि. पू. २६९ सालीं त्याला राज्याभिषेक झाला. ख्रि. पू. २६१ मध्यें त्यानें कलिंग देश काबीज केला. या युध्दांतील संहाराचा त्याच्या मनावर परिणाम होऊन त्याचा बुद्धधम्माकडे कल झालीं. इ. स. २५९ मध्यें त्यानें मृगया करणें सोडून दिलें, व ठिकठिकाणीं उपदेशक मंडळें पाठविलीं. २५७ व २५६ सालीं त्यानें चौदा शिलाशासन लेख व कलिंगाचा लेख प्रसिद्ध केला, व धर्ममहामात्र (त्य?) नेमिलें. २५४ मध्यें त्यानें कोनगमनचा स्तूप दुसर्यांदा वाढविला. २५१ किंवा २५० सालीं महेंद्राचें उपदेशकमंडळ सिलोनाला गेलें. २४९ सालीं त्यानें बुद्धसंप्रदायाच्या पवित्र क्षेत्रांची यात्रा केली. २४२ सालीं स्तंभलेख प्रसिद्ध केले. २४० व २३२ यांच्या दरम्यान पाटलीपुत्राची धम्मसभा झाली व अशोकानें दुय्यम स्तंभलेख प्रसिद्ध केले आणि २३२ सालीं तो मरण पावून त्याचा एक नातू दशरथ हा पूर्वेकडील प्रांताचा व बहुधा संप्रति हा पश्चिमेकडील प्रांताचा राजा झाला.
अशोकाला चार राण्या होत्या असें अनुमान करण्यांत आलेले आहे; पण त्याच्या शिलालेखावरून जें कांहीं नक्की समजतें तें एवढेंच कीं, करुवकि घराण्यांतली त्याचीदुसरी राणी ही त्याची आवडती असून ‘तीवर’ हा तिचा पुत्रा होता. तीवर हा बापापूर्वीच मरण पावलेला दिसतो.
अशोकाच्या कारकीर्दींचे सविस्तर विवेचन इतर ठिकाणी (बुद्धोत्तर जग, पृ. २४४) आलें असल्यामुळें तें येथें देण्याची आवश्यकता नाहीं. अशोकाच्या इतिहासाची अस्सल साधनें जे त्याचे शिलालेख त्यांत त्याच्या कारकीर्दीतील राजकीय गोष्टींपेक्षा त्याच्या धम्मविषयक कल्नपांचीच माहिती जास्त आली आहे. तेव्हां या शिलालेखावरून त्याच्या धम्माची शक्य तितकी स्पष्ट कल्पना आपण करून घेतली पाहिजे.
अ शो का चा ध म्म.— अशोकाच्या शिलालेखांवरून जर कशासंबंधी सविस्तर माहिती मिळत असेल तर ती त्याच्या धम्मासंबंधी होय. धम्मशब्दाचा अर्थ, सद्भावनेच्या मनुष्याला करण्यास योग्य असे आचरण; किंवा सामान्य बुद्धीच्या माणसातला जें स्वाभाविक वाटेल असलें आचरण. याचे प्रवर्तक भिक्षू लोक होत. त्यांनांच लोकहि या बाबतींत गुरुस्थानी मानीत, व धम्म हा शब्द ज्यांनां आपण आज बौद्ध समजतों, त्यांच्या प्रांतांसाठी रूढ होता. आचारात्मक यज्ञयागादि कर्म किंवा, देवतायजनात्मक कर्मे या गोष्टींशी, अर्थात बुद्धमर्धनुयायांचा मुळीच संबंध नव्हता. त्यांच्या मतें धम्माच्या पायर्या तीनः- उपासक, परिव्वाजक व अर्हतपदाकडे जाऊं इच्छिणारे लोक. या तीन तर्हेच्या लोकांकरिता तीन प्रकारचा धम्म. पैकीं, उपासकांच्या करितां म्हणून असणारा— उपासकांच्या अधिकाराप्रमाणें त्यांनां बरा वाटणारा— जो धम्म त्याचाच प्रसार अशोकानें सर्वत्र केला. अशोकाचा धम्म याचें ऐतिहासिकदृष्टया महत्त्व फार आहे, तेव्हां तो येथें समग्र देतो.
शिलाशानलेखः— (१) यज्ञाकरितां प्राणिहिंसा कोणीहि करू नये. (२) मोठमोठया ठिकाणीं होणारे जलसे व मेजवान्या यांत हत्या होत असल्यानें हीं करावयाचीं नाहींत. (३) आईबापाशीं नम्रतेनें असणें चांगले, (४) स्नेही मित्र नातलग, ब्राह्मण, व भिक्षु यांजबद्दल कृपणबुद्धि नसणें, (५) प्राणिहिंसा न करणें चांगले. (६) वादविवादामध्यें व खर्चामध्यें काटकसर होईल तेवढी करणें (७) आत्मसंयम (८) चित्तशुद्धि. (९) कृतज्ञता (१०) श्रद्धा (७—९) या सर्व गोष्टी ज्याला कांहीं देण्याचें सामर्थ्य नाही अशाला सुद्धां शक्य आहेत. व त्या त्यानें आचरणांत आणाव्या. (११) घरांत मनुष्य आजारी असतां, लग्नाच्या वेळेस. अपत्य जन्माच्या वेळेस, प्रवासास निघण्याच्या वेळेस, पुष्कळ लोक मंगल गोष्टी म्हणून समारंभ करितात, हे सर्व समारंभ शुष्क होत. खरा धर्म म्हणजे धम्म शब्दानें व्यक्त होणारा जो तोच होय. यामध्यें गुलाम नोकर इत्यादिकांशीं योग्य वर्तन गुरुजनांचा मान ठेवणें, ब्राह्मण व भिक्षु यांशी कृपणता न धरणें, हीं सर्व येतात. व हाच धम्म होय. सर्व प्रसंगी करण्याचा मंगल प्रसंग हाच होय. दानशूरता हा गुण होय असें लोक म्हणतात. परंतु दुसर्याला धम्म शिकविणें व शिकण्यांत मदत करणें यासारखी दुसरी दानशूरता नाहीं. (१२) तितिक्षा, सहिष्णुता. कोणत्याहि पंथांतील मनुष्य असो, तो सामान्य माणूस असो, भिक्षु असो, सर्वांना सारखा मान द्यावा, स्वसंप्रदाय यशाला चढावा म्हणून कोणत्याहि संप्रदायाची निंदा करूं नये. वाणीचा संयम करणें, ही गोष्ट अत्यंत इष्ट होय. (१३) धम्म चांगला; पण धम्म म्हणजे मनामध्यें मोह बिलकुल न ठेवणें, दुसर्याच्या कल्याणाच्या गोष्टी होतील तेवढया करणें, दया, उदारता, सत्याचरण व पावित्र्य यांचा समावेश धम्मांत होतो. मनुष्याला स्वतःची सत्कृत्यें तेवढीं दिसतात; दुष्कृत्यें तेवढीं दिसत नाहींत तो मी एक अमुक चांगली गोष्ट केली असा उच्चार करून दाखवितो, पण एखादी विशिष्ट वाईट गोष्ट माझ्या हातून झाली असा उद्गार त्याच्या तोंडानें निघत नाही. अशा तर्हेनें आत्मपरीक्षण करितां येणें ही गोष्ट अत्यंत कठिण आहे. याच्या विशिष्ट गोष्टींमुळे आपले पावित्र्य भ्रष्ट होतें, पशुवृत्ति, निर्दयता, क्रोध व अहंकार या गोष्टी जोरावतात; तेव्हां सदर गोष्टी करूं नयेत’ असे म्हणून प्रत्येकानें स्वतःचें संयमन केलें पाहिजे.
हा धर्म जरी फारसा लोकांच्या आचरणांत आलेला नव्हता, तरी ध्येय या नात्यानें सर्वमान्य झाला होता याबद्दल शंका नाहीं. कारण सर्वमान्य गोष्टींबद्दल ज्या तर्हेची भाषा सामान्यतः वापरण्यांत येते तसल्याच तर्हेची या धम्मासंबंधानें भाषा वापरलेली आहे. यांत वादविवाद किंवा दुसर्याच्या शंका खोडून काढण्याचा प्रयत्न कोठेहि दिसत नाहीं. अशोकानें धम्माचा प्रसार आपल्या साम्राज्याच्या कक्षेंतच केला असें नव्हे. तर ख्रि. पू. २५५ च्या सुमारास कोरविलेल्या तेराव्या शिलालेखांत सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया, एपायरस आणि सायरीनि (कायरीनि) यांच्या राज्यांत आपण धम्मप्रसार केला असें अशोकानें लिहिलें आहे. याशिवाय दक्षिण हिंदुस्थानात चोल व पांडय यांच्यांतहि धम्माचा प्रसार झाला. मोग्गलीचा पुत्र तिस्स यानें, काश्मीर, गन्धार, हिमालय, सिंधुनदीच्या तीरावरील प्रदेश, ब्रह्मदेशाच्या किनार्यावरचा प्रदेश, दक्षिणहिंदुस्थाना व सीलोन येथें आपले धर्मप्रचारक पाठविले होते. त्यांची नांवे बखर कारांनीं दिली आहेत. बखरकारांच्या लेखांत यासंबंधी सर्व नावें जशींच्या तशीच जेथल्या तेथें आलेली आढळतात. याचें एकच स्पष्टीकरण देतां येणें शक्य आहे व तें हेंच की, बौद्ध धम्माचा प्रसार करणारे लोक खरोखर हिमालयापर्यंत गेले असले पाहिजेत, व त्यांच्य हकीकती सीलोनच्या बखरकारापर्यंत अविच्छिन्न परंपरेनें तोंडी चालत आल्या असल्या पाहिजेत. या बखरींत अशोकानें संप्रदाय प्रसारार्थ ग्रीसवर पाठविलेल्या मोहिमीचें वर्णन नाहीं.
अ शो का चीं शि ल्प का में.— ज्याबद्दल आपणांस खात्रीलायक माहिती मिळते अशा अशोकविषयक दुसर्या गोष्टी म्हणजे अशोककालीन शिल्पकाम व नकसीकाम या होत. अशोकानें बांधलेल्या इमारतीपैकी कोणतीहि इमारत जमिनीवर शाबूत अशी सांपडत नाहीं ही गोष्ट खरी; परंतु सांची येथे जो शिलालेख सांपडला आहे, त्यावरून इतर काहीं विद्वानांप्राणें र्हीस डेव्हिड्सचेंहि असें मत होतें कीं, अशोकानें बोधगया येथें पहिलें देऊळ बांधिलें सांचीचें जुनें नांव चेतियांगरी असें आहे. हें सथळ अशोक उज्जनीला जाण्यापूर्वींच प्रसिद्धीस आलेलें असावें. या पर्वताच्या माथ्यावर अकरा स्तूप आहेत त्यांपैकी कांहीं इ. स. १८२२ व कांही १८५१ त सांपडले. खणतीच्या दुसर्या खेपेस कांहीं लहान लहान स्तूपांत सारीपुत्त व मोग्गलान नांवाचे जे बुद्धाचे प्रमुख शिष्य होते त्यांची रक्षा सापडली.
यांतील सर्वांत मोठा स्तूप कोणास उद्देशून बांधला गेला हें त्या स्तूपांतील अवशेषांची पेटी न सांपडल्यामुळें कळत नाहीं. तरी पण, अशोकाच्या काळांतील लिपींत लिहिलेले बरेच शिलालेख खांबांवर व कठडयावर सांपडतात. जनरल कनिंगह्यामच्या मतें, या पठारावरील इतर स्तूपांप्रमाणें हा स्तूपहि अशोकाच्या पूर्वींचा, व दरवाजे वगैरे अशोकानंतरचे असें असलें तरी यांतले बौद्ध धर्तीवरचे कठडे वगैरे तरी अशोकाच्या वेळचे असले पाहिजेत; दरवाजे सुद्धां अशोकच्या वेळचे नसतील असें नाहीं. सांची येथील स्तूपाचा जो अवशेष आपणांस उपलब्ध होतो त्याच्यावरून अशोकाच्या काळांतील इमारतींची कल्पना होऊं शकते असें र्हीस डेव्हिड्स म्हणतो. आज बहुतेक सर्व स्तूप पडीतच आहेत; यांचें मूळरूप कसें असावें हें समजून घेण्याचाहि चांगलासा प्रयत्न कोणीं केलेला दिसत नाही.
बोधगया येथें अशोकानें बांधलेल्या देवळांतील मुख्य सिंहासन तेवढें अशोकाच्या वेळचें आज कायम असावें असें वाटतें. बाकीचा भाग ब्रिटिश सरकारच्या सुधारणेनें बदलला आहे; जुन्या इमारती कायम ठेवतांना त्यांत डागडुजीच्य वेळीं फेरफार होणें साहजीक असतें.
अशाकानें बांधलेली इमारत आज जमिनीवर उभी नसली तरी पाटणाच्या दक्षिणेस कुम्रहार गांवाच्या खालीं जे प्राचीन अवशेष सांपडेले आहेत त्यांवरून अशोकाच्या राजवाडयाची कांहीशी कल्पना करतां येते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकाच्या आरंभी कर्नल वाडेल यानें प्रथम उपर्युक्त गांवाच्या हद्दीत अशोकाच्या स्तंभाचे कांहीं तुकडे खणून काढले. तेव्हा प्रश्न असा उद्भवला की, हे तुकडे एखाद्या राजवाडयाच्या खांबाचे तर नसतील? भूपृष्ठाखालीं असा एखादा राजवाडा सापडण्याच्या उघडउघड संभव दिसत असतांहि खणतीचे काम मोठया प्रमाणावर समाधानकारक रीतीनें करण्यास पुराणवस्तुखात्याजवळ पैसे नसल्यामुळें हा कुतूहलजनक शोध कित्येक दिवस लांबणीवर पडला. शेवटी मुंबईच्या रतन टाटा या पार्शी गृहस्थानें हिंदुस्थानांतील कोणत्याहि प्राचीन शहराच्या जागेची पद्धतशीर खणती करण्यासाठीं कालाची मर्यादा न घालतां सालीना २०,००० रुपयांची देणगी दिली, तेव्हां हें काम हातीं घेतां आलें. खणतीअंती खरोखरच असें आडळून आलें कीं, वाडेल यास सांपडलेले तुकडे एकठ्या दुकट्या खांबाचे नसून तेथें नीट ओळींनीं उभे केलेले अखंड दगडी व घासून चकचकीत केलेले कित्येक खांब होते. यांपैकी कांहीचा पाया पाशी व्यास साडेतीन फूटपर्यंत असून उंची वीस फुटा इतकी होती, व ते चुनार येथील वाळूच्या दगडाचे केलेले होते. अर्थात् हे अवशेष अशोकाच्या राजवाडयाच्या एखाद्या भव्य दिवाणखान्याचे असले पाहिजेत हें सिद्ध झालें. हे स्तंभ समांतर ओळीत असून प्रत्येक दोन ओळींत व दोन खांबांत अंतर १५ फूट होतें. इमारतीची रचना पूर्वपश्चिम होती. खणतीच्या पहिल्याच वर्षीं आठ आठ स्तंभांच्या दहा ओळींची जागा निश्चित झाली होती, परंतु इमारत याहूनहि विस्तीर्ण असली पाहिजे असें अनुमान करण्यास सबळ पुरावा होता. या इमारतीची तक्तपोशी लांकडाची होती असें दिसून येत असून ती सध्यां जमिनीखाली १७ फूट गेलेली आहे. या तक्तपोशीवर आठदहा फूट जाडीचा मातीचा थर असून त्यावर राखेचा थर आहे. स्तंभाचे तुकडे सांपडतात ते याच वरील थरात होत. प्रत्येक स्तंभाच्या जागेवर मातींतून थेट तक्तपोशीच्या सपाटीपर्यंत गेलेला राखेचा लहानसा वर्तुळाकार खांब सापडतो. डॉ. स्पूनर यानें या गोष्टींचे असें स्पष्टीकरण दिलें आहे कीं, एकेकाळीं केव्हां तरी [त्याच्या मतें कदाचित् गुप्तकाळांत (इ.स. ३२०—४८०)] ही इमारत पुराखालीं बुडून गेली असावी. हा पूर, आठ नऊ फूट गाळाचा थर जमिनीवर बसविण्याइतका दीर्घकालीन असावा हा गाळाचा थर बसत असतांना पुरानें पाया कच्चा होऊन एक स्तंभ उलटून पडेलला दिसतो, परंतु बाकीचे स्तंभ मात्र होते तसेच टिकून राहिले. पूर ओसरून गेल्यावर, वर आलेल्या सपाटीचीच तक्तपोशी करून कोणी तरी ती जागा वापरीत असल्याची चिन्हें दिसतात. नंतर पांचव्या शतकाच्या सुमारास आग लागून जो कांही वाडयाचा भाग उरला होता तोहि नष्ट झाला. आगीनें इमारतीचें वरचें लांकडी बांधकाम जळून खाक झालें. दगडी स्तंभावर साल वृक्षाच्या लाकडांच्या केलेल्या जड तुळयांमध्यें स्तंभशीर्ष न ठेवतांच घातल्या असून त्या खालच्या स्तंभास कोणत्या तरी धातूच्या (बहुधा तांब्याच्या) जाड कांबीनीं मजबूत बसविलेल्या होत्या असें दिसतें. इमारतीस जेव्हां आग लागली तेव्हां तिच्या उष्णतेनें धातूच्या कांबीचें प्रसरण झालें व त्यामुळें दगडी स्तंभांचा वरील भाग विदीर्ण होऊन त्याचे शतशः तुकडे झाले; पण स्तंभाचा मातींत पुरलेला खालचा भाग सुरक्षित राहिला. या आगीमुळें मूळच्या मातीच्या थरावर राखेचा थर बसला; व जेव्हां मातीच्या थराखालील लांकडी तक्तपोशी कुजून खालींखाली जाऊं लागली तेव्हां तिच्या बरोबर दगडी स्तंभहि खालींखालीं जाऊन प्रत्येक स्तंभाबरोबर वरील राखेचा थरहि खाली जाऊं लागला.
वरील अनुमानें अगदी स्पष्ट आहेत. तथापि पुराणवस्तु नाही. संशोधकास घोटाळयांत पाडणारी गोष्ट म्हणजे स्तंभांच्या दिवाणखान्याच्या दक्षिणेस सांपडलेली साल वृक्षाच्या लाकडांची सांत पीठें होत. प्रत्येक पीठ ३० फूट लांब, ६ फूट रूंद व साडेचार फूट उंच आहे व तीं सर्व पूर्वपश्चिम, एकमेकांपासून निरनिराळया अंतरावर पण परस्परांना समांतर अशीं व आश्चर्य करण्याजोग्या शाबूत स्थितींत आहेत. हीं पीठें काय होती याबद्दल निरनिराळया लोकांचे निरनिराळे तर्क आहेत. स्थानिक लोकांचा ती पीठें त्या मौर्य सम्राटांच्या खजीना ठेवण्याच्या पेठया होत्या असा इतका दृढसमज होता कीं एक पीठ संबंध खोलून ही गोष्ट नाशाबीत करणें अत्यंत जरूर वाटलें. त्याप्रमाणें एक पीठ फोडून पाहतां तें सर्व भरीव आढळून आलें. डॉ. स्पूनरचा असा तर्क आहे कीं, यांपैकी प्रत्येक पीठ कदाचित अतिशय जड असलेल्या एक किंवा दोन दगडी स्तंभांचा पाया म्हणून असण्याचा संभव आहे.
वरील संशोधनानें पुराणवस्तुसंशोधकास आज अशोकाच्या राजवाडयाचा नकाशा बनविणें शक्य झालें असून या इमारतीचें पर्सेपोलीसच्या सुप्रसिद्ध शतस्तंभी दिवाणखान्याशीं अतिशय साम्य दिसतें. फार तर काय अवशेषांमधील एका तुकड्यांवर शिल्पकारांची जी एक विशिष्य खूण आढळून आली आहे ती पर्सेपोलीसच्या शिल्पकारांच्या तसल्यास खुणेसारखी इतकी दिसते कीं अशाकानें आपला राजवाडा बांधण्यास पर्सेपोलिसचेच शिल्पकार आणले होते की काय अशी शंका उपस्थित करण्यांत आली आहे.
अ शो क का ली न न क्षी का म.— ओशोककालीन कलेचा उच्च दर्जा त्या वेळचें जें नक्षीकाम उपलब्ध आहे. त्यावरून चांगला ठरवितां येतो. दगडावर काम करणारा कारागीर जणूं काय लांकडावर व हस्तिदंतावर काम करणार्या कारागिरांचाच नमुना आपल्यापुढें ठेवून काम करीत होता कीं काय असें दिसतें. कदाचित् अशोकाच्या आग्रहावरून लांकडावर काम करणार्यांपैकीं कांहीं हुशार करागिरांनींच दगडावर काम करण्याची संवय करून त्याचें नक्षीकाम करून दिलें असण्याचा संभव आहे. व्हिन्सेंट स्मिथच्या मतें अशोककालीन कलेवर इराणी व हेलेनिक कलांचा परिणाम झाला असला तरी तिचा आत्मा हिंदीच राहिला असून हातोटींतहि बदल झालेला नाहीं. एक सारनाथचा सुप्रसिद्ध स्तंभशीर्ष जरी पाहिला तरी वरील विधानाच्या सत्यतेबद्दल खात्री झाल्याशिवाय राहणार नाही असें तो म्हणतो. ग्रीक कलेचा ज्यानें बारकाईनें अभ्यास केला आहे असा सर जॉन मार्शल सारनाथच्या स्तंभावरील सिंहाची अतिशय तारीफ करून म्हणतो कीं, यांत दिसून येणारा रेखीवपणा व कांटेतोलपणा कोणत्याहि प्राचीन राष्ट्राच्या कलेंत आढळून येणार नाहीं. तत्कालीन पाथरवटांचे कौशल्य अगदीं अप्रतिम दिसतें. स्तंभशीर्ष वगळून चाळीस फूट उंचीचा दाणेदार वाळूच्या दगडाचा अखंड स्तंभ म्हणजे कारागिरीची कमालच म्हटली पाहिजे. दगडास घांसून गुळगुळीत करण्याचें कौशल्य आधुनिक कारागिरांसहि साधणें शक्य नाही असें म्हणतात. बराबर लेणी अत्यंत कठिण अशा जंबूर (ग्रीस) खडकांत कोरविलेली असतांहि त्यांच्या भिंती काचेसारख्या गुळगुळीत आहेत. तोपर्याहून दिल्लीस आणलेल्या फिरोजशहाच्या लाटेची जिल्हई इतकी उत्तम आहे की कित्येक प्रेक्षकांनां तो धातूचाच स्तंभ वाटला आहे, अशीच सर्वांग परिपूर्णता लाकडी कामांतहि होती असे डॉ. स्पूनर कुम्रहार येथें सांपडलेल्या पीठावरील कामावरून म्हणतो. (व्हिन्सेंट स्मिथला ही पीठें चंद्रगुप्ताच्या काळाइतकी जुनीं असण्याचा संभव वाटतो.)
[सं द र्भ ग्रं थः— जे.एम. मॅकफायल-अशोक स्मिथ, अशोक (रुलर्स ऑफ इंडिया) दुसरी आवृत्ति १९०९; र्हीस डेव्हिड्स-बुद्धिस्ट इंडिया; स्मिथ- एडिक्ट्स ऑफ अशोक; राइस,एडिक्ट्स ऑफ अशोक इन म्हैसूर; थॉमस, फेथ ऑफ अशोक (जैनिझम); कनिंग ह्याम-इनस्क्रप्शन्स ऑफ अशोक (कोर्पस् इन्स्र्किप्सिओनम् इंडिकारम्, भाग१); वडिल— डिस्कव्हरी ऑफ दि एक्सॅकट साइट ऑफ अशोकाजक्लासिक कॅपिटल ऑफ पाटलिपुत्र; महाराष्ट्रीय ज्ञानकोश, बुद्धोत्तर जग; मनोरंजन जून १९२३ (चौदा शिलाशानलेख, कलिंग लेख व इतर तीन लेख यांचे मराठी भाषांतर.)]