विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अश्वगंधा — यास आस्कंद, अजगंध, ढोरगुंज अशींही नांवे आहेत. हें झाड खानदेश, नाशिक, वर्हाड व घाटावर बहुतेक ठिकाणीं आढळतें. यांची उंची सुमारें २ हात असून हें झाड ४।५ वर्षें राहतें. यांचीं पानें कोर्हाटीच्या पानासारखी असून त्यापेक्षां मोठी असतात. ह्यास गुंजेसारखी लाल फळें येतात. व त्यांत रिंगणीच्या फळाप्रमाणें बीं असतें. झाडांच्या मूळास आस्कंद म्हणतात. तो फार पौष्टिक असतो.
उपयोग.- याचें ताजें वाळलेंले फळ औषधी आहे; परंतु सिंध, वायव्य सरहद्दीचे प्रांत, अफगाणिस्तान व बलुचिस्तान येथें दूध घट्ट करण्याकरितां रेनेट म्हणजे वांसरांच्या जठरातींल पाचक अम्लाच्याऐवजीं याचा उपयोग करतात व हाच त्याचा मुख्य उपयोग होय. फळांतील विपाककारी द्रव्य मिठाच्या पाण्यांत (१०० भाग पाण्यांत ५ भाग मीठ) लवकर उतरतें व पाण्याचा उपयोग केल्यास दही लवकर दाट होतें. आस्कंद ही एक महत्त्वाची औषधी आहे. तिचा उपयोग पुढील कामांकरिता होतो.
वीर्यवृद्धीवर.- आस्कंदाचे चूर्ण, तूप व मध विषम भागानें घेऊन सायंकाळी घ्यावें व त्यावर दूध प्यावें.
गर्भाच्या पुष्टी करितां.— आस्कंदाचा काढा करून घ्यावा म्हणजे गर्भाला पुष्टि मिळून मूल सशक्त निपजते.
शरीर निरोगी होण्यास.— आस्कंदाचें चूर्ण १ तोळा व गुळवेलीचें सत्त्व १ मासा मधांत घ्यावें. याप्रमाणें आस्कंदाचे निरनिराळे उपयोग आहेत.