विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अश्वत्थ — पिंपळ. अश्वत्थ शब्दाचा अर्थ घोडेठाण असा होईल. याच्या लांकडाची केलेली जहाजें ॠग्वेदांत उल्लेखिलेलीं दिसतात. (१. १३५, ८; १०, ९७, ५) व या झाडाचा उल्लेख पुढील वैदिक वाङमयांत अनेक ठिकाणीं आला आहे (अथर्व. २. ६, १; ४. ३७, ४इत्यादि) अग्निमंथन करण्यासाठीं मंथा अश्वत्थ वृक्षाचा व अरणि शमीची लागे (अथर्व ६.११,१; शत. ब्रा. ११. ५, १, १३). या वृक्षाला ‘वैबाध’ (विनाशकारी; बांडगूळ) असेहि नांव आहे; कारण दुसर्या वृक्षांवर आपली मुळें रुजवून त्यांचीं पाळेंमुळें हा खणून काढतो. (अथर्व. ३.६) यांची फळें गोड असून पक्षी खातात (ॠ. १. १६४, २०-२२). तिासर्या खर्गात अश्वत्थ हें देवसदन मानिले आहे (अथर्व. ५. ४. ३; छां. उप. ८.५, ३; कौषी. उप. १. ३) यावरून अश्वत्थाची महती मंत्रकलांतहि स्थापित झाली होती. असें दिसतें.
‘अश्वत्थः सर्व वृक्षाणां’ या गीतावचनावरून या वृक्षाचें पौराणीककालीं का महत्त्व होतें तें कळतें. चातुर्मास माहात्म (अ. २०), कार्तिक माहात्म (अ. ४), श्रावण महात्म, व्रतकौमुदी, व्रतराज वगैरे ग्रंथातून याचें माहात्म वर्णिले आहे. याची मुंज करितात, याचें तुळशीशीं लग्न लावितात. संस्कारविधीतून याच्या समिधा वापरल्या जातात.
हा वृक्ष हिंदुस्थानाखेरीज इतर कोणत्याहि देशांत आढळत नाहीं. गांवात, रानात, अरण्यात अशा सर्व ठिकाणी हा असतो. कोठें कोठें या झाडाचा विस्तार इतका होतो की यांच्या छायेंत तीन चारशे माणसें सहज बसूं शकतील. हा वृक्ष फार वर्ष वांचतो. व त्यात अनेक अलौकिक औषधि धर्म असल्यामुळें हिंदु लोकांत तो फार पवित्र मानितात. यामुळें श्रद्धवान लोक या वृक्षास दगडी पार बांधतात. पिंपळाचे लाकूड सरपणासारखे जाळूं नये अशा हिंदुलोकांत नियम आहे. पिंपळास बारीक फळें येतात व या झाडावर लाख फार पैदा होतो. लाखेचे उपयोग, व्यापार, चिकटण्याची कृति वगैरे “लाख” या सदराखालीं सापडेल. पिंपळाची छाया थंड निरोगी व श्रमहारक असते. या कारणानें हीं झाडें देवळाजवळ रस्त्याचे दुतर्फा प्रवाशी लोकांच्या सोईसाठी मुद्दाम लावितात.
औ ष धी उ प यो ग —वैद्यशास्त्राच्या दृष्टीनें पिंपळमधुर, शीत, तुरट, स्त्रीरोगहारक, दाह, पित्त, कफ व व्रण याचा नाश करणारा आहे. पिंपळाची साल पाण्यांत किंवा दह्यात उगाळून लावावी. किंवा सालीची राख व चुना लोण्यांत खलून लावावी. अफूवर पिंपळाच्या सालीचा काढा करून द्यावा म्हणजे अफू उतरेल. उपदंशाच्या म्हणजे गरमीच्या चटयावर पिंपळाच्या वाळलेल्या सालीची राख टाकीत जावी म्हणजे चट्टे कोरडे पडून बरे होतात. मुलांची बोबडी वाचा शुद्ध होण्यास पिंपळाचीं पिकलेलीं फळें खाण्यास द्यावीत. लहान मुलांच्या अंगांवर पुटकुळया येतात त्यांवर पिंपळाची साल व विटकर एकत्र करून लावावी. अग्निदग्ध व्रणवर पिपळाच्या सुक्या सालीचें चूर्ण तुपांत कालवून लावावें. धुपणीवर पिंपळाची साल एक तोळा, ताकाच्या निवळीत कढवून साखर घालून द्यावी याप्रमाणें पिंपळाचे अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. [संदर्भग्रंथः— वेद, संहिता, ब्राह्मण, वगैरे. वेदिक इंडेक्स. धर्मसिंधु. पदे— वनौ. गुणादर्श. मुं. गॅँ. बॉटनी.]