विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अश्वपति — हें नामाभिधान अनेक पौराणिक व्यक्तींनां असे. त्यापैकी प्रमुख मद्रदेशाचा प्राचीन काळीं असलेला राजा तो होय. सावित्रीचा पिता (सावित्री पहा)
२ कैकय देशाचा राजा, यास, युधाजित नामक पुत्र व कैकेयी नामक कन्या, अशी दोन अपत्यें होतीं. हीच कैकेयी रामचंद्राचा पिता दशरथ त्याची स्त्री (वा. रा. अयो. स. १). या राजाची स्त्री म्हणजे कैकेयीची माता, परम साहसी होती. त्याविषयीं अशी कथा आढळते कीं, या राजास संपूर्ण पक्ष्यांची भाषा समजत असल्यामुळें त्यास एकदा जृंभ पक्षाच्या कांहीं चमत्कारिक भाषणश्रवणानें हास्य आलें. तेव्हां ती समीप होती म्हणून तिनें यास त्याचें कारण विचारिलें. राजा म्हणाला, हें मी सांगतांच मरेन, असें आहे. तेव्हां तें मला पत्करलें असेंहि ती म्हणाली. तें तिचें भाषण ऐकून तिला राजाने घरांतून घालवून दिलें होतें. (वा.रा. अयो. स. ३५)