विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अश्विनी (१) — एका नत्रक्षांचें नांव अश्विनीच्या तारका कोणी दोन व कोणी तीन मानतात. या तीन तारका म्हणजे ग्यामा, बीटा व आल्फा एरायटीजया होत. तिहींत दोन जवळजवळ आहेत, त्यांत उत्तरेची तेजस्वी आहे. आश्विनांत संध्याकाळीं ह्या पूर्वबिंदूंच्या किंचित् उत्तरेस उगवतात; आश्विन महिन्यास आश्विन हें नाव याच नक्षत्रावरून मिळालें असून त्याचें कारण त्या महिन्यांत चंद्र अश्विनी नक्षत्रीं पूर्ण होतो. या नक्षत्राच्या तीन तारा मानिल्या तर त्यांची आकृति घोडयाच्या तोंडासारखी दिसते. अश्विनीरूप धारण करणार्या संज्ञा नामक सूर्यपत्नीच्या ठायीं अश्वरूपधारी सूर्यापासून दोघे अश्विनीकुमार झाले अशी कथा आहे तिचा संबंध अश्विनी नक्षत्राशीं दिसतो. वेदादिकांतील अश्विनौ (दोन अश्वीदेव) म्हणून ज्या प्रसिद्ध देवता (वेदविद्या पृ. ३२७ पहा) त्या मूळच्या तारारूप होत असें कै. शं. वा. दीक्षित म्हणतात. बहुधां शुक्र आणि गुरु यांस अश्विन हें नांव प्रथम असावें अशी त्यांची समजूत होती.
ॠग्वेदांत ‘अश्विनी’ (५. ४६, ८) हा शब्द किंवा इतर संहितांत अश्विनी नक्षत्रासाठीं वापरलेला ‘अश्वयुज’ (५. ५४. २) हे दोनहि शब्द प्रत्येकीं एक एक वेळ आले आहेत. तथापि पहिला देवपत्नी या अर्थी व दुसरा रथास घोडे जोडणारे या अर्थी योजिलेला आहे. तैत्तिरीय संहिता (४.४,१०), तैत्तिरीय ब्राह्मण (१.५,१) व अर्थववेद (१९.१) यांत इतर नक्षत्रांबरोबर या नक्षत्राचाहि उल्लेख आहे, पण सर्वत्र तो अश्वयुजौ या स्त्रीलिंगी शब्दानेंच केलेला आहे. तो शब्द द्विवचनी आहे यावरून त्या काळीं या नक्षत्राच्या दोन तारकाच मानीत असत हें उघड होतें. पारम्कर सूत्रांत ‘त्रिषु त्रिषु उत्तरादिषु स्वातौ मृगशिरसि रोहिण्याम’ असें वचन असून त्याची व्याख्या हरदत्तानें उत्तरा, हस्त, चित्रा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, उत्तराभाद्रपदा, रेवती, अश्विनी अशी केली आहे. सांप्रत चित्रा, श्रवण, धनिष्ठा व अश्विनी ही मुहूर्त ग्रंथांत विवाहनक्षत्रांत नाहींत, महाभारतांत या नक्षत्राचें नांव अनुशासन पर्वात (अ० ६४ व ८९) सर्व नक्षत्रांबरोबर दोनदां आलें आहे. तेथें त्यासाठी अश्वयुजौच्या ऐवजीं हल्लीं प्रचारांत असलेली अश्विनी हा शब्द योजिलेला आढळतो.
(२) सोमाच्या सत्तावीस स्त्रियांतील एक.तशीच अकूराच्या स्त्रियांतील एक (प्रा. को.)
(३) नकुल सहदेवाची माता (महाभारत, शांतिपर्व)
(४) सूर्याजी अश्वरूप झालेली स्त्री व अश्विनांची माता.