विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टक — विश्वामित्र ॠषीस, माधवीपासून झालेला पुत्र. हा मोठा वेदवेदांगपारग असून यानें एकदां स्वतः यज्ञ केला, त्या काळीं याच्या यज्ञास बहुत ॠषी व राजे आले होते. पुढें हा यज्ञ समाप्त झाल्यावर आपले तिघे बंधूः— प्रतर्दन, वसुमना, आणि शिबि; यांसहित रथांत बसून, कोठें जात असतां, मार्गांत नारदास पाहिल्यावरून त्यास यानें रथांत घेतलें आणि पुसूं लागला कीं, स्वर्गांत गेल्यावर, आम्हां चौघांतून आधीं कोण पतन पावेल तें सांगा. तेव्हां नारदानें प्रथम तूं, नंतर प्रदर्तन, मग वसुमना असे पतन पावाल, शिबिमात्र अढळ राहील असें सांगून त्याचीं कारणेंहि दिलीं. (वनपर्व अ. १९८)
आत्मश्लाघेंनें स्वर्गातून पतन पावलेल्या ययाति राजास यानें आपलें व आपल्या बंधूंचे पुण्य दान करून पुन्हां स्वर्गस्थित केलें. (आदिपर्व अ. ८६ उद्योग अ. १२१.) हा अष्टक विश्वामित्र कुलांतील प्रवरप्रवर्तक आणि ॠग्वेदांतील कांही सूक्तांचा द्रष्टा होता. (बुद्धपूर्वजग पृष्ट ४८८)