विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टग्राम — म्हैसूर संस्थानांत, श्रीरंगपट्टण जवळच्या कावेरीच्या दोन्ही तीरावरील प्रदेश. जैन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारलेल्या बाराव्या शतकांतल्या विष्णुवर्धन ह्या होयसल राजानें हा प्रदेश वैष्णवपंथी रामानुजाचार्य यांनां दिला होता. त्यांनीं त्याचे आठ गाव करून त्यांची व्यवस्था करण्यांकरिता ब्राह्मणांच्या नेमणुका केल्या. पंधराव्या शतकाच्या अखेर विजयानगरच्या नरसिंग राजानें वरील ब्राह्मणांचे बहुधा वंशज असणारे जे नागमंगलाचे राजे त्यांचा पराभव करून श्रीरंगपट्टण घेतले म्हैसूरच्या राजाच्या अमदानींत नदीच्या उत्तरेकडील प्रदेशास पट्टण अष्टग्राम व दक्षिणेकडील प्रदेशास म्हैसूर अष्टग्राम तालुके अशी या मुलुखाची विभागणी झाली. १८६३ मध्यें अष्टग्राम विभागांत म्हैसूर व हसन, असे दोन जिल्हे येत असत पण १८८० त हा विभाग नाहींसा करण्यांत आला. (इं. गॅ. ६)