विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टवसु — वसूंचा वेदांत उल्लेख आहे, त्यांचे पौराणिक स्वरूप वैदिक स्वरूपापेक्षां निराळें आहे. पौराणिक स्वरूप असें: चालू वैवस्वत मन्वंतरांतील धर्मॠषि त्या पासून प्राचेतस दक्षकन्या वसु, तिच्या ठायीं झालेलें वसुसंज्ञक आठ देव ते. हे प्रस्तुत सत्यविध देवांतील पांचवे देव असून, यांचीं नांवे धर, ध्रुव, सोम, अहः, अनिल, अनल प्रत्यूष, आणि प्रभास, अशीं आहेत (भार. आदि अ. ६६) पुराणांतरी, हींच नांवें कित्येकांची असून कांही वेगळीं आहेत. उदा. भागवतांत, द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु व विभावसु हीं आहेत.