विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टान्हिक पर्व — आषाढ, कार्तिक आणि फाल्गुन या तीन महिन्यांत शु. ०८ पासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस जिनमंदिरांतून नंदीश्वरबिंबाची पूजाअर्चा सुरू असते. नंदीश्वरद्वीपांत चारी दिशेला अकृत्रिम अशीं ५२ जिन चैत्यालयें आहेत. या चैत्यालयांतील ५२ मूर्तीची कल्पना करून प्रत्येक दिशेस १३ मूर्ती बसवून ५२ तीर्थकरांची एक प्रतिमा तयार केलेली असते. ती बहुतेक जिनचैत्यालयांत असते. या आठ दिवसांत पंचमेरूची स्थापना करून त्यावर नंदीश्वर बिंब (प्रतिमा) ठेवून त्याची पूजा करतात. या पर्वास ‘नंदीश्वरपर्व’ असेंहि म्हणतात. [ ‘जैन लोकांचा इतिहास’ अनंततनयकृत, १९१८ बेळगांव ]