विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टी — (मध्यप्रांत) हें वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तहशिलींतील एक मोठे गांव आहे. उ. अ. २१० १२’ आणि पू.रे. ७८ ११’ येथील लोकसंख्या सुमारें ५००० हे वर्ध्यापासून ५२ मैल वायव्य दिशेस सातपुडा पहाडाच्या दक्षिण भागाच्या पायथ्याशीं बसलेलें आहे. हें पुलगांव स्टेशनापासून ३९ मैल व आर्वीपासून १५ मैल लांब आहे. आर्वीहून अष्टीला जातांना तळेगाव लागतें. अहारांच्या अमदानींत या शहराची भरभराट होतीं.
झहांगीर बादशहानें अष्टी, आमनेर, पवनार व तळेगांव हे परगणे महमदखान नियाझी यास जहागीर दिले. हा अफगाणी सरदार असून यानें जहांगीर बादशहा व त्याचे पूर्वज यांच्यापाशीं मोठया हुद्याची कामगिरी केली. यानेंच अष्टीचें पुनरुज्जीवन करून सभोवतालचा भाग लागवडीस आणिला. याच्यानंतर अहमदखान नियाझी यानें अमंल चालविला. या दोघांच्या कबरी त्या ठिकाणीं बांधल्या आहेत. महमदखान याची कबर मोंगलाई नमुन्यावर बांधली असून ती फार सुंदर आहे. अहमदखानाची तितकी चांगली नाहीं.
अहमदखान मेल्यानंतर नियाझी लोकांची सत्ता जाऊन मराठयांचा अंमल चालू झाला. हल्ली येथे नियाझी लोकांकडे इनामी शेतीशिवाय कांहीच राहिलें नाहीं. या कबरी पुरातन असल्यामुळें हल्लीं म्युनिसिपल कमीटीच्या पैशांनीं त्याची डागडुजी करण्यांत आली आहे.
नबाब वाहिदखान हे नियाझी वंशापैकीं असल्यामुळें सरकारांनी यांना ऑनररी मॅजिस्ट्रेट केलें आहे. ही मोठया व्यापाराची जागा आहे. यांत देशी कापड, धान्य, गूळ, मसाल्याचे पदार्थ व कापूस यांचा व्यापार मोठा आहे.
म्युनिसिपालिटीनें अनेक उपयुक्त कामें केलीं आहेत. त्यांत नदीला बांध बांधून उन्हाळयांत पाणी पुरेल अशी तजवीज केली आहे.
या ठिकाणीं शाळा असून रविवारीं आठवडयाच्या बाजार भरतो. पोलीस ठाणें व लोकलबोर्ड सराई आहे.
येथें सरकी काढण्याचा व कापसाचे गठ्ठे बांधण्याचा असे दोन कारखाने आहेत. (म.प्रा. गॅ. १८७० वर्धा. गॅ.)