विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टें — (मुंबई इलाखा;) सातारा जिल्हा अष्टे गांव वाळवें तालुक्यात असून इस्लामपूरच्या आग्नेयीस १२ मैल व सातार्याहून २० मैल आहे. लोक सं. (१९०१ सालीं) १२४०९ होती. बहुतेक लोक हिंदुच आहेत. येथें म्युनिसिपालिटी आहे. पूर्वेस कृष्णा नदी वाहते व पश्चिमेस पेठ सांगली रस्ता आहे. गांवाभोवती तट असून प्रत्येक दिशेस त्याला एक दरवाजा आहे. गांवांत पोष्ट, कोर्ट, दवाखाना व इंग्रजी— मराठी शाळा आहेत.
कोटांतल्या विहिरीपासून दूर घरें असणार्यास आणि विशेषतः अस्पृश्य लोकांस पाणी आणण्यास त्रास पडतो. उन्हाळयांत तर कृष्णेचे पाणी आणावें लागतें. लोक शेतकरी असल्यामुळें गांवांत व्यापार थोडा आहे. येथील जमीन वसूल ३०००० रू. आहे. येथून पाव मैलावर बंधारा घातलेलें एक तळें आहे, परंतु त्यांत मातीचे थर जमले असल्यामुळें त्यांत पाणी सांचत नाही. याच्या पश्चिमभागांत भैरवाचें देऊळ आहे. त्याची पूजा गुरव व धनगर लोकांकडेच आहे. धनगर लोकांची कांहीं घरें त्यांचें पूर्वीचे वैभव दर्शवितात.
सन १९०३ मध्यें येथील म्युनिसिपालीटीचे उत्पन्न ३२०० रुपये होतें. कोल्हापुरांत जेव्हा १८५७ सालीं दंगा झाला तेव्हा अष्टयास ७५ घोडदळ ठेविण्यांत आलें होतें. (मुं. गॅ. १९, १८८५ इं. गॅ. ६. १९०८)
(२)— (मध्य हिंदुस्थान) भोपाल संस्थानच्या पश्चिमेकडील जिल्ह्याचें मुख्यठिकाण. १९०१ मधील लो.स. ५५३४. हें अकबराच्या वेळीं, माळवासुभ्यांतील सारंगपूर सरकारीमध्यें, एका महालाचें मुख्य ठिकाण होतें. या गांवासबोवती एक तट असून त्यांत १७१६ मध्यें दोस्त महंमदानें एक लहानसा किल्ला बांधलेला आहे. तट व किल्ला दोन्हीहि सध्यां मोडकळीस आलेलीं आहेत. १७४५ त मराठयांनीं अष्टें घेतले, परंतु १८१७ च्या तहानें तें पुन्हां भोपाळकडे देण्यांत आले. १८३७ त, खुदशिया बेगमच्या सैन्यानें नबाव जहांगीर महंमदखानाला या शहरांत वेढिलें होतें. येथें १६०२ मध्यें बांधिलेली एक मशीद, अद्याप आहे. मुख्य धंदे विणकाम, रंगकाम व चिंटे तयार करणें. येथें अफूचा बराच व्यापार चालतो.
(३) (मुंबई. इलखा) सोलापूर जिल्हा— अष्टें हें गांव माढे यांच्या नैर्ॠत्येस १५ मैलांवर आहे. लोकसंख्या १९०१ सालीं ९३६ होती. येथें. इस. स. १८१८ मध्यें फेब्रुवारीच्या वीस तारखेस जनरल स्मिथ व बापू गोखले यांच्या सैन्याची लढाई झाली व बापू गोखले मारला जाऊन बाजीरावाच्या सैन्याचा पराजय झाला. येथें एक तलाव आहे व त्यांतून दोन कालवे काढलेले आहेत. या तलावाचें बरेचसें काम इ.स. १८७७ च्या दुष्काळांत झालें व सर्वांत जास्त अशीं १९९४९ मनुष्यें एकाच वेळीं कामावर होतीं.