विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असईची लढाई — शिंदेभोसल्याचें १८०३ सालीं इंग्रजांशी जें युद्ध झालें त्यांतील ही महत्त्वची लढाई आहे. १८०० सालीं शिंदे व भोसलें यांचें इंग्रजांशीं युद्ध चालले असतां सप्टेंबर महिन्याच्या एकविसाव्या तारखेस मराठयांच्या फौजांचा तळ भोकरधन व जाफैराबाद या दोन गांवांच्या दरम्यान पडला असून त्यांच्या बरोबर चांगली कवायत शिकवून तयार केलेल्या पायदळांच्या सोळा पलटणी होत्या. त्याच दिवशीं जनरल वेलस्ली व कर्नल स्टीव्हन्सन यांची गांठ बदनापूर गांवीं पडून त्यांनीं असें ठरविलें कीं, आपल्या सैन्याच्या तुकडयांचा तळ हल्ली परस्परसंन्निध्य पडला आहे तरी आपण निरनिराळया मार्गांनी जाऊन चोविसाव्या तारखेस सकाळीं शत्रूवर हल्ला करावा. याप्रमाणें ठरून ते दोघेहि दुसर्या दिवशीं त्या ठिकाणाहून निघाले. स्टीव्हन्सन पश्चिमेकडील मार्गानें गेला व वेलस्ली पूर्वेकडील मार्गानें गेला. तेविसाव्या तारखेस वेलस्ली नौलनी गांवापाशीं येऊन पोंचला. तो तेथें छावणी देणार तोंच त्याला त्याच्या हेरांकडून असें कळलें कीं, मराठयांच्या फौजा तेथून सहा मैलांच्या आंतच कैलना नदीवर तळ देऊन पडल्या आहेत. स्टीव्हन्सन अद्याप येऊन पोचला नव्हता; तरी वेलस्लीनें त्याची वाट न पाहतां एकदम मराठयांवर हल्ला करण्याचा निश्चय केला. त्यानें आपल्या हाताखालील कॅप्पन बार्क्ले नांवाच्या सरदारास बरोबरचें सर्व सामान सुमान नौलनी गांवांत नेऊन ठेवण्याचा हुकूम केला व त्याच्या संरक्षणार्थ एखादी पलटण ठेवून बाकीच्या सर्व लोकांसह शक्य तितक्या लवकर आपल्या मागोमाग येण्याविषयीं सांगून तो स्वतः कांहीं लोक बरोबर घेऊन टेहेळणी करितां निघाला. तो एका उंच टेकाडावर येतांच त्याला असें दिसून आलें कीं, मराठयांचें सैन्य कैलना नदीच्या पैल नीरावर, जेथें ती नदी जुआनदीस मिळते तेथून जवळच तिच्या कांठा कांठाने एका लांबच लांब रेषेंत तळ देऊन पडलें आहे. तो जरा आणखी जवळ आला, तेव्हां मराठी सैन्याच्या उजव्या बाजूस फक्त फौजच असून पायदळ व तोफा ह्या सर्व डाव्या बाजूस असई गांवाजवळ आहेत असें त्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. मराठयांच्या तोफा हस्तगत करून त्या बेकाम करणयाचा त्याचा उद्देश असल्यामुळें, तो वळसा घालून मराठा सैन्याच्या डाव्या बगलेपलीकडे कैलना नदी उतरण्याकरितां गेला.
ह्या लढाईत मराठयांचें सैन्य ५०,००० वर असून त्यामध्यें खडें पायदळ साडे दहा हजार व फौज तीस हजारांवर होती असें ग्रँटडफ यानें म्हटलें आहे. इंग्रजांजवळ मात्र पुरते साडेचार हजारहि लोक नव्हतें असें दर्शविण्यांत आलें आहे. प्रस्तुत युद्धांत दक्षिणेंत शिंदे व भोसले यांचे आणि खास वेलस्ली व स्टीव्हन्सन यांच्या बरोबर किती किती सैन्य होतें या संबंधांत ग्रांट डफचा अंदाज इंग्रजांशी दुसरें युद्ध या सदराखाली आला आहे. त्याशिवाय आण्णासाहेब व चिंतामणराव पटवर्धन, बापू गोखले, निपाणकर, पाटणकर, अमृतराव, पेशवे व म्हैसूरकर यांच्या फौजांनीहिं इंग्रजांस मदत केली होती. असईच्या लढाईच्या प्रसंगीहिं पेशवे, व म्हैसूरकर यांच्या फौजा हजर होत्या असें ग्रांटडफनेंच पुढें म्हटलें आहे. परंतु त्यांच्याकडून इंग्रंजांस जवळ जवळ कांहीच मदत झाली नाही अशी त्याची तक्रार आहे व याच कारणामुळें कदाचित् त्यांचा आंकडा वर दिलेल्या इंग्रजांच्या सैन्याच्या आकडयांत धरण्यांत आल नसावा.
नंदी ओलांडून आल्यावर वेलस्लीनें आपल्या पायदळाच्या दोन रांगा केल्या व फौजेची तिसरी रांग करून ती या दोहोंच्या मागें शिलकी सैन्य म्हणून ठेवली. लढाईस उभें राहिलेल्या ह्या सैन्याची डावी बगल कैलना नदीवर असून उजवी जुआ नदीवर होती. वेल्सलीबरोबर पेशव्यांच्या व म्हैसूरकरांच्याहि फौजा आल्या होत्या. त्यांनां कैलनानदीच्या पलीकडे कांहीं अंतरावर शिस्तीनें उभें करण्यांत आलें होतें. अशा रीतीनें संगमाजवळ दोन नद्यांच्या दरम्यान लढाईसाठीं उभे राहण्यांत वेलस्लीचा दुसरा एक फायदा असा होता की,त्या योगें शत्रुसैन्याची आघाडी आपोआप आकुंचित केली गेली, कारण इंग्रजाच्या सैन्याचा आपल्या एका बगलेवर हल्ला आलेला पाहताच मराठयांनीं आपल्या सैन्याच्या दोन रागा केल्या. त्यापैकीं एक राग शत्रूच्या समोरासमोर उभी होती व दुसरीनें तिच्याशीं काटकोन केला होता. ह्या दोन्हीहि रागाच्या डाव्या बगला असई नावाच्या चांगली तटबंदी असलेल्या गावांशी जाऊन भिडल्या होत्या. इंग्रजाचें सैन्य लढाईकरिता शिस्तीनें उभे होते तोंच मराठयांच्या तोफखान्यानें शत्रुपक्षावर जोराचा भडिमार करण्यास आरंभ केला. ह्या वर्षावामुळें इंग्रजांच्या सैन्याची— विशेषतः त्यांच्या उजव्या बगलेची—भयंकर नासाडी झाली असें म्हणतात. तोफा ओढणार्या गाडयाच्या बैलजोडया ठार होऊन तोफा बेकाम झाल्या. अशा स्थितींतहि वेलस्लीनें आपल्या एका तुकडीस तसाच मराठयावर हल्ला करण्याचा हुकूम सोडला. स्वतःजवळ तोफा न राहिल्यामुळें इंग्रजाच्या ह्या सर्वच्या सर्व रागेस विपक्षीय तोफाचा मारा सहन करावा लागला. उजव्या बाजूस असलेल्या इंग्रजाच्या ७४ व्या रेजिमेंटातील बरेच लोक गतप्राण झाल्यामुळें त्याची राग अगदीं विरल झाली होती; त्यावर मराठयाकडील बरीच मोठी फौज चालून आली. तेव्हा मागें असलेल्या ब्रिटिश फौजेस पुढे येण्याविषयीं हुकुम करण्यांत आला. त्या बरोबर या फौजेनें काही एतद्देशीय फौजेसह अगदीं डबघाईस आलेल्या आपल्या पायदळाच्या रांगांतून पुढें सरसावून मराठयाचा फौजेवर हल्ला केला व तिची दाणादाण करून त्या मराठयाच्या तोफखान्यावर व पायदळा वर तुटून पडल्या. या प्रसंगी इंग्रजाच्या फौजेनें बजावलेली कामगिरी अवर्णनीय होती. असईच्या लढाईंत इंग्रजांनां मिळालेल्या विजयाचें श्रेय ह्या फौजेसच दिलें पाहिजे. या नंतर इंग्रजांचे पायदळहि नेटानें पुढें सरकलें. तेव्हां मराठयांच्या पहिल्या रांगेनें कच खाऊन ती मागें दुसरींत जाऊन मिळाली. इंग्रजाचें सैन्य संगिनी उपसून पुढें सरसावलें व त्यांनीं शत्रूच्या सर्व सैन्यास जुआ नदीपार हांकून लावलें. त्यानंतर इंग्रजांच्या फौजेनें ह्या पळणार्या लोकांचा पाठलाग करून त्यांची वाताहात केली. तथापि त्यांच्या कांही तुकडया पुन्हां एकत्र होऊन शिस्तीनें निघून गेल्या. अशाच एक तुकडीचा इंग्रजांची फौज पाठलाग करीत असतां त्या फौजेवरील सेनापति मॅक्सवेल हा मारला गेला. इग्रजांचें सैन्य शत्रूचा पाठलाग करीत असतां त्यांनां रस्त्यांत मृतवत् पडलेले किंवा शरण आल्याप्रमाणें दिसत असलेले कित्येक शत्रुपक्षाचे लोक लागले. इंग्रजांच्या पलटणीं पुढें जातांच ह्यांनी उठून त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. अर्थात इंग्रजांनां त्यावेळीं मुख्य सैन्याकडे दुर्लक्ष करून ह्या लोकांचा समाचार घेतां आला नाहीं, मराठयांची फौजहि कांहि वेळपर्यंत इंग्रजांच्या सैन्यांभोवती घिरटया घालीत होती
ह्या लढाईंत इंग्रजांच्या हातीं मराठयांच्या ९८ तोफा लागल्या. जखमी व ठार मिळून त्यांचे एक तृतीयांशाच्या वर लोक या लढाईत कामास आले. मराठयांकडील १२०० लोक ठार झाले होते व कित्येक लोक जखमी होऊन इतस्ततः पडलेले होते. शिंद्याचा कारभारी यादव भास्कर हा या लढाईत ठार झाला, रघूजी भोंसल्यानें लढाईस आरंभ झाल्यांबरोबरच समरांगणांतून पळ काढला असून शिंद्यानेंहि पुढें लवकरच त्याचें अनुकरण केलें होतें. शिंद्याच्या पायदळांतील ब्रिटिश अधिकारी इंग्रजांशीं युद्ध सुरू होतांच शिंद्याची नोकरी सोडून निघून गेले होते तरी त्याच्या पलटणीचें ह्या लढाईतील वर्तन त्यांच्या नांवलौकिकास साजेसेंच होते;
स्टीव्हन्सनला मार्गांत कित्येक अडचणी आल्यामुळें तो २४ तारखेस संध्याकाळीं वेलस्लीच्या सैन्यास येऊन मिळाला. तो दाखल होताच ताबडतोब त्याला मराठयांच्या पाठलागास पाठविण्यांत आलें. (ग्रांटडफ).