विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असंग — माध्यमिक पंथामध्यें जितकें नागार्जुनाचें महत्त्व आहे तितकेंच महायान बौद्ध धर्माच्या योगाचार पंथामध्यें असंग ऊर्फ आर्यासंग याचें महत्त्व आहे. या पंथांत विज्ञानवादाचा म्हणजे ज्ञानशक्तिव्यतिरिक्त इतर कसलेंहि असित्त्व नाहीं या तत्त्वाचा उपदेश आहे. येणेंप्रमाणें शून्यवादाप्रमाणेंच यांतहि दृश्य जगाचें सत्यत्व नाकबूल केलेलें आहे, तथापि एका अर्थी ज्ञानशक्ति आणि विचार यांच्या संबंधांत तरी त्याचें अस्तित्व मान्य केलेलें आहे. सर्व मानसिक व्यापारांचा ज्यांत अन्तर्भाव होतो अशी ज्ञानशक्ति (आलयविज्ञान) ज्याच्यामधून उत्पन्न होते असा जो निर्वाण तोच बोधि, तो एक व सत्य आहे; बुद्धाच्या असंख्य, अनन्त स्वरूपांत तो जरी व्यक्त होत असतो तरी तो एकच आहे. परंतु ही बोधिस्थिति योगाचार्यालाच म्हणजे योगाचा अभ्यास करणार्यालाच प्राप्त होते, व तीहि क्रमाक्रमनें प्राप्त होतें; बोधिसत्त्वाच्या मार्गांतील दशभूमिका किंवा दहा पायर्या चढून गेल्यावर ती बोधिस्थिति प्राप्त होते. योगाचा अभ्यास व गूढवाद हीनयान बौद्धपंथाला अगदी अपरिचित होता असें नाही; आणि त्याचा महायान बौद्धपंथांशीं पद्धतशीर रीतीनें संबंध जोडून देण्याचें काम असंगानें केलें आहे.
चरित्र — असंगाच्या चरित्रासंबंधी माहिती मिळवा. वयाची झाल्यास आपणांस परमार्थ (६ वें शतक), ह्युएन त्संग (७ वें शतक), इ त्सिंग (७ वें शतक) आणि तारानाथ (१६ वें शतक) यांनीं लिहून ठेवलेल्या बखरी पाहाव्या लागतील. त्या पाहतां खालील माहिती उपलब्ध होते. उत्तर हिंदुस्थानांतील पुरुषपुर येथें कौशिक कुळांत त्याचा जन्म झाला. तिघा भावांत हाच सर्वांत वडील असून वसुबंधु नांवाचा सर्वांत धाकटा भाऊ धार्मिक व वाङ्मयीन चळवळींत असंगाच्या बरोबरीनें असे. वानप्रस्थाश्रमाची ज्या शाखेंत त्याला दीक्षा मिळाली ती महिशाखक नांवाची बौद्ध संप्रदायांतील अतिशय प्राचीन शाखा होती; पण पुढें असंग, हल्ली जिला असंगाची विज्ञाति-मात्रता म्हणतात त्या बौद्ध पंथाकडे वळला. त्याच्या विज्ञातिमात्रतावादावर त्याच्या पूर्वधर्माचा बराच पगडा बसलेला अद्यापि आपणाला दिसून येतो.
ह्युएनत्संगच्या मतें त्याच्या चळवळीचें केंद्र अयोध्या नगर होतें. या ठिकाणीं त्यानें जाहीररीतीनें लोकांस उपदेश केला व ग्रंथ लिहिले; व बहुतकरून येथेच शरयूच्या तीरीं त्यानें आपला बंधु वसुबंधु यास परमध्येयाकांक्षी महायानपंथाची दीक्षा दिली; परमार्थाच्या मतें पुरुषपुर गांवी ही गोष्ट घडली. तथापि एक गोष्ट स्पष्ट दिसतें कीं, असंग व त्याचा भाऊ यांचें अयोध्येच्या दरबारीं वळण असे व ते राजा बलादित्य आणि त्याचा पिता विक्रमादित्य गुप्त यांचे समकालीन होते जर हा विक्रमादित्य घराण्यांतील दुसरा चंद्रगुप्त असेल तर त्याचा काल इ.स. पांचव्या शतकाचा पूर्वार्ध होईल; पण जर स्कंदगुप्त असेल तर उत्तरार्ध होईल. दुसर्या रीतीनेंहि हाच काल येतो. ह्युएनत्संग असें सांगतो की, इ.स. ६३३ मध्यें जेव्हां त्यानें आपला गुरूला म्हणजे शीलभद्राला पाहिलें तेव्हा तो १०७ वर्षांचा होता. शीलभद्राचा गुरू धर्मपाल असंगाचा अनुयायी होता. याप्रमाणें ५ वें ख्रिस्ती शतक हा असंगाचा काल ठरविण्यास आपणापाशीं पुरेशीं साधनें आहेत असें जपानी पंडित आनेसाकी छातीठोकपणें म्हणतात (असंग, एन्सा. रि. एथिक्स. १९१०) लेव्ही वगैरे पंडित असंगाचा काळ यांच्यामागें ओढतात.
असंगानें लिहिलेल्या अनेक शास्त्रग्रंथाची ह्युएनसंगनें यादी दिली आहे. ते संध्या आपणांत चिनी भाषांतरांतून पहावयास मिळतात. आज एक सुद्धा मूळ प्रत उपलब्ध नसली तरी, त्यांच्या परंपरेची सत्यता निःशंक पटण्याजोगी आहे, कारण त्यापैकी बरेचसे ग्रंथ ह्युएनत्संगने चीनमध्यें नेले व तो स्वतः असंगाच्या तत्त्वज्ञानाचा पूर्वेकडील श्रेष्ठ पुरस्कर्ता होता. यांपैकी विशेष महत्त्वाचे ग्रंथ खालीं दिलें आहेतः—
योगाचार्यभूमि — यांत योगसाधनाचें वर्णन असून त्यांच्या योगे मनुष्याला एकामागून एक प्राप्त होणार्या अवस्था दिल्या आहे. मैत्रेयप्रकटीकरणाचा हा ग्रंथ आहे. याचा एक भाग (बोधिसत् भूमि) संस्कृतात उपलब्ध आहे. (२) महायान— संपरिगृह. असंगाच्या मानसशास्त्राचें यात थोडक्यात दिग्दर्शन केले आहे. (३) प्रकरण— आर्यवाचा. आसंग पद्धतीचें नैतिक व व्यावहारिक स्वरूप यांत दाखविलें आहे.
महायानसूत्रालंकार — हा ग्रंथ भविष्यबुद्ध मैत्रेय प्रणीत आहे असें मानतात, पण हा ग्रंथ निःसंशय असंगाचा आहे, असें तत्शोधक एस. लेल्ही यानेंच सिद्ध केले आहे. वस्तुतः हा सर्व टीकाग्रंथ असंगाचा आहे. असंग स्वतः जरी मोठा श्रेष्ठ कवी नव्हता तरी संस्कृतामध्यें कुशलतेनें लिहिण्याइतकें प्रावीण्य त्याच्यामध्यें होते; व त्याचप्रमाणें श्लोक, आर्या इत्यादि वृत्तांमध्यें काव्य करण्याचें सामर्थ्यहि त्याच्यामध्यें होतें. तथापि त्याला कवि म्हणण्यांपेक्षां तत्त्ववेत्ता म्हणणेंच निःसंशय अधिक योग्य होय. शेवटच्या दोन प्रकरणांत बुद्धच्या पूर्णत्वाची कीर्ति गाऊन शेवटचें जें सूक्त केलें आहे त्यांत सुद्धां बुद्धाच्या सर्वांगी परिपूर्णतेचा उल्लेख करतांनं कळकळ व पूज्यभाव यांपेक्षा पांडित्यच अधिक व्यक्त झलेलें आहे. फक्त नवव्या प्रकरणांत बोधि व बुद्धत्व यांची कल्पना समजावून सांगत असतां असंगानें जे आपले बुद्धिसर्वस्व खर्च केलें आहे त्यांत मात्र प्रसंगानुसार भाषेंतील रुक्षपणा जाऊन त्या ऐवजीं कल्पनाप्रचुर व वर्णनमनोहर भाषेच्या योगानें एकंदर वर्णन प्रौढ व आल्हादकारक झालेलें आहे. उदाहरणार्थ बौद्धलोक जिच्या योगानें सर्व जगतावर प्रकाश पाडतात त्या बोधिस्थितीची एका रूपकमालिकेमध्यें तुलना खेलेली आहे.
तत्त्वज्ञा न — या साधनांवरून आपणांस असंगाची तत्त्वज्ञानपद्धति कळते. ती नागार्जुनाच्या माध्यमिकपंथांशीं तुलना केल्यास निःसंशय सत्यात्मक ठरते.जरी तिला ‘विज्ञाति— मात्रता’ असें म्हणतात व जरी असंगाच्या मतें बौद्धज्ञान म्हणजे भौतिक जगाच्या आसक्तीपासून मुक्तता, होय. तरी असंगाचें तत्त्वज्ञान प्रत्येक मनुष्याच्या स्वत्त्वाची व बाह्य विश्वाची सत्यता प्रस्थापित करतें. या बाबतींत त्याची मीमांसा सांख्यसदृश्य आहे.
असंग मनाला आलय किंवा निदुस असें म्हणतो व त्या ठिकाणीं सर्व बाह्यांतःसृष्टिविषयक गोष्टी गुप्तपणें वास करितात व तेथून आविष्कृत होतात. निदसपासून अनुक्रमानें मन, बुद्धि आणि पंच विज्ञानें उत्पन्न होतात. म्हणून त्याला, अष्टम अशी संज्ञा आहे. प्रत्येक विज्ञानेंद्रिय आलयांत साठविलेल्या बीजामुळें आपल्या बर्यावाईट हेतूचें आविष्करण करितें व अशा तऱ्हेनें आविष्कृत झालेलें विश्व सात अप्रधान मनसेंद्रियांच्या साह्यानें अष्टमा (आलया) वर प्रतिक्रिया करितें. याप्रमाणें बाह्यसृष्टीचें प्रतिबिंब आलयांत पडतें. म्हणजे विश्वाचा उगम असें निदुस हें एक आधान बनतें. आपल्या स्वतःच्या मनाचें इंद्रियविषयीकरण (ऑब्जेक्टिफिकेशन) हें वास्तविक त्या विश्वाचा उगम असणार्या मनापासून स्वतंत्र असणारें एक विश्व आहे, असें मानण्यांत मानवी जीवितांतील माया भरली आहे. हें यावरून सिद्ध झालें. या मूलभूत मायेपासून मुक्तता करून घेण्याकरिता आपण आपल्या मनाचा व त्याच्या बाह्यसृष्टिकरणाचा खरा धर्म अभ्यासिला पाहिजे. या धर्मलक्षणाच्या ज्ञानानें ज्ञानबीजाची पूर्ण वाढ होते व त्याचा परिणाम सर्व विश्वाचा आपल्या स्वतःमध्यें अंतर्भाव होण्यांत होतो. तेव्हा खर्या ज्ञानाला अनुसरून प्रथम विचाराचा व नंतर बाह्यदृग्विषयाचा आपल्या अंतरात्म्यांत अंतर्भाव करणें म्हणजेंच योगाचार. हा बुद्धपद प्राप्त होण्याल अत्यंत आवश्यक आहे.
ही प्राप्ति होण्याला सातभूमी व बुद्धच्या तीन काया (त्रिकाय) यांतून जावें लागतें; पण यांपैकी कोणतेहि तत्त्व नवीन असें नाहीं. त्याच्या वेदांताचें वैशिष्टय मन आणि त्यांतील बीजें यांच्या एका सिद्धांताला फार मेहनतीनें व विद्वतेनें दिलेल्या सुव्यवस्थितपणांत आहे. या कारणानें त्याच्या तत्त्वांवर उभारलेल्या पंथाला धर्मलक्षण असें नांव पडलें. वास्तविक हा एक धर्म नसून केवळ एक तत्त्वज्ञान आहे व जी कांही धार्मिक लक्षणें यांत आढळतात ती या पद्धतीशीं फारच विस्कळित रीतीनें जोडली गेलेलीं दिसतात.
असंगाच्या बौद्धपंथात गौतम बुद्धवरचा विश्वास कमी बसलेला दिसत असून त्याजागीं हळू हळू पुढें येणार्या मैत्रेय नांवाच्या बुद्धची उपासना आली. पुष्कळ दिवसपर्यंत हा संप्रदाय हिंदुस्थान व पूर्वेकडील देश यांतून प्रचलित होता; पण पुढें अभितायूची उपासना लोकप्रिय झाल्यावर (म्हणजे दुसरा बौद्धधर्मपंथ अस्तित्त्वांत आल्यावर) त्याचा ऱ्हास झाला व अशा रीतीनें हिंदुस्थान व चीन या देशांतून याचें उच्चाटण झालें. आंता फक्त जपानी बौद्ध लोकांनीं ज्ञानाची एक शाखा म्हणून याला जतन केलें आहे.
असंगानें बौद्धसंप्रदायांत तंत्रांचा प्रवेश केला. शैवपंथांतील देववदेवी या बुद्धोपासक ठरवून बौद्धपंथीय देवतांत ठेवून अर्धवट धर्मज्ञान झालेल्या रानटी बौध्दंनां रक्तमांसाचा नैवेद्यदेवाला दाखविण्यास मुभा ठेविली व सिद्धि, धारणि, मंडल वगैरे जादूटोण्याच्या गोष्टी या धर्मात घेतल्या. अशा रीतीनें अनेकांना पटेल असा हा धर्म केला; पण त्याचा परिणाम असा झाला की, खुद्ध असंगाच्या देशांत (हिंदुस्थानांत) व नेपाळांत शैवसंप्रदाय प्रबळ होऊन बौद्धसंप्रदाय नामशेष झाला आहे.
(संदर्भग्रंथ— परमार्थ (इ.स. ४९९— ५६९) यानें वसुबंधूंचें चरित्र लिहिलें आहे. त्यांत असंगविषयीहिं बरीचमाहिती आहे. ताकाकुसु यांनीं परमार्थाचें वसुबंधूचरित्र भाषांतरिलें आहे. (जे.आर.ए.एस. १९०५) एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्समध्यें आनेसकी यांनी असंगावर एक लेख लिहिला आहे. त्यांतील बराचसा भाग वर उध्दृत केला आहे. याशिवाय विंटरनिझ— हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर, पु. २. कर्न— मॅन्युअल ऑफ इंडियन बुद्धिझम. वाडेल— दि बुद्धिझम ऑफ तिबेट, हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.)