विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असत्प्रतिमा - पेटिका, उलटी प्रतिमा :- वुइल्यम हाइड वुलॅस्टन नामक गृहस्थानें या पेटिकेचा शोध लाविला. या पेटिकेनें यथादर्शनानुरुप चित्र काढण्यास चांगली मदत होते.
आपण डोळ्याजवळ क्षितिजाशीं ४५” कोन करणारी अशी एक कांच धरली व एक डोळा झांकून घेऊन दुसर्या डोळ्यानें त्या काचेंतून पाहिलें, तर त्या काचेच्या समोर असलेल्या पदार्थांच्या परावर्तनानें पडलेलें प्रतिबिंब त्या काचेत दिसूं लागतें. त्याचप्रमाणें कांच पारदर्शक असल्यामुळें काचेपलीकडील पदार्थहि दिसतात.
पदार्थाच्या भ्रामक (व्हर्च्युअल) प्रतिमा कागदाच्या पृष्ठभागावर पुढें आलेल्या दिसतात; व अशा स्थितींत त्यांची रूपरेषा पेन्सिलीनें सुध्दां काढतां येते. हा असत्प्रतिमा पेटिकेचा अगदीं साधा प्रकार झाला. पण त्या प्रतिमा उलटी (इनव्हर्टेंड) व विपर्यस्त (पर्व्हर्टेड) अशा असतात. त्याचप्रमाणें कांचेची परावर्तक शक्ति फार अल्प असल्यामुळें त्या तितक्या स्पष्टहि नसतात. कांचेला जर पारा लावला तर प्रतिमेचा स्पष्टपणा वाढतो. कांचेच्या अर्ध्या भागाला पारा लावून अर्धा तसाच ठेवला तर, त्या कोर्या भागांतून कागद दिसतो व पारा लावलेल्या भागांतून पदार्थांची प्रतिमा दिसते. अशा तर्हेचे साधन सूक्ष्मदर्शक यंत्राबरोबर वापरतात. आरसा नेत्रकांचेला (दुर्बिणीतून पहातांना आपल्याकडे कांच असते ती) लावून सूक्ष्म-दर्शक- यंत्र- नलिका क्षितिजाशीं समांतर ठेवतात.
प्र त्य क्ष प्र ति मा :- एकोणिसाव्या शतकाच्या आरंभींच्या सुमारास डॉ. वुलॅस्टननें प्रत्यक्ष व स्पष्ट प्रतिमा देणारी पेटिका शोधून काढली. त्यानें एक चौकोनी समपार्श्र्व भिंग तयार केलें, त्याचा एक कोन काटकोन केला व दुसरा १३५०° अंशाचा केला व बाकी राहिलेलें दोन्ही कोन सारखेच म्हणजे साडे सदुसष्ट अंशाचे ठेवले.
अशा कांचेच्या एकाबाजूवर-डोळयांचें अर्धें बुबुळ समपार्श्र्व भिंगावर व अर्धें बुबुळ बाहेर ठेविलें म्हणजे अर्ध्या भागांतून प्रतिमा दिसते व अर्ध्या डोळयानें खाली ठेविलेला कागद पाहतां येतो. अशा तर्हेनें आपण डोळा ठेविला तर पहिल्यानें एका पृष्ठभागांवर व्युत्क्रान्त प्रतिमा उठते, नंतर या प्रतिमेची प्रतिमा त्याला लागून असलेल्या दुसर्या पृष्ठभागावर पूर्ण परिवर्तनानें जशीच्या तशीच उठते. या दुसर्या प्रतिमेचीच रूपरेषा कागदावर पुढें आलेली दिसते व अशा तर्हेनें तिच्या रूपरेषावरून मूळ पदार्थाची आकृति कागदावर घेता येते. आकृतीची रूपरेषा पेन्सिलीनें गिरवून काढण्याकरितां प्रतिमा शक्य तितकी स्पष्ट कागदावर पडलेली चांगली म्हणून पदार्थ व कांच यांच्यामध्यें सोईस्कर अंतरावर एक बाह्यगोल कांच ठेवतात कारण प्रतिमा जर कागदावर स्पष्ट पडली नाहीं, तर ती गिरवणार्या पेन्सिसीलीचें टोंक व प्रतिमा एकाच समपातळींत बरोबर दिसत नाहींत व मग तितकें बरोबर गिरवणें शक्य होत नाहीं.
उ प यो ग.- प्रकाशलेखन विद्येच्या (फोटोग्राफी) शोधापूर्वीं नकाशे काढणारांनां असत्प्रतिभापेटिका हें एक महत्त्वाचें साधन होतें. ही पेटिका किमतीनें स्वस्त, आकारानें आटोपशीर, इकडे तिकडे नेण्यास सोइस्कर अशी आहे. त्याचप्रमाणें प्रतिमांचा विपर्यास यांत विशेष होत नसून हिचें क्षेत्रहि बरेंच मोठें असतें. असत्प्रतिमापेटिकेपासून पदार्थाचें अंतर त्याच्या प्रतिमेच्या अंतराच्या दुप्पट असेल तर मूळ पदार्थाच्या निम्यानें प्रतिमेचा आकार होतो. यावरून मूळ चित्रें मोठीं करणें, लहान करणें किंवा त्यांची बरोबर नक्कल करणें ह्या गोष्टी असत्प्रतिमा पेटिकेनें सहज साध्य होतात.