विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असदखान - याला नबाब, असाफ उद्दौला आणि जुमलत- उल्- मुल्क अशा पदव्या होत्या. हा प्रख्यात तुर्कोमन घराण्यांतला असून, याचा बाप इराणच्या शहा अबासच्या जुलुमामुळें हिंदुस्थानांत पळून आला होता. त्याला जहांगीर बादशहानें मोठया योग्यतेस चढवून सम्राज्ञी नूरजहान हिच्या एका नातेवाइकाच्या मुलीशीं त्याचें लग्न लावून दिलें होतें. असदखान (मूळ नांव इब्राहिम) अशा घराण्यांतील मुलगा असून प्रथम पासूनच तो शहाजहानच्या डोळयांत भरला होता. बादशहानें आपला वझीर असफखान याची मुलगी त्याला दिली व दुय्यम बक्षी या कामावर त्याला नेमिले. या हुद्यावर त्यानें १६७१ पर्यंत काम केलें. या सालीं त्याला ४००० ची मनसब मिळाली व थोडयाच वर्षानंतर वझीराचा दर्जा त्याला प्राप्त झाला. बहादुरशहाच्या कारकांर्दीत तो वकील मुतलक (वझीराच्या वरचा दर्जा) झाला व त्याच्या मुलाला मीरबक्षपद व झुल्फिकारखान ही पदवी मिळाली. पण फरुखसियर गादीवर आला तेव्हां त्याला बडतर्फ करून त्याची मालमत्ता जप्त करण्यांत आली व त्याच्या मुलाला ठार मारण्यांत आलें. यापुढें त्यानें अल्प वेतनावर अज्ञातवासांत काळ कंठिला. तथापि त्याचा लौकिक कमी झाला नव्हता; कारण १७१७ मध्यें तो वारला तेव्हां सरकारखर्चानें मोठया मानमरातबीनें त्याला पुरण्यांत आलें. (वीलचा कोश; मुसुलमानो रियासत इ.)