विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असनसोल -- (१) बंगाल प्रांतांतील बरद्वान जिल्ह्याच्या वायव्येकडील विभाग. १९०६ पर्यंत याला राणीगंज विभाग असें नांव होतें. क्षे. फ. ६१८ चौ. मैं. लो. सं. (१९११) ३८८५८२. मोठीं गांवे :- असनसोल व राणीगंज. यांत लोखंडाच्या व दगडी कोळशाच्या खाणी सांपडलेल्या आहेत. दीग्नागर येथें पितळेचीं व कांशाचीं भांडी आणि लाखेचे रंग तयार होतात.
(२) असनसोल विभागाचें ठिकाण. हें कलकत्त्याहून ईस्ट इंडियन रेल्वेनें १३२ मैल दूर आहे. हें एक महत्त्वाचें रेल्वेस्टेशन व जंक्शन असून कोळशाच्या व्याराचें एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळें येथील लोकसंख्या झपाट्यानें वाढत आहे. लो. सं. (१९११) २१९१९. येथें दोन इस्पितळें व बर्याच शिक्षणसंस्था आहेत. येथे दारू गाळण्याचे दोन व एक लोखंडी कामाचा असे तीन कारखाने चालतात. (इं. गॅ. ६. अनौंल्ड डिरेक्टरी)