विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असन्शन - असन्शन (न्युस्ट्रासेनोरा डिला असन्शन) हें पॅराग्वेंतील शहर व बंदर असून पॅराग्वे प्रजासत्ताक राज्याच्या राजधानीचें शहर पॅराग्वे नदीच्या डाव्या तीरावर आहे. उ. अ. २५० १६’ १४” व पू. रे. ५७°० ४२’ ४०” यांच्या वर ब्युनॉस एरीझच्या वरच्याबाजूस ९७० मैलांवर आहे. लोकसंख्या (१९११) १२००००. या बंदरांतून ब्युनॉस एरीझ व माँटे व्हिडियो येथें नियमितपणें बोटी जातात. व व्हिलारिकाशीं हें शहर रेल्वेनें जोडलेलें आहे. हें शहर असन्शन उपसागराच्या तीरावर सखल वालुकामय मैदानावर वसलेलें आहे. व्यवस्थित प्रमाणावर हें जें शहर वसविलेलें आहे त्याचें श्रेय डिक्टेटर फ्रॅन्सिया यास दिलें पाहिजे. मुख्य रस्ते फरसबंदी असून त्यांवर विजेचे व ग्यासचे दिवे आहेत. तसेंच ट्रामगाडया आहेत, व टेलिफोनहि आहेत. हवा उष्ण परंतु निरोगी आहे. सरासरी उष्णतामान ७२ फॅरनहीट आहे. येथें १५४७ पासून बिशपचें ठाणें आहे व धार्मिक इमारती येथें बर्याच आहेत. येथें राष्ट्रीय विद्यालय व सार्वजनिक पुस्तकालय आहे. पण शिक्षणांत फारशी प्रगति झाली नाहीं. धाकटया लोपेझनें बांधण्यास सुरुवात केलेला राजवाडा हीच या शहरांतील मुख्य इमारत आहे व सध्यां येथें एक पेढी आहे. येथें कांहीं व्यापार्यांचीं दुकानें व राहण्याचीं घरेंहि प्रेक्षणीय आहेत. परंतु बरींच घरें निव्वळ मातीच्या विटांची व धाब्याचीं आहेत. अव्यवस्थित राज्यकारभार व लोकांचे दारिद्र्य असून सुध्दां १९ व्या शतकाच्या अखेरच्या ४० वर्षांत या शहराची बरीच प्रगति झाली आहे. १९१७ सालीं ४६९८२२ टनेजचीं ३७६१ जहाजें असन्शन बंदरांत आलीं व ४७४३४२ टनेजचीं ३७६० जहाजें बाहेर गेलीं. पॅराग्वे सेंट्रल रेल्वे असन्शन पासून एन्कार्नेशपर्यंत गेली आहे. रेल्वे रस्त्याशेजारून टेलिग्रॅफ लाईन गेलेली आहे. असन्शन येथें बिनतारी तारायंत्र सुरू केलें आहे. याची स्थापना आयोलासनें १५३५ मध्यें केली. हीच ला प्लाटावरील सर्वांत जुनी कायमची स्पॅनिश वसाहत होय. बराच काळापर्यंत स्पॅनिश राज्यकारभाराचें ठाणें याठिकणीं होतें, व धर्माधिकारी व जेसुइट लोक यांमधील भांडणें येथेंच झालीं. १८११ मध्यें स्वातंत्र्य जाहीर झाल्यानंतर हें शहर डॉ. फ्रॅनिया व थोरला आणि धाकटा लोपेझ यांच्या अनियंत्रित सत्तेखालीं सांपडलें. यामुळें याच्या प्रगतीस बराच अडथळा झाला. १८६९ मध्यें ब्राझिलच्या लोकांनीं हें शहर काबीज करून लुटलें व नंतर येथें कित्येक राज्यक्रांतिकारक बंडें झालीं. १९०५ मधल्या बंडाच्या वेळीं बरेच महिनेपर्यंत या शहराला वेढा पडला होता.