विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असफखान - (१) नूरजहानचा भाऊ. याचें मूळचें नांव अबुल हसन असून, यत्कादखान, येमीन- उद्दौला इत्यादि अनेक पदव्या याला मिळाल्या होत्या. याचा बाप ध्यासबेग मरण पावल्यावर जहांगीर बादशहानें याला वझीर केलें. याची मुलगी अर्जुबंद बानो बेगम उर्फ मुम्ताझ महल (जिच्याकरितां ताजमहल बांधला ती) ही शहाजहानाला दिली होती. जहांगीरच्या मागें आपला जांवई शहाजहान गादीवर बसावा म्हणून यानें बरीच खटपट केली व नूरजहानशींहि त्या करितां शत्रुत्व केलें. हा इ. स. १६४२ त लाहोर येथें मरण पावला. मरणसमयीं याजवळ अलोट संपत्ति होती म्हणतात. मुम्ताझ खेरीज त्याला चार मुलगे होते; त्यांपैकीं शाएस्तेखान हा अवरंगजेबाच्या कारकीर्दींत बराच प्रसिद्धीस आला. [ बील, मुसुलमानी रियासत. इ ]
(२) हा मिर्झा जाफर या नांवानें प्रसिद्ध आहे. हा कझ्वीनचा रहिवासी असून तरुणपणीच हिंदुस्थानांत आला (१५७७). याचा एक जवळचा आप्त अकबराच्या पदरीं बक्षीगिरीच्या हुद्यावर होता. त्यालाहि असफखान हीच पदवी होती. तो वारल्यावर बादशहानें याला असफखान हा किताब देऊन त्याच्याच जागीं नेमिलें (१५८१). हा उत्तम कवि असून अकबरानें ‘तारीख अल्फी’ रचण्यास नेमलेल्या लेखकांपैकी हा एक होता. मुल्लामंहमदाचा खून झाल्यानंतर यानेंच हा ग्रंथ पुरा केला. ‘शीरीन- व- खुश्रो’ नांवाचें काव्य याचेंच आहे. १५९८ त अकबरानें याला मुख्य दिवाणाची जागा दिली व जहांगीरच्या अमदानींत वझारत हा उच्च दर्जा त्याला प्राप्त झाला. असफखान १६१२ मध्यें मरण पावला. आपल्या कांव्यांतून तो जाफर हें नांव स्वतः बद्दल योजीत असे. [ बील ]