विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असबस्ट - (असवेस्टॉस.) हें एक तंतुमय खनिज द्रव्य असून त्यावर विस्तवाचा परिणाम होत नसल्यामुळें त्याला अज्वलनशील असें म्हणतात. प्राचीन काळीं यूरोपांत याचे हात रूमाल, व प्रेताची राख लांकडाच्या राखेशीं मिसळू नये म्हणून कफन्या करीत.
निरनिराळ्या प्रकारच्या अॅसबेस्टॉसचे तंतू भिन्न प्रकारचे असतात. ते रेशमासारखे असल्यास त्यांनां डोंगरी ताग असें म्हणतात. हे तंतू स्वाभाविकपणें वुरणुसासारखें दाबून बसलेले असल्यास त्यांनां डोंगरी कातडें, डोंगरीबूच डोंगरी कागद वगैरे नांवें देण्यांत येतात. हल्ली सर्व प्रकारच्या अॅसबेस्टॉस मध्यें कानडांत सांपडणारा अॅसबेस्टॉस औद्योगिक दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. तो क्वेबके प्रांतांत, मुख्यतः काळें सरोवर व थेटफोर्ड यांजवळ लहान लहान नागमोडी पट्टयाच्या रूपांत आढळतो. खाणींतून खणून काडल्यानंतर दगडाचे हातोड्यानें फोडून तुकडे करितात, वाळवितात, (बारिक) चुरा करितात व नंतर चरकांतून काढितात. पुढें त्याचे तंतू निरनिराळे केल्यानंतर ते निवडले जातात.
शार्लमान राजाजवळ अॅसबेस्टॉसची एक टेबलावरची चादर होती, ती खराब झाली असतां अग्नींत घालून स्वच्छ करण्यांत येत असे. लाब्राडोरचे एस्कीमो प्राचीन काळापासून त्याच्या दिव्याकरितां वाती करीतात. सांप्रतच्या काळीं औद्योगिक कालांत अॅसबेस्टॉसचा उपयोग पुष्कळ कामाकरितां केला जातो. कितीहि ज्यास्त उष्णतामान केलें तरी यावर कांहीं एक परिणाम होत नाहीं एवढ्या एकाच गोष्टीनें नव्हे तर त्याची उष्णतावहनशक्ती (थर्मलकंडक्टिव्हिटी) फार कमी असून अम्लांचाहि त्यावर फारसा परिणाम होत नाहीं यामुळें त्याला महत्त्व आलेलें आहे. याच कारणांमुळें तापक (बॉयलर) व वाफ नेण्याच्या नळ्याभोंवतीं तो लावितात व क्षयकारी द्रवपदार्थ (करोझिव्ह लिक्विडस) गाळण्याकरितां त्याचा उपयोग करितात. विद्युद्रोधकासारखाहि त्याचा उपयोग होऊं लागला आहे. त्याचे धागे, बुरणुस, पत्रे (बोर्ड) वगैरे करून त्यांचा उपयोग सांधे, ग्रंथि (ग्लँड), तोट्या वगैरे बसविण्याकरितां केला जातो. अदाह्य बुरुणुसांचा उपयोग जमिनीवर अंथरण्याकरितां किंवा घरांवर घालण्याकरितां करितात. नाटकाकरितां अदाह्य पडदे व अग्निशामकांच्या (फायरमनांच्या) अंगांतील कपडे असबेस्टॉसचे करूं लागले आहेत. अदाह्य सीमेंट (शिमीट), गिलावा व रंग, यांमध्यें असबेस्टॉस घातलेला असतो. याशिवायहि पुष्कळ कामाकरितां असबेस्टॉसचा उपयोग होऊं लागला आहे.
उत्तर अमेरिकेंत कागद करण्यासहि याचा उपयोग करितात. हा कागद जळंला तरी त्यावरचीं अक्षरें वाचतां येतात.
कच्च्या स्वरूपांत हा पदार्थ बहुतेक सर्वत्र सांपडतो पण जगांतील कांहीं थोडयाच ठिकाणीं व्यापारास पुरेसा असा अॅसबेस्टास शुद्ध स्वरूपांत मिळतो; उदा. टिरील, हंगेरी, क्वीन्सलंड, न्यू साउथ वेल्स आणि न्यूझीलंड या देशांतून हा मर्यादित प्रमाणांत निघतो. अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांतहि पुष्कळ ठिकाणीं दिसतो. केप कॉलनींत केप अॅसबेस्टास म्हणून निळ्या तंतूचा पदार्थ आढळतो. पूर्वी इटली व कॉर्सिका येथूनच याचा पुरवठा होई; पण हल्लीं महत्त्वाचा असा पुरवठा कानडांतून होतो. १९०७ सालीं लॉईड जॉर्ज यांचा पेटेंट अॅक्ट पास झाल्यापासून याच्या व्यापाराला चांगलेंच उत्तेजन मिळालें आहे. शुद्ध अॅसबेस्टास घालून केलेल्या लंडन पोर्टलंड सीमेंटची कौलें व फरशा बांधकामांत फार उपयुक्त आढळून आल्या कारणानें बाजारांत त्यांनां फार महत्त्व आलें. गृहसौंदर्याच्या कामी ‘पॅनटाईल’ हीं कौलें आग व पाणी यांपासून घराचा बचाव करतात, एवढेंच नव्हें तर हवेचाहि त्यावर कांहीं परिणाम होत नाहीं. अॅसबेस्टासच्या हांथर्याहि जिकडे तिकडे शाळा, नाटकगृहें, कारखाने, इस्पितळें, आगगाड्या, आगबोटी यांतून उपयोजिल्या जात असून आगीप्रमाणें ओळीपासूनहि त्या बचाव करितात.
हिं दु स्था न - अॅसबेस्टॉसला मुंबईंत शंखपलित हें नांव आहे. अफगाणिस्तान पंजाब, गर्हवाल, भोपवार (मध्य हिंदुस्थान), छोटानागपूर व म्हैसूरमध्यें अॅसबेस्टॉस सांपडतो.
हिंदुस्थानांत प्रतिवर्षीं ४० ते ४८ रू. किंमतीचा म्हणजे ५|६ हंड्रेडवेट अॅसबेस्टॉस निघतो; अलीकडे अदाह्य द्रव्यांची गरज जास्त भासूं लागल्यामुळें अॅसबेस्टॉसची मागणी जास्त वाढत आहे व अॅसबेस्टॉस जास्त काढण्याचे प्रयत्न जारीनें सुरू आहेत. अलीकडे सेंट्रल इंडिया एजन्सींत सांपडेलल्या असबेस्टॉसचा नमुना विलायतेंतील इंपीरियल इन्स्टिट्यूट मध्यें परीक्षणार्थ पाठविण्यांत आला होता. तेथील अभिप्राय असा पडला कीं, येथील असबेस्टॉस ठिसूळ व मऊ असून, त्याचे धागे फार आखूड असतात. त्यांचा रंगहि हलक्या प्रकारचा असतो. तो परदेशी पाठविणें फायदेशीर होणार नाहीं परंतु त्याचा येथें उपयोग करण्यास हरकत नाहीं.
[संदर्भ ग्रंथ- फिट्झ- सर्केल- अॅसबेस्टॉस, ओटाव्हा १९०५, अॅन्युअल रिपोर्टस ऑन मिनेरल रिसोर्सेस, युनायटेड स्टेट्स जिऑ. सर्हे. मेरिल- दि. नॉनमेटॅलिक मिनरेल्स, न्यूयार्क १९०४. जोन्स- अॅसबेस्टॉस अँड अॅसबेस्टिक, लंडन १८९७. ए. ब्रि. वॅट- कमर्शिअल प्रॉडक्टस, मोडक- पदार्थ वर्णन, भाग १ ला. व्हिटकर्ग अलमॅनॅक १९२३ ]