विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असरूर - (पंजाब). खानघोडोग्रान तालुका. ही टाकीची किंवा उत्तर पंजाबची राजधानी होती. लाहोर आणि पिंडी भाटीआन यांमधील मोठया रस्त्याच्या दक्षिणेस २ मैलांवर हें आहे. ह्या गांवी इ. स. ६३० तह्युएन्त्संग हा आला होता, व त्या वेळीं ह्याचें नांव त्सिकी किंवा टाकी असें होतें, असें कनिंगहॅमचें मत आहे. पूर्वींच्या अवशेषांमध्यें सांपडलेल्या १८ इंच लांब, १० इंच रुंद व ३ इं. जाड एवढया मोठया विटा व इंडो सिथियन नाणीं यावरून या गांवाचें प्राचीनत्व सिद्ध होतें. जुन्या शहराच्या अवशेषभागाचा घेर ३ मैल असून त्याच्या वायव्य भागांत ६०० फूट लांब, ४०० फूट रुंद व ६९ फूट उंच असा एक भाग आहे. त्या ठिकाणीं २१ फूट व्यासाची एक जुनी व निर्जल विहीर आहे. येथें जुना राजवाडा होता असें कनिंगहॅमचें मत आहे. ह्या जागेसभोंवतीं लहान लहान टेंकड्यांची एक रांग आहे. हा पूर्वीच्या तटाचा अवशेष असावा. ह्युएन्त्संगाच्या वेळीं या गांवांत दहा बौद्ध मठ होते, व येथून जवळच २ मैलांवर अशोकानें एक २०० फूट उंचीचा स्तूप बांधिला होता. हा स्तूप म्हणजेच हल्लींची सालार टेंकडी होय असें कनिंगहॅमचे मत आहे. यास पूर्वीं उद किंवा उदनगर म्हणत असें सांगतात. मध्यंतरी पुष्कळ शतके हें ओसाड होतें. पुढें अकबराच्या वेळेस उगरशहानें येथें एक मशीद बांधिली.
हल्लीचें असरूर गांव फारच लहान असून तेथें फक्त ४५ घरें आहेत. (इंडियन गॅ. ६; दीक्षित- भारतवर्षीय भूवर्णन.)