विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असिक्नी - या नदीचा उल्लेख ॠग्वेदांत नदी सूक्तांत (८.२०, ५५; १००, ७५, ५) आला आहे. हिला चंद्रभागा असेंहि नांव होतें. अलेक्झांडरच्या अनुयायांनीं हिला अकेसिनीज असें म्हटलें आहे. ही नदी अलेक्झांडरनें ख्रि. पृ. ३२६ मध्यें ओलांडली. त्या वेळीं तिची त्या जागीं रुंदी ३००० यार्ड होती. व पाण्याला फार खळखळाट होता. वझीराबाद किंवा जलालाबाद यांपैकीं कोणत्या जागीं त्यानें ही नदी ओलांडली हें निश्चित नाहीं. या नदीवर अलेक्झांडर पुन्हां येऊन त्यानें एक शहर बसविलें. त्यानंतर या नदीच्या प्रवाहांत बराच फरक झाला आहे. सध्यां या नदीचें नांव चिनाव (पहा) म्हणून प्रसिद्ध आहे.