विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असिटोन - दारन अथवा असिटोन कउ३. कप्र. कउ३. हा कितन वर्गापैकीं सर्वांत खालचा कितन (केटोन) आहे. सर्व मनुष्यांच्या व विशेषत: मधुमेहाच्या रोग्यांच्या मूत्रांत व रक्तांत हा असतो. ऊर्ध्वपातन क्रियेनें लांकूड व साखर यांपासून हा काढतां येतो. खट सिरकिताचें [ख (कउ३ कप्र.३)२ ] ऊर्ध्वपातन करून हा मोठया प्रमाणावर तयार करतात. किंवा तो तयार करण्याची दुसरी कृति आहे. एका मोठया लोखंडाच्या नळींत प्यूमिसचे दगड व भारकर्बित (बेरियम कार्बोनेट) घालतात व ती नळी फिरवितात. ती फिरत असतां तींत सिरकाम्ल वायुरूप करून त्याचा प्रवाह चालू करितात; म्हणजे असियोन तयार होतो. नंतर तो अर्क द्रवीकरण नलिकेंतून घालवितात म्हणजे त्याचें द्रवरूप होतें.
असिटोन हा पातळ, निर्वर्ण द्रव आहे. याचा वास फार गोड येतो. हा पाणी, अल्कहल व इथ्र यांत द्रव पावतो. याचा उपयोग हरपुत्तिक (क्लोरोफॉर्म) करण्याकडे होतो. व कृत्रिम नीळ करण्याकरितां याचा उपयोग करितात. याचें पालाशअदिद (पोटॅशियम आयोडाइड) व ग्लिसीरीन यांशीं मिश्रण करून तें दमा लागलेल्या मनुष्यास हुंगण्यास देतात.