विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असुर - असूर हा शब्द ॠग्वेदांत सुमारे १०५ वेळां आला आहे. त्यापैकीं सुमारें ९० ठिकाणीं त्याचा उपयोग चांगल्या अर्थीं केलेला आहे, व सुमारें १५ ठिकाणीं त्याचा अर्थ देवांचा शत्रु असा होतो. त्याचा यौगिक अर्थ शक्तिमान वीर्यवान असा असून देवांनां एक सामान्य विशेषण म्हणून हा लावलेला आढळतो. वेदांत देवांच्या महद् असुरत्वाची स्तुति केली आहे. (ॠ ३.५५). अग्नि, पूषन, सोम या देवतांस हा शब्द जोडण्यांत आला आहे. व मित्र, वरुण व इन्द्र यांनां हा विशिष्ट अर्थानें लावलेला दिसतो. इन्द्राच्या बाबतींत तो वैयक्तिक बल दाखवितो, तर मित्र व विशेषत: वरुण यांच्या बाबतींत तो नैतिक व शासनबल दाखवितो. यावरून वरुणाचा अहुरमज्द या देवतेशीं संबंध जोडला गेला असावा. रा. वै. का. राजवाडे यांच्या मतें हें साम्य चुकीचें असून वरुणास इतर देवांप्रमाणेच असुर अथवा असुरपुत्र म्हटलेलें आहे. देवांनां दिवस्पुत्रास:, महस्पुत्रास: असुरस्यवीरा: असेंहि म्हटलें आहे. विन्सेंट श्चील यानें असुरदेवतांच्या दिलेल्या यादींत असुर मझाश ही एक देवता आहे व तिचा संबंध अहुरमज्द या झरथुष्ट्री देवतेशीं जोडण्यांत आला आहे (ए. रि. ए. ९ पृ. ५६८) व तो असुरमहस् याचा अपभ्रष्ट पाठ असावा असें रा. राजवाडे म्हणतात. यावरून खाल्डिनय, इराणी व भारतीय यांचे पूर्वज एकाकाळीं एकत्र असून त्यांच्या कांहीं सामान्य देवता असाव्या व नंतर त्यांच्यांत फूट पडून विशिष्ट शाखेंत विशिष्ट देवतेस प्रामुख्य येऊन इतर देवतांस गौणत्व आलें असावें व परस्परांच्या देवतांस दूषणें लावण्याची पद्धति सुरू झाली असावी, यामुळें असुर हा शब्द भारतीयांमध्यें दैत्यवाचक बनला, व देव हा शब्द इराणी शाखेंत दैत्यवाचक बनला. भारतीयांनीं इन्द्राला असुरघ्न हें विशेषण लावलें तर इराणियांनीं इन्द्राला अग्रमन्यु बनविलें. ॠग्वेदांत आपणांस पिप्रु वगैरे असुर आढळतात व त्यांस इन्द्रानें मारल्याचें वर्णन आहे (१०. १३८, ३-४). शतपथ ब्राह्मणामध्ये (१३.८. २, १) देव आणि असुर हे सपत्न व भ्रातृव्य होते असें म्हटलें आहे. तसेंच असुर हे देवांच्या दृष्टीनें अपभ्रष्ट भाषा बोलत असा शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आहे ( तेऽ पुरा हेलयो र्हेलय: इतिकुर्वन्त: पराबभृवु:). पतंजलीनेंहि वरील शब्द उद्धृत केले आहेत. शबरस्वामीनेहि 'पिक' 'नेम' 'तामरस' वगैरे शब्द असुर भाषेंतून आले असें म्हटलें आहे. ईशावास्योपनिषंदामध्यें असुर्या देशाचा उल्लेख आहे.
अष्ट विवाहांमध्यें असुर विवाहाचा एक प्रकार नमूद आहे. तो असुरांमध्यें प्रचलित असावा. तसेंच आश्वलायन गृह्यसूत्रामध्यें. श्राद्धकल्पांत उद्धरेद्यदिवा पात्रं विवृतं वा यदा भवेत्। तदासुर भवेत् श्राद्धं क्रुद्धै: पितृगणैर्गतै:॥ असा श्लोक आहे त्यावरून असुरांतहि श्राद्धविधि होता असें राजा रामशास्त्री भागवत यांनीं अनुमान काढलें आहे. असुर व आर्य हे पूर्वी एकत्र असून त्यांचा परस्परसंबंध होता असें कितपत सिद्ध झालें आहे याबद्दल तिसर्या विभागामध्यें आर्यअसुर संबंध यां प्रकारणांतहि माहिती दिली आहे.