भा षा - आपल्या भाषेला हें 'हुक्मा' असें नांव देतात. ही कोलारियन भाषावंशांतील एक पोटभाषा असून असुरी लोकांनीं आपले जेते जे मुंडलोक त्यांच्यापासून घेऊन तिला आपल्या सोयीस्कर अशी बनविली, विशेष: उच्चारांत त्यांनीं फरक केला; उदा. हुक्मा भाषेंत सांपडणारे, बहुतेक सर्व 'ह' नें आरंभ होणारे मुंडारी शब्द, ह् ऐवजीं व्ह असा उच्चार करून बोलले जातात; तसेंच मुंडारी शब्दांत न च्या पुढें स्वर आला असतां, हे लोक त्या दोहोंमध्ये य घुसडतात. यांच्या मूळभाषेचा मुळींच थांग लागत नाहीं. त्यांच्या शब्दकोषांतील शब्द कांहीं कोलारियन तर कांहीं द्राविडी उगमाचे आहेत. आर्य लोकांशीं संबंध आल्यामुळें कांही संस्कृतीद्भव शब्द या लोकांच्या भाषेंत दिसतात.
ध र्म - असुरांचा धर्म त्यांच्या कोलारी बांधवांपेक्षां निराळां म्हणता येईल. ते कोलारी लोकांप्रमाणें वन्य नाहींत, असुर राक्षसांचे उपासक नाहींत, किंवा त्यांच्यात पुरोहितसंस्थाहि नाहीं. ते अरण्य, पर्वत किंवा क्षेत्र यांतील क्षुद्र देवतांस बळी देतांना दिसतात. पण ही गोष्ट त्यांनीं कोलारी किंवा द्राविडी शेजार्यांपासून उचलली असावी. कारण ते जेव्हां या शेजार्यांपासून दूर राहतात तेव्हां या क्षुद्र देवता किंवा राक्षस वगैरेंची पूजा ते सोडून देतात. जगाचा उत्पादक व संरक्षक असा कोणी मोठा कल्याणकारी देव आहे असें हे असुर मानतात. व त्याची कोणत्याहि प्रकारें उपासना करावी लागत नाहीं असेंहि समजतात. तो सूर्याच्या रूपांत किंवा सूर्यांत असतो ही कल्पना बहुधां त्यांनीं मुंडारी जातीपासून घेतलेली दिसते. ज्या दुष्ट देवतांना ते दोन पायांचे बळी (पक्षी) अर्पण करतात त्या देवता त्रस्त व क्षुधित असे आपल्या पूर्वजांचे आत्मे असून त्यांनां शांत करण्याकरितां अन्नपाणी द्यावें लागतें अशीं या लोकांची प्रामाणिक श्रद्धा आहे. पूर्वजांचे आत्मे नवीन जन्मणार्या मुलांत पुनर्जन्म घेतात तेव्हां जातींतील लोकापासून चेटुक किंवा दृष्ट लागण्याचा संभव नसतो. मात्र परकीय मनुष्याची आपल्या बालकाला दृष्ट लागूं नये म्हणून त्याच्या पायांत लोखंडी पैंजण अडकवतात.
या लोकांत नैतिक आचारासंबंधीं विवक्षित नियम असे नाहींत. आपल्या पूर्वजांचे आत्मे संतुष्ट कसे ठेवावयाचे, एवढीच कायती यांनां विवंचना असते. मनुष्य स्वाभाविक मरणानें मला म्हणजे सदात्मा बनतो पण अपघातानें मेला तर तो दुरात्मा होतो, अशी यांची समजूत आहे. मृतांनां जाळण्यांत येतें व आठ दिवसपर्यंत त्यांच्या नांवानें रोजच्या अन्नांतला घांस घराबाहेर ठेवण्यांत येतो. नंतर आप्तेष्टांनां बोलावून जेवण करतात व त्या प्रसंगी घरीं केलेली तांदुळाची दारू यथेच्छ पितात. एवढें केलें असतां सदात्मा पुढें कांहीं त्रास देत नाहीं, पण दुरात्मा मात्र वारंवार छळतो. कोणी आजारी पडल्यास त्याच्या नांवानें बळी दिला जातो. [ अगरिया पाहा.]
[ संदर्भ ग्रंथ- एन्सायल्को. रिलिजन अँड एथिक्स. सेन्सस ऑफ इंडिया १९०१-१९११. हंटर-स्टॅटिअका. ऑफ बेंगाल. पु. १७. रिस्ले -दि ट्राइब्स अँड कास्टस ऑफ बेंगाल. डाल्टन-एथ्नालॉनी ऑफ बेंगाल. हहन-ए प्रायमर ऑफ असुर डुक्मा. क्रूक-दि पॉप्युलर रिलिजन अँड फोक लोअर ऑफ नॉर्थ इंडिया; लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया.]