विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असुर-बनि-पाल - हा प्राचीन असुरियाचा विख्यात चक्रवर्ती इ. स. पू. ६६८ मध्यें आपल्या बापाच्या मृत्यूनंतर गादीवर बसला. एसर-हडन राजानें आपले दोन पुत्र असुर-बनि-पाल व समास-सुम-युकिन यांनां अनुक्रमें असुरिया व बाबिलोनिया हे प्रदेश वांटून दिले होते. लहानपणींच असुर-बनि-पालला बाबिलोनियन लोकांतील कला व शास्त्रें यांचें उत्कृष्ट शिक्षण मिळालें होतें व हल्लीं आपणाला असुरियन ग्रंथांतून आढळणारे अनेक प्राचीन बाबिलोनी वाङ्मयाचे अवशेष बनिपालाच्या विद्या व्यासंगाचेंच फळ होय यांत संशय नाहीं. ब्रिटिश म्युझियम मधील हजारों मातीच्या लेखांकित विटा याच्यात संग्रहांतून आणलेल्या आहेत इतकें असूनहि तो स्वतंत्र चक्रवर्ती राजा होता हें विशेष आहे. आपलें सैन्य व सेनापति यांनां राज्यांत व राज्याबाहेर गुंतवून तो घरीं जनान्यांतल्या ऐेषआरामांत, आपल्या शास्त्रीय अभ्यासांत व ईश्वरोपासनेंत निमग्न राही.
गादीवर बसल्यानंतर त्याचें पहिलें कर्तव्य म्हणजे बापाच्या मृत्यूमुळें थांबलेली इजिप्तवरची मोहीम पुन्हां चालू करणें हें होय. त्यावेळीं इजिप्त तिरहाकच्या ताब्यांत होतें. इ. स. पू. ६६७ त तो वारल्यानंतर त्याच्या मागून आलेला तांडमाने उत्तर इजिप्तमध्यें शिरला. त्या ठिकाणीं असुरियाविरुद्ध बंड चालूं होतें. तेव्हां मेफिसवर हल्ला करून तें घेण्यांत आलें व असुरी सैन्याला पार हांकलून लावण्यांत आलें. या अवधींतच टायरमध्येंहि बंड होण्याचा रंग दिसूं लागला. लगेंच असुर-बनि पालानें बंडखोर प्रांतांत नवीन सैन्य धाडिलें व पुन्हां पूर्ववत आपली सत्ता प्रस्थापित केली. या मोहिमेंत त्याच्या सैन्यानें थीबीस लुटून तेथील देवालयें उध्वस्त केलीं व तेथील दोन मनोरे निनेव्हेला पाठवून दिले, त्याचप्रमाणें टायरसुद्धां त्याला शरण आलें. यावेळीं असुर-बनि-पाल सत्तेच्या शिखरावर आरूढ होता. अराराटच्या आग्नेयेकडील मना (मिनि)चा प्रांत असुरियन सैन्यानें ओसाड करून टाकला व तेथील राजाला मांडलिक होणें भाग पाडलें. तसाच एलाम प्रांत काबीज करून आपल्या वतीचा एक राजा असुर-बनि-पालानें त्याठिकाणीं नेमिला. सिलिसिया व ताबाल येथील राजांनीं आपल्या मुली असुर-बनिपालाच्या जनान्यांत पाठविल्या. अराराट व लिडिया येथून वकिलाती आल्या. लिडियाच्या जायजेसनें सिमेरियनांविरुद्ध मदत मागितली असतां निनेव्हेकडून ती मिळण्याची आशा दिसेना. तेव्हां त्यानें इजिप्तकडे वळून तेथें पगारी सैन्याच्या मदतीनें असुरियनांनां इजिप्तच्या बाहेर हांकून लाविलें. अशा रीतीनें असुरियाच्या ताब्यांतून इजिप्त कायमचा गेला (इ. स. पू. ६६०). इकडे बाबिलोनियामध्यें अस्वस्थता वाढत होती व शेवटीं समास-सुम-युकिन येथील राष्ट्रीय पक्षाचा पुढारी झाला व आपल्या भावाविरुद्ध त्यानें लगेंच युद्ध पुकारिलें. लांच वगैरेनीं एलामाईट लोकांची मदत मिळविली व अरबी लोकहि या बंडांत सामील झाले. यावेळीं बनि-पालनें आपली पराकाष्ठा केली; सर्व निर्वाणीचे उपाय योजले; पण एलाममध्यें यावेळीं गडबड सुरूं झाली म्हणूनच बाबिलोनी व इतर सैन्याचा मोड झाला; नाहींतर कांहीं आशा नव्हती. शत्रुपक्षाकडील एकामागून एक शहर असुरियनांच्या हस्तगत होऊं लागलें व शेवटीं ६४८ त बाबिलोन शरण आलें. शत्रूच्या हातीं लागूं नये म्हणून समास-सुम-युकिननें आपल्या स्वत:ला जाळून घेतलें. उत्तर अरबस्तानावर चाल करून असुरियनांनीं वालुकारण्यांतील अरब लोकांस दहशत बसवली; व शेवटीं एलाम एकटें राहिलें त्याने पुन्हां कधीं डोकें वर काढूं नये म्हणून त्याविरुद्ध कडक उपाय योजण्यांत आले.
परंतु या लढायामुळें असुरिया दुर्बल झाला. मनुष्यबल व सामुग्री नसल्यानें सुमेरियन व सिथियन टोळयांनां तोंड देण्याची त्याला ताकद राहिली नाहीं. इ. स. पू. ६२६(?) मध्यें असुरबनिपाल जेव्हां वारला तेव्हां त्याचें साम्राज्य नष्ट होत चाललें होतें व पुढें थोडयाच वर्षांनी त्याचा शेवटहि झाला.
निनेव्हे येथें असुरबनिपालनें पुराणवस्तूंचा मोठा संग्रह करून ठेविला होता. जुन्या बाबिलोनी अंकित विटांवरच्या लेखांची नक्कल करण्यास त्यानें अनेक नक्कलनवीस नेमलेले असत. पण दुर्दैंवानें त्याची आवड फलज्योतिष व शकुन यांच्याकडे असल्यानें त्या विषयांवरील नक्कलाच पुष्कळ सांपडतात. या संग्रहालयाच्या बांधकामावरून त्यावेळची कला चांगली दृष्टोत्पत्तीस येते.
[संदर्भ ग्रंथ-जॉर्ज स्मिथ-हिस्टरी ऑफ असुरवनिपाल (१८७१). एम. ए. स्मिथ-असुरबनिपाल (१८८७-१८८९) रॉजर्स-हिस्टरी ऑफ बाबिलोनिया अँड असीरिया. अंडर सन-स्टोरी ऑफ एस्टिंक्ट सिव्हिलिझेशन्स ऑफ दि ईस्ट. ए. ब्रि.]