विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अस्करी (मिर्झा) - बाबर शहाचा तिसरा मुलगा हुमायून गादीवर आल्यानंतर सरकार संभल प्रांत अस्करीला जहागीर देण्यांत आला. हुमायूननें गुजराथ जिंकून अस्करीस त्याचा बंदोबस्त करण्यास ठेविलें होतें (१५३५); पण अस्करी मोठा विलासीं व चैनी असल्यानें बहाद्दरशहानें पुन्हां गुजराथ परत घेतला. तेव्हा अस्करी पळून गेला. हुमायून शेरखानाबरोबर झालेल्या लढाईंत पराभव पावून लाहोरास कामरानकडे गेला तेव्हां अस्करीहि त्याच्याबरोबरच होता. कामराननें हुमायुनास आश्रय दिला नाहीं तरी पण अस्करीस कंदाहारचा कारभार सांगितला. पुढें हुमायूननें काबूल कंदाहार प्रांत जिंकून घेतला व अस्करीनें बंड केलें म्हणून त्याला हद्दपार केलें. तो मक्केस जाऊन १५५८ त मरण पावला. अस्करीला एक मुलगी होती. तिचें लग्न मशदच्या युसफखानाबरोबर झालें. (बीलचा कोश मुसु. रियासत)