विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अस्थिमार्दवरोग - रिकेटस अथवा अस्थिमार्दव या रोगामध्यें मुलाच्या शरीराचें पोषण नीट होत नाहीं हें दर्शविणारीं हाडांत येणारें मार्दव, वक्रता हीं व दुसरीं लक्षणें दिसून येतात; व रोगाचा परिणाम सर्व शरीरावर होतो. या रोगामुळेंच पाठीस पोंक आलेलीं, अगर पाय वळणें अगर वांकणें इत्यादि शारीरिक व्यंगे असलेलीं माणसें पहाण्यांत येतात.
का र णें. -हा मुख्यत्वेंकरून बालकांचा रोग असून तो सहा ते बारा महिने वयाच्या सुमारांस लक्षांत येऊं लागतो. हा रोग मातबर माणसापेक्षा गरिबांच्या मुलांना अधिक प्रमाणांत होतो, याचीं कारणें (१) गरिबांच्या रहाणीमुळें त्यांनां मुबलक हवा व दूध या दोहोंचा मुलांसाठीं चांगलासा पुरवठा करितां येत नाहीं. म्हणजे एक तर आईच्या अंगावरील दुधांत सत्त्व कमी असल्यामुळें दोष असतो अगर दुसरें वर्ष लागून बराच काळ लोटला तरी तें नि:सत्त्व दूध आया मुलांनां पाजीतच असतात. (२) किंवा आईच्या अंगावरील दूध लवकर नाहीसे झाल्यामुळें बाजारांत नाना तर्हेची देशी विदेशी ''मुलांची अन्नें'' मिळतात त्यापैकीं पुष्कळांमध्यें पिष्टमय पदार्थ अधिक असून स्निग्ध पौंष्टिक व वसामय द्रव्यें अत्यल्प प्रमाणांत असतात. (३) पुष्कळ आईबापांनां मुलांनां दोन वर्षे पुरीं होण्याच्या आत आपल्याबरोबर भात, पोळी, साखर इत्यादि मोठया माणसाच्या आहारापैकीं पदार्थ भरवावेसें वाटतात. (४) कोंदट हवेंत पुष्कळ गर्दी करून राहिल्यानें, (५) आईच्या गरोदरपणीं बालकास पोषक द्रव्यें नीट न पोचल्यामुळें, (६) अगर मुलांतच स्वाभाविकपणें स्निग्ध, पौष्टिक व वसामय तत्त्वें जी दुधांत असतात ती पचविण्याची शक्ति कमी असल्यामुळें अशा एक किंवा अनेक कारणसमुच्चयामुळें हा रोग होतो.
ल क्ष णें :-मुलास घातलेले दूध नीटपणें पचणें व त्याचा कोटा साफ रहाणें या क्रियांत बिघाड होऊं लागल्याचें प्रथम नजरेस येतें. म्हणजे मूल भूक मंद झाल्यामुळें दूध कमी पिऊं लागतें. वरचेवर वाति होते किंवा मातट व रोगट वर्णाचे जुलाब होऊं लागतात व मूल नंतर रोड झाल्याचें दिसून येते. पुढे दिलेलीं दिसून येणारी महत्त्वाचीं व रोगसूचक लक्षणें ध्यानांत ठेवण्यासारखीं आहेत. मूल झोपीं गेले म्हणजे अंगावरील हातापायावरील पांघरुणें झोपेंतच हातापायांनीं काढून टाकून नुसतें निजणें, डोकें घामानें ओलें चिंब होई तों झोपेंत पुष्कळ घाम येणें. व विशेषत: पाय जळजळीत व कढत लागणें. यावेळीं शरीरांतील हांडांमध्यें वेदना होत असल्यामुळें मुलास हलविले अगर कडेवर उचलून घेतलें तर त्यास तें अगदीं न आवडून तें किंचाळया मारतें. नंतर या रोगामुळें सावकाश झालेला हाडांतील बदल दृष्टोत्पत्तीस येईल इतका स्पष्ट विशेंषत: हातापायांच्या लांब हाडांत नजरेस येतो. व म्हणूनच हाताचीं मणगटें, हाडाचीं टोंकें मोठीं झाल्यामुळें जाड दिसतात. त्याच कारणामुळें बरगड्या छातीच्या पुढील जागीं जेथें कूर्चांशीं संयुक्त होतात तेथील त्यांचीं टोकेंहि जाड व वाटोळीं बनल्यामुळें रोडक्या छातीवर जणूकाय ती रुद्राक्षमालाच दिसते. हाडांतील काठिण्य नष्ट होतें हें लक्षात आलें असेलच व स्नायूंतील शक्तीच्या जोरामुळें व शरीराच्या भारामुळें हाडें पिळवटलीं जाऊन वक्र होतात. अशा मुलाच्या गुडघ्या खालील पायांनां बाहेर झुकलेला असा फार बाक येतो व गुडघ्याच्या आंतील बाजूची टेकाडें मोठी होऊन व्यंगत्व प्राप्त होतें. कोणा रोग्याच्या आंतील बाजूची टेकांडें मोठीं होऊन व्यंगत्व प्राप्त होतें. कोणा रोग्याच्या पाठीच्या कण्यास मध्यभागींच वक्रता येऊन अगर उजवे, डावे बाजूस ती येऊन पोंक आल्यामुळें व्यंगत्व येतें. बरगड्यांच्या स्वाभाविक वक्रतेंत बदल होऊन उरोस्थि उचलून पुढें आल्याप्रमाणें दिसतो. यामुळें छातींतील पोकळी कमी होऊन तींतील फुप्फुसें, हृदय इत्यादींच्या वाढीस अवरोध होऊन त्यांचे व्यापारहि सुरळीतपणें चालत नाहींत. अस्थिमार्दवामुळें असाच बदल कटिर प्रदेशीं होऊन त्याची पोकळी कमी झाल्यामुळें स्त्रियांच्या बाबतींत प्रसुतिसमयीं मोठी अडचण येण्याचा संभव असतो. अशा मुलाचें डोकें शरीराच्या मानानें अंमळ मोठेंच दिसतें; कारण त्यांतील भिन्नभिन्न हाडें एकमेकांत संलग्न होऊन डोक्याचा आकार लहान झालेला नसतो. डोक्याच्या मानानें चेहरा अगदीं बारीक व किरकोळ दिसतो. दंतोद्भव उशीरानें होऊं लागतो. व त्यास कीड लागून ते पडूं लागण्यास आरंभहि लवकरच होतो. येणेंप्रमाणें सर्व प्रकृतीवर परिणाम झाल्यामुळें मुलाचें शरीर अति कृश होतें व त्याची वाढ खुंटते.
प रि णा म : -बहुधां थोडें बहुत व्यंग, व खुरटेपणा अगर खुजेपणा राहून नंतर रोगाचीं प्रगति थांबून हाडांत पूर्ववत् काठिण्य येतें. व नंतर प्रकृति पूर्ववत् चांगली होतें, किंवा रोगाची प्रगति चालूं राहून त्या अवकाशांत एखादा सांथीचा ताप, श्वासनलिका दाह, आंकडी, मस्तिष्ककोष्टोदर, अशांपैकीं एखाद्या प्राणघातक रोगास तें मूल बळी पडतें. हा सर्व प्रकार अति थोडया काळांत घडून येतो. अशा प्रकारचा या रोगाचा एक तीव्र भेद आहे व तो असाध्य आहे.
उ प चा र : -वरील ज्या कारणामुळें हा रोग होतो असें सांगितलें आहे त्याकडे लक्ष पुरविलें असतां ध्यानांत येईलच कीं, औषधापेक्षां या रोगामध्यें (१) हवा, अन्न, दूध यासंबंधीं बालकाची व्यवस्था आरोग्यपूर्वक सशास्त्र राखणें, (२) आनुवंशिक, रोगप्रवृति असल्यास मातेची प्रकृति व पोषण या हर एक बाबतींत सुधारणें हे प्रतिबंधक उपाय होत व (३) दुसरें वर्ष लागल्यावरहि फार दिवस मूल अंगावर पीत राहिल्यानें मातेची व मुलाची प्रकृति तर बिघडतेच पण जीं लेकरें मागाहून होतात तीं अशीं मूळचींच रोगट होतात. उलटपक्षीं सुदैवेंकरून माता निरोगी व विपुलदुग्ध संपन्न असून मुलास दुसरें वर्ष लागेपर्यंतच जर ती त्यास अंगावर पाजणार असेल तर हा रोग होण्याचा मुळीच संभव नाहीं असें म्हटलें पाहिजे. कारण वैद्यकशास्त्रांत असाच नेहमीं अनुभव येतो कीं, जी मुलें वरच्या दुधावर किंवा अन्नावर वाढविलेलीं असतात व आईच्या अंगावरून तोडलेलीं असतात तींच या तर्हेनें विशेष रोगग्रस्त असतात. हा रोग झाल्यावर तो बरा होण्यासाठीं ठाम नियम घालून देणें कठिण असल्यामुळें त्याविषयीं सामान्य धोरण कसें असावें हे येथें संक्षेपानें दिलें आहे. मुलास दूध न पचून वाति, ढाळ होत असल्यास त्यास काय पाजतात याची चौंकशी करून आईच्या अंगावर दूध मिळण्यासारखें नसल्यास उत्तम ताजें व निर्भेळ दूध मुलास नेहमीं मिळत जाईल व मुलास एक वर्ष पुरे होईपर्यंत त्याशिवाय त्यास दुसरें कांहींहि खाउ न घालतील अशी खबरदारी घेणें हे पहिलें कर्तव्य आहें. मुलास कांहीं दिवस हें दूधहि पचत नाहीं असें होणें संभवनीय आहे. त्याची खूण म्हणजे तें न पचता त्या दुधाच्या दह्यासारख्या कवड्या गुठळ्याप्रमाणें मळावाटें पडतात व ढाळ होतात. असें झाल्यास दुधांत साधें पाणी किंवा चुन्याच्या निवळीचें पाणी योग्य प्रमाणांत मिश्र करून दिल्यानें दूध पचतें. फारच अपचन झाल्यास कांहीं दिवस दूध मुळींच बंद ठेवून त्याच्या ऐवजी बार्ली अथवा विलायती यव या धान्याचा कषाय अथवा ओट धान्याच्या पिठाची अति पातळ लापशी पाजावी. अलीकडे मुलांचीं अन्नें आयतीं बनविलेलीं मिळतात तीं आपआपल्या परी उत्तम असतात. पण तींच फार देऊन दुध कमी करणें बरें नव्हें. कारण त्यांत पिष्टपदार्थांचें प्रमाण मुलांस न पचेल इतकें असल्यामुळें त्यानां आंतड्याचे अथवा अपचनाचे रोग होतात म्हणून पचनशक्तीप्रमाणें ही अन्नें द्यावींत व एकंदरींत एक वर्षापुढेंहि दूध हें आहारापैकीं मुख्यपदार्थ समजून त्याशिवाय दंतोद्भवाप्रमाणें इतर पदार्थ भात, पोळी वगैरे फार देण्याची घाई करूं नये. लोह, कोयनेल फॉस्फरस व सर्वांत मुख्य म्हणजे कॉड माशाचें तेल हीं औषधें पौष्टिक व अन्नपाचक असल्यामुळें ती जरूर द्यावींत. उबदार कपडे, शरीर निर्मळ राखणें, मलमूत्रोत्सर्जनाचे सुरळीत व्यापार चालूं ठेवणें व मुबलक व स्वच्छ हवा या सर्वांचें महत्त्व औषधाइतकेंच आहे. मुलास नियमितपणाची व नेमस्तपणाची संवय लावावी.
रोगाचें पाऊल झपाट्यानें पुढें पडत आहे, असें वाटल्यास व मूल चालतें असल्यास त्यास चालू देऊं नये; कारण हाडें वाकतात. तथापि आतां फळ्या पाट्या अशीं विशिष्ट यांत्रिक साधनें निघालीं आहेत तीं बांधून मूल चाललें, तर हाडांत वक्रता येत नाहीं व मागाहून मोठेपणीं व्यंग रहात नाहीं. व्यंगें राहिल्यास (पाय, घोटे, पावलें, पाठीचा कणा यांची वक्रता) मोठेपणीं त्यावर शस्त्रक्रिया केल्यानें कमी अधिक प्रमाणांत व्यंग नाहीसें होतें.
मु ड दू स.- मातेच्या उदरांत मूल असतांना त्यास हा रोग झाल्यास त्यास फीटल रिकेट्स अथवा मुडदूस असें म्हणतात. विद्वान डॉक्टर यास स्वतंत्र व भिन्न रोग समजतात. हातापायांचा व शरीरयष्टीचा विलक्षण खुजेपणा व सांधे फार मोठे असणें हीं याचीं मुख्य लक्षणें होत. हा असाध्य व अनिश्चित स्वरूपाचा रोग असल्यामुळें याच्या उपचाराविषयीं येथें विशेष विस्तार केला नाहीं.