विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहमद - या नांवाचें तीन तुर्की सुलता होते. त्यांची माहिती पुढीलप्रमाणें:-
प हि ला (१५८९-१६१७) हा तिसर्या महमदाचा मुलगा असून १६०३ सालीं सुलतान पदावर आरूढ झाला. या नंतर लवकरच हंगेरी व इराण या देशांत युद्धें सुरू होऊन त्यांचा शेवट तुर्कस्तानच्या विरुद्ध झाला; व तुर्कस्थानच्या उच्च दर्जाला पहिला मोठा धक्का बसला. गादीवर बसल्यावेळीं या सुलतानाच्या कर्तुत्वाबद्दल लोकांनां जी आशा होती ती फोल ठरली. याच्याच कारकीर्दीत तंबाखूचें व्यसन तुर्कस्थानांत शिरलें असें म्हणतात.
दु स रा.-(१६४३-१६९५) हा सुलतान इब्राहिमचा मुलगा; याचा भाऊ जो दुसरा सुलेमान त्याच्या मागून हा गादीवर आला (१६९१) याची चार वर्षांची कारकीर्द मोठीं नामोष्कीची म्हणतां येईल. कारण आस्ट्रियन लोकांनीं तुर्कांचा पराभव करून त्यांनां हंगेरींतून पार हांकून लाविलें. या दु:खानें व शारीरिक व्याधीनें अहमदाचा अंत झाला.
ति स रा.-(१६३७-१७३६) चवथ्या महमदाचा मुलगा. भावाच्या पदच्युतीनंतर १७०३ मध्यें हा सुलतान झाला. रशियाच्या भीतीनें यानें इंग्लंडशीं सख्य केलें. मोठ्या नाखुषीनें याला रशियाशीं युद्ध करावें लागलें; पण कोणत्याहि अगोदरच्या किंवा नंतरच्या तुर्की सुलतानापेक्षां यानें रशियाला जास्त वंगविलें. रशियाला जेव्हां तह करणें भाग पडलें तेव्हां सुलताननें फारशा कडक अटी त्यावर लादल्या नाहींत. ही गोष्ट त्याच्या प्रजेला पटली नाहीं. आस्ट्रियाशीं झालेल्या युद्धांत मात्र तुर्कस्तानला हार खावी लागली तसेंच इराणी युद्धाचा शेवट चांगला न होऊन जॅनिसेरी या लष्करी वर्गानें अहमदाला १७३० त पदच्युत केलें. कांहीं वर्षांनंतर कैदेंत असतांनाच हा वारला.