विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहमदशहा - (१४११-१४४३) गुजराथचा सुलतान. अहंमदशहा आपल्या वयाच्या एकविसाव्या वर्षी गुजराथच्या राज्यावर बसला. फिरोजखान नांवाच्या त्याच्या चुलतभावानें आरंभींच आपल्यास राज्य मिळण्याविषयीं भडोच येथें बंड केलें. उभयतांचें युद्ध होऊन फिरोजखानाचा पराभव झाला. त्या स्वारीहून पट्टणास परत येत असतां रस्त्यावर एक नवीन शहर वसवून त्यास त्यानें आपलें नांव दिलें (सन १४१२), तें अहमदाबाद या नांवानें अद्यापि प्रसिद्ध आहे. पट्टण येथून आपलें तख्त उठवून अहमदशहानें तें अहमदाबादेस आणिलें. तेव्हांपासून अहमदाबाद शहर गुजराथची राजधानी झालें. हें शहर ज्याच्या मसलतीनें वसलें, त्याचें नांव शेख महंमद खत्तू गंजबक्ष असें होतें. अहमदशहा पराक्रमी होता. त्यानें माळवा, सौराष्ट्र वगैरे सभोंवारच्या प्रांतावर आपली खंडणी बसविली व हिंदू धर्माचा पाडाव करण्याकरितां विशेष मेहेनत घेऊन त्या कामीं त्यानें आपलें नॉंव अजरामर करून ठेविलें आहे. गुजराथ देश मूळचा निव्वळ हिंदूंचा होता. ह्या पूर्वींच्या राज्यकर्त्यांस त्या धर्माचा उच्छेद करण्यास सवड मिळाली नाहीं. अहमदशहानें १४१४ त ताजुल्मुल्क नामक एक मोठा धर्माभिमानी गृहस्थ मुसुलमानी धर्मप्रचाराच्या स्वतंत्र खात्यावर मुख्य नेमून त्यास हिंदूंच्या देवालयांचा व मूर्तींचा दरोबस्त नाश करण्याची सक्त ताकीद दिली. ताजुल्मुल्कानें हे हुकूम मोठ्या बहाद्दरीनें अंमलांत आणिले. देवस्थानांप्रमाणें राज्येंहि खालसा करण्याचा सपाटा कमी नव्हता. अनेक लहान लहान जमीनदारांस व गिरासिये लोकांस त्यानें आपल्या अमलाखालीं आणिलें. सन १४२० पासून बरींच वर्षें स्वस्थ बसून अहमदानें विश्रांति घेतली. कारकीर्दींच्या अखेरीस महाराष्ट्रांतील बहामनी सुलतानांबरोबर उत्तर कोंकण प्रांतीं ह्यांचे युद्धप्रसंग झाले त्यांत बहुधा अहंमदशहासच जयप्राप्ति झाली. सन १४४३ त जुलईच्या ४ थ्या तारखेस अहमदशहा अहमदाबाद येथें मरण पावला. असें सरदेसाई लिहितात पण स्मिथ अहमदशहाच्या मृत्यूचा सन १४४१ हा देतो.
अहदशहा हा मोठा न्यायी होता अशी त्याची कीर्ति आहे. त्यानें रजपुतांशीं शरीरसंबंध केले. त्याच्या पश्चात् त्याचा पुत्र महंमदशहा गुजराथच्या तख्तावर बसला. [मु. रियासत.बील.स्मिथ-इंडिया]