विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहमदशहा अब्दाली - सन १७२४ मध्यें अहमदखानाचा जन्म सद्दोसाई जातीमध्यें झाला. हाच पुढें अहमदशहा अबदाली या नांवानें प्रसिद्ध झाला. याच्या बापाचें नांव सम्मौनखान. हा अबदाली टोळीचा वंश परंपरेनें मुख्य होता. लहान असतांना अहमदशहा बिलझाईस या शत्रु टोळीच्या हातीं सांपडला. त्या लोकांनीं अहमदला कंदाहार येथे कैदेंत टाकिलें. तेथून नादिरशहानें त्याची १७३८ त सुटका केली, व एका घोडदळाचा मुख्य केलें. नादिरशहाच्या खुनानंतर म्हणजे सन १७४७ मध्यें अहंमदशहा स्वतंत्र झाला व त्यानें नादिरशहाची तीन लक्ष रुपयांची ठेव आणि कंदाहार काबिज केलें. व आपल्या अबदाली टोळीचें नांव बदलून दुराणी असें ठेविलें. पुढें सन १७४८ मध्यें त्यानें हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. यावेळीं अहमदशहा सरहिंदपर्यंत आला होता. परंतु सरहिंद येथें त्याची व दिल्लीच्या फौजेची गांठ पडून दिल्लीचा युवराज अहमद याकडून त्याचा पराजय झाला यानंतर सन १७४८ च्याच हिंवाळ्यांत दुसरी स्वारी केली. हींत व पुढें सन १७६१ सालीं केलेल्या स्वारींत पुष्कळच साम्य आहे. यावेळीं अबदालीचा मुक्काम रावी नदीच्या पलीकडील तीरावर असून लाहोरचा सुभा मीरमन्नहा अलीकडे होता. पुढें लवकरच दोन्ही सैन्यें समोरासमोर येऊन त्यांची लढाई झाली. तींत मीरमन्नु मागें सरला व लाहोरचा आश्रय करिता झाला. अबदालीनें त्याची रसद बंद केली. तेव्हां मीरमन्नूच्या फौजेची उपासमार सुरू झाली. शेवटीं तारीख १२ एप्रिल १७५२ रोजीं मीरमन्नूनें अपल्या सैन्यासह अबदालीवर चाल केली; व त्याचा भयंकर संग्राम झाला. लढाई ऐन रंगात आली व मीरमन्नूचा जय होईल असें अबदालीसहि वाटूं लागलें. इतक्यांत मीरमन्नूचा सेनापति कौरामल्ल हा हत्तीवर बसून लढत असतां त्याच्या हत्तीचा एक पाय खळग्यांत गेला व तें जनावर एकदम खालीं बसलें इतक्यांत एकानें कौरामल्लाचें डोकें कापून नेलें. सेनापतीची ही अवस्था होतांच सैन्यांत एकदम हाहाकार उडाला व जो तो जीव बचावासाठीं पळूं लागला, व याप्रमाणें मीरमन्नूचा पराजय झाला. या स्वारींत मीरमन्नूला ज्याप्रमाणें त्यानें लाहोरास कोंडून त्याच्या फौजेची उपासमार केली त्याचप्रमाणें पानपतच्या स्वारींत भाऊसाहेबांच्या सैन्याची त्यानें अन्नान्नदशा केली. हें युद्ध रावी नदीच्याजवळ झालें, तर पानपतची लढाई यमुना नदीच्या तीरावर झाली. या लढाईत हत्तीवर बसलेला कौरामल्ल मारल्यामुळें अहमद शहास जय मिळाला, तर पानपतच्या युद्धांत विश्वासराव पडल्यानें मराठ्यांचा पराजय झाला. येथपर्यंतच्या हकीकतीचें साम्य आहे. पण पुढें मीरमन्नू अहमदशहास शरण गेला व मानी भाऊसाहेबानें समरांगणास शिर वाहिलें असो. यानंतर इ. स. १७५५-५६ मध्यें अहमदशहानें चौथी स्वारी केली. यावेळीं मोगल बादशहाचा वजीर मीर शहाबुद्दीन यानें मुलतान व काबूल प्रांत परत घेऊन तेथें आपला सुभेदार नेमल्याचें अबदालीस कळल्यानें त्यानें हिंदुस्थानांत स्वारी केली व हे प्रांत पुन्हां हस्तगत केले (१७५५).
यानंतर त्यानें दिल्ली व मथुरा हीं शहरें लुटलीं. तेथील लोकांची कत्तल करून स्त्रिया भ्रष्ट केल्या. पुढें तो आश्रयास आला; पण येथें त्याच्या छावणींत सांथीचा उद्भव झाल्यामुळें त्यास परत फिरावें लागलें. इ. स. १७५६ च्या आरंभीं अहमदशहा काबूल शहरीं जाऊन पोंचला. दिल्लीहून निघण्यापूर्वी त्यानें आपला मुलगा भिमूरशहा याकडे लाहोर मुलतान आदिकरून सर्व पंजाब प्रांताच्या सुभेदारीचें काम सांगून त्यास तिकडे रवाना केलें होतें.
इ. स. १७५८ त राघोबा दादानें अहमदशहा अबदालीच्या सरहिंदच्या सुभेदाराचा पूर्ण पराजय करून लाहोर व मुलतान या प्रांतांवर अदीनाबेग यास आपल्या वतीनें सुभेदार नेमल्यामुळें, ते प्रांत परत घेण्याकरितां अहमदशहानें हिंदुस्थानांत पांचव्यानें स्वारी केली [१७५९ अखेर किंवा १७६० च्या आरंभी], येथें ठेवलेल्या मराठ्यांच्या फौजेस पिटाळून लावून तो यमुना नदी ओलांडून अलीकडे आला. नजीबउद्दौला रोहिल्यानें त्याला हिंदुस्थानांत स्वारी करण्याकरितां आमंत्रण केलेंच होतें व दुसर्या अलमगीर बादशहाचाहि त्याच्याशीं कांही पत्रव्यवहार झाला होता असें म्हणतात. अहमदशहा येतांच नजीब उद्दौला त्यास जाऊन मिळाला, व नंतर सुजाउद्दौल्यासहि त्यानें आपल्याकडे वळवून घेतलें. उत्तर हिंदुस्तानांतील इतर मुसुलमान सरदारहि पुढें त्यास येऊन मिळाले. या सर्वांच्या मदतीनें पानिपतच्या युद्धांत त्यानें मराठ्यांचा पराजय केला. (१७६०-१७६१ पानिपतचें युद्ध, पहा) यानंतर त्यानें दिल्लीचें तख्त शहाअलम बादशहास देऊन सुजाउद्दौला यास त्याचा वजीर केलें, व नजीब उद्दौल्यास त्याच्या अमीर उल्-उमराच्या हुद्यावर पुन्हां अधिष्ठित करून तो स्वदेशी परत गेला (१७६१). अहमदशहाची या वेळीं संबंध हिंदुस्थान जिंकण्याची मोठी महत्त्वाकांक्षा होती पण त्याच्या सैन्यानें अलेक्झांडरच्या सैन्याप्रमाणें त्याला मागें ओढलें.
सन १७६२ मध्यें त्यानें सहाव्यानें हिंदुस्थानावर स्वारी केली. पुढें सन १७६४ मध्यें सातवी व सन १७६७ मध्यें आठवी या प्रमाणें त्यानें एकंदर आठ स्वार्या हिंदुस्थानावर केल्या. नासुराच्या विकारानें अहमदशहा सन १७७३च्या जून मध्यें मरण पावला असें लतीफनें पंजाबच्या इतिहासांत लिहिलें आहे. रा. सरदेसाई मराठी रियासत मध्यविभाग ३ यांत अब्दाली १९आक्टोबर १७७२ रोजीं काळपुळीच्या विकारानें चमन नजीक वारला असें लिहितात.
अहमदशहा शिस्तीचा पूर्ण भोक्ता असून न्यायी असे. प्रजेस संतुष्ट ठेवण्याकडे त्याचें नेहमीं लक्ष असे. तसेंच तो विद्वानांचा चहाता व स्वत: सुशिक्षित असून तैमुर, नादिरशहा वगैरे मनस्वी क्रूर असलेल्या राजांप्रमाणें तो कांहीं वेळां वागला असला तरी त्यांच्यापेक्षां पुष्कळ पटीनें श्रेष्ठ होता यांत संशय नाहीं. युद्धकलेंत तो फार निष्णात असे. (सुलतान महमदखान बारुकझईचें 'तारीख सुलतानी' चें भाषांतर. ग्रँटडफचा मराठ्यांचा इतिहास. व्हिन्सेंट स्मिथ-इंडिया. ए. ब्रि सहविचार-वर्ष १ अंक १. सरदेसाई-मराठी रियासत, मध्यविभाग ३. वि. विस्तार वर्ष ५४ अ.९ या मधील पुस्तक परीक्षणासह. बीलचा कोश. इ.]