विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहल्या - अत्यंत प्राचीन काळांत दंतकथांचा विषय झालेली एक स्त्री. गौतम ॠषीची पत्नी. ही ब्रह्मदेवानें निर्माण केलेली पहिली स्त्री असून, हिची सौंदर्याबद्दल फार ख्याति होती. इंद्रानें हिचें पातिव्रत्य हरण केलें अशी कथा आहे. हिच्याच संमतीने इंद्रानें हिचें घर्षण केलें असा एक पाठ रामायणाच्या प्रतींत सांपडतो, तर याच्या उलट, इंद्रानें गौतमाचें रूप घेऊन अहल्येला फसविली असा दुसरा पाठ आहे. हें जारकर्म कसें झालें या संबंधीं पुढील कथाहि आढळते; चंद्र हा इंद्राच्या मदतीस्तव कोंबड्याचें रूप घेऊन मध्यरात्रीं अरवला, तेव्हां गौतमाला पहाट झाली असें वाटून स्नानसंध्येकरितां तो बाहेर पडला. तेव्हां इंद्रानें आंत जाऊन शय्यारोहण केलें. गौतमाला जेव्हां ही लबाडी समजली, तेव्हां त्यानें अहल्येला शाप देऊन तिचें विश्वख्यात सौंदर्य नाहींसें केलें. दुसर्या एका ठिकाणीं गौतमानें तिला शिला बनविली असा वृत्तांत आहे. रामानें पुन्हां तिला पूर्व स्थितीवर आणून गौतमाच्या हवालीं केलें. कुमारिल भट्ट या जारकर्माला रूपक समजतो. व इंद्ररूपी सूर्यानें अहल्यारूपी रात्रींचें धर्षण केलें असें हें निसर्गदृश्य आहे असें सांगतों.
'अहल्यायीं जार' असें जें इंद्राला विशेषण आहे त्यावरून ही जारकर्माची कथा रचिली गेली असावी. ब्राह्मण ग्रंथांतूनहि अहल्येचा हा इतिहास वर्णित आहे. (शत. ब्रा. ३. ३, ४, १८; जै. ब्रा. २. ७९; षड्. ब्रा. १ १). अहल्येला शतानंद नांवाचा पुत्र होता. (संदर्भ-ग्रंथ-रामायण बालकांड. सर्ग ४८-४९ उत्तर का. स. ३०; महाभारत व इतर पुराणें;)