प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अहल्याबाई - ह्या विख्यात स्त्रीरत्‍नाचा जन्म केव्हां झाला हें कळण्यास आज कोणत्याहि प्रकारचा प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाहीं. मालकम साहेब ती मृत्युसमयीं म्हणजे इ. स. १७९५ त सुमारें ६० वर्षांची होती असें म्हणतो. परंतु इ. स. १७८०-८१ च्या दोन अस्सल पत्रांत आपल्या वयास ५५ वर्षें झालीं असल्याचें अहल्या बाईचें उद्गार आहेत (विविधज्ञानविस्तार, वर्ष ३८ अंक ५, पृष्ट १४६), त्यावरून व इ. स. १७४३च्या सुमारास मल्हारराव होळकर नाशिकच्या यात्रेस गेला असतां त्यानें तेथें आपल्या उपाध्यायास अहिल्याबाई लग्नसमयीं (इ. स. १७३३ त) ८ वर्षांची होती म्हणून जें लिहून दिलें होतें त्यावरून तिचा जन्म इ. स. १७२५ त झाला असावा असें ठरतें. तिचा बाप माणकोजी शिंदे हा अवरंगाबाद जिल्ह्याच्या बीड तालुक्यांतील चौढें गांवचा पाटील होता. शके १६५५ त म्हणजे इ. स. १७३३-३४ मध्यें मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव याशीं हिचा विवाह झाला. लग्नसमयीं खंडेरावाचें वय अवघें दहा वर्षांचें होतें. परंतु पुढें तो व्यसनी निघाल्यामुळें अहल्याबाई ''वृत्तीस उदास राहून सासूसासर्‍याचे सेवनीं तत्पर असून अंबादास पुराणिक याजपासून परत्रसाधनाची कांहीं व्यवस्था ग्रहण करून, सासुरवासी सबब चोरून जपून युक्तीनें, त्या वस्तूचें दास्य करीत राहिल्या'' (होळकरांची कैफियत पान ६६). खंडेराव वरकड कसाहि असला तरी अहिल्याबाईपुढें त्याची मात्रा बिलकुल चालत नसे. ती ज्या दिवशीं त्याच्याकडे जात असे त्या दिवशीं त्याला आपल्या सर्व अव्यवस्थित वृत्तीस रजा द्यावी लागे. अहल्याबाईला पूर्ववयांतच लिहिणें वाचणें समजूं लागलें ती मोडी अक्षरहि लिहित असे, तिला पुराण ऐकण्याची गोडी असल्यामुळें तिच्या अंगी लवकरच बहुश्रुतपणा व चतुरस्त्रता आली. तिची कुशाग्र बुद्धि व कामांतील हुशारी पाहून मल्हाररावानें बहुधा लवकरच तिच्यावर सरकारी कामें सोंपविलीं असावींत. ती अठ्ठावीस एकोणतीस वर्षांची असतांनाच तिच्या नांवानें पत्रें सुरू झालीं. यावरून ती यापूर्वीं निदान चार पांच वर्षे तरी म्हणजे चोवीस वर्षांची असतांना आपलें कामकाज करावयास समर्थ असली पाहिजे. अर्थात् राज्य चालविण्यास  जे गुण लागतात, त्यांचा उदय तिच्या अंगीं यापूर्वींच झाला असला पाहिजे. अहल्याबाईस मालेराव व मुक्ताबाई अशीं दोन अपत्यें होतीं. त्यांपैकीं मालेराव याचा जन्म इ. स. १७४५ त देपालपूर मुक्कामीं झाला, व त्याच्या पाठीवर तीन वर्षांनीं मुक्ताबाई जन्मास आली. अहल्याबाईच्या नशिबी सौभाग्यसुख फार दिवस लिहिलें नव्हतें. इ. स. १७५४ सालीं डीगेजवळ कुंभेरीच्या किल्ल्यास मरांठ्यांच्या सैंन्याचा वेढा पडला असतां तिचा पति खंडेराव हा गोळी लागून गतप्राण होऊन पडला. या वेळीं अहल्याबाई आपल्या नवर्‍याबरोबरच होती. तिला हें वर्तमान समजतांच तिनें पतीबरोबर सहगमन करावयाचें ठरविलें. परंतु मल्हाररावानें तिला अतिशय गळ घातल्यामुळें तिला शेवटीं आपलें सहगमन तहकूब करावें लागलें.

खंडेरावाच्या मृत्युनंतर संस्थानचा सर्व कारभार मल्हाररावानें आपल्या सुनेकडेच सोंपविला. यापुढें ती स्वत: फक्त युद्धप्रसंगाची व उत्पन्नाचीच काळजी करीत असे. तथापि अहल्याबाईच्या कामावर त्यांची एकंदर देखरेख असे व तीहि त्याच्या सल्ल्यानेंच कामकाज पहात असे. अर्थात मल्हाररावाच्या कारकीर्दींत राज्याचा बंदोबस्त चांगला होता, याचें पुष्कळसें श्रेय अहल्याबाईसच दिलें पाहिजे हें उघड आहे. इ. स. १७६६ त मल्हारराव होळकर मरण पावल्यावर राज्याची कुल जबाबदारी अहल्याबाईवरच येऊन पडली. मालेराव या वेळीं वयांत आला होता तरी तो आपली जबाबदारी ओळखणारा नसून होतकरूहि नव्हता. मल्हाररावानंतर शिरस्त्याप्रमाणें मालेरावाच्या नांवानें सुभेदारी झाली, परंतु तो गादीवर बसल्यानंतर सारा दहा महिनेच काय तो जिवंत होता. त्याला लवकरच वेडेपणाच्या लहरी येऊं लागून त्याच्या पासून इतरांस त्रास होऊं लागला, या त्याच्या वर्तनामुळें अहल्याबाईच्या स्तुतिपाठकांनीं आपल्या उत्साहाच्या भरांत त्या माऊलीनें आपल्या मुलास मारविलें किंवा त्यास हत्तीच्या पायीं दिलें म्हणून ज्या दंतकथा प्रचलित केल्या त्या अगदी निराधार आहेत. अहल्याबाईच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षांनीं मालकम साहेबानें या गोष्टींचा अत्यंत बारकाईनें व जातीनें शोध करून त्यांत कांहीं तथ्य नाही, अशी आपली खातरी करून घेतली होती. (पु. १, पान १५१)

मालेरावाच्या मृत्यूनंतर होळकरांचा दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यानें एखादा होळकर घराण्यांतील मुलगा दत्तक घ्यावा अशी आपली इच्छा दर्शविली. परंतु अहल्याबाईनें तें नाकारलें. सैन्याच्या मदतीनें राज्य चालविण्याचा विचार करून तिनें त्या कामीं महादजी शिंदे व पेशवे यांची सुद्धां पूर्ण सहानुभूति मिळविली. स्त्री असल्यामुळें तिला सैन्याचें आधिपपत्य स्वीकारून लढाईवर जातां येत नसे, म्हणून त्या कामाकरितां सैन्यातील तुकोजी होळकर या अधिकार्‍याची तिनें योजना केली. पुढें तुकोजीनें पेशव्यांस १५,६२,००० रु. नजर केले. त्यावरून पेशव्यांनीं त्यास सेनापतीचीं वस्त्रें दिली. तुकोजी महत्त्वाच्या प्रसंगी अहल्याबाईची सल्ला घेत असे. तो पुण्यास असला कीं सातपुड्याच्या पलीकडे असलेल्या होळकरांच्या मुलुखाचा बंदोबस्त ठेवी व अहल्याबाई त्याच्या उत्तरेकडच्या माळवा वगैरे प्रांताची व्यवस्था ठेवी पण तो स्वारीवर असे तेव्हां सर्वच प्रांत खुद्द अहल्याबाईच्याच देखरेखीं खालीं असत. (होळकरांच्या राज्याचें सामान्य वर्णन पा. १०)

 

अहल्याबाईच्या कारकीर्दीत तिचा व तुकोजीचा वास्तविक विरोध चारपांच महत्त्वाच्या प्रकरणांत झाला, व त्यालाहि तुकोजीचा भोळसर स्वभाव व अव्यस्थित खर्च हींच दोनं कारणे होतीं. पहिला प्रसंग म्हटला म्हणजे तुकोजीचा कारभारी नारो गणेश यानें अहल्याबाईच्या हाताखालीं तिच्या अत्यंत विश्वासांतला शिवाजी गोपाळ नांवाचा इसम होता त्याच्या पुढें आपलें तेज पडणार नाहीं या भयानें त्याची पुणें दरबाराकडून मोठ्या शिताफीनें पुण्यास बदली केली व तुकोजीनें भोळसरपणानें अहल्याबाईची मंजुरी न विचारतांच ह्या बदलीस आपली संमति दिली, हा होय. पुढें १७७५ त नारो गणेश आपल्या मालकासह राघोबाच्या कटांत शिरल्यामुळें त्याला बिनभाड्याची खोली पाहवी लागली. तेव्हां त्याच्या गैरहजेरींत दादाजी हा अहल्याबाईच्या संमतीनें तुकोजीचा कारभार पहात होता. परंतु त्याचें व तुकोजीचें बनत नाहीं हें पाहून नारोगणेशानें महादजी शिंद्यास एक लाख रुपये लांच देऊन आपली सुटका करून घेतली व शिंद्याच्याच सूत्रानें तो पुन्हां पूर्वपदीं विराजमान झाला. या सर्व गोष्टी अहल्याबाईस न कळवितां परभारेंच झाल्यामुळें खटक्याचा दुसरा प्रसंग आला. खटक्याचा तिसरा प्रसंग मात्र याहून जास्त महत्त्वाचा आहे. इंग्रजांशीं झालेल्या पहिल्या युद्धांत होळकरांच्या सैन्याचा खर्च रास्त प्रमाणाबाहेर झालासें वाटून त्यास मर्यादा घालण्याचा अहल्याबाईनें प्रयत्‍न केला. पण या प्रसंगीं ही मोहीम ऐन रंगावर आल्या कारणानें त्या वेळीं सैन्यांत काटकसर केली तर अपजय होण्याची फार भीति होती व म्हणून ती काटकसर दु:सह वाटून पुणें दरबारचा राख बाईकडे वळला, असे प्रसंग अहल्याबाईच्या कारकीर्दीत कित्येक वेळा आले असतील. तुकोजीस मल्हाररावाची शिस्त साधत नसल्यामुळें अहल्याबाईकडे त्यास खर्चाबद्दल वारंवार मागणी करावी लागे व अहल्याबाईसहि आपल्या प्रजेच्या हितास्तव त्याचा प्रतिकार करणें भाग पडे. अशा प्रसंगीं पुणें दरबारास तुकोजीची बाजू उचलून बाईविरुद्ध जाण्याचा घाट घालावा लागे; पण शेवटीं उभयतांची तडजोड करून निकाल लागे (पुरुषोत्तमकृत देवी श्री अहल्याबाई, च. पृ. १६१-६२)

अहल्याबाईनें घरांतला कारभार आपल्याकडे ठेवून बाहेरचा कारभार तुकोजीच्या हातीं दिला होता. होळकरांचे सैन्य तुकोजी होळकरांच्या अधिपत्याखालीं बहुतेक स्वतंत्रपणें पेशव्यांची चाकरी करीत असल्यामुळें त्याच्या कामगिरीचा सविस्तर उल्लेख तुकोजी होळकर या सदराखाली करण्यांत येईल. स्वत: अहल्याबाईंच्या राज्यांत लढाया व कलह हे बोटावर मोजण्याइतकेच झालें. गोविंदपंत गानु नांवाचा एक सज्जन मनुष्य अहल्याबाईचा मंत्रि होता. तो खाजगीचे काम पाही. कित्येक दिवसपर्यंत त्यानें कारभार्‍याचेंहि काम केलें होतें. दत्तकासंबंधीं प्रकरणांत गंगाधर यशवंत यानें राघोबादादाशीं कारस्थान केलें होतें तरी अहल्याबाईनें त्याच्या मुलाचे गुण लक्षांत आणून त्यास पुण्याच्या दरबारी वकील नेमलें. तिनें खंडेराव नांवाचा वसुलबाकीच्या कामांत मोठा वाकबगार असलेला एक मनुष्य इंदुरास नेमला होता त्याच्या अमदानींत तिची प्रजा फार सुखी व संतुष्ट राहिली. पुणें, हैदराबाद, श्रीरंगपट्टण, नागपूर, लखनौ, कलकत्ता इत्यादि ठिकाणीं होळकराकडून जे वकील नेमले जात त्यांची नेमणूकहि तिच्याचकडून होत असे. तिला आपल्या प्रांताची व्यवस्था करण्यास कधीं सैन्य बाळगण्याची गरज पडली नाहीं. तिला आपल्या प्रजेची तर भीति नव्हतीच, पण इतर राजे रजवाड्यांनींहि कधीं तिच्या राज्यावर स्वारी केली नाहीं. तिच्या कारकीर्दींत चंद्रावतानें जें बंड उभारलें तें केवळ स्वजात्यभिमानाचा व स्वसंरक्षणाचा प्रयत्‍न होता. चंद्रवताचा संबंध उदेपूरच्या सुप्रसिद्ध सिसोदिया वंशाशीं असून त्याची रामपुर्‍याची जहागीर, जयपूरचा माधवसिंह यास तो आजोळी रहात होता तेव्हा त्याच्या इतमामासाठीं त्याचा मामा संग्रामसिंह यानें दिली होती. पुढें माधवसिंहास मल्हारराव होळकराच्या साहाय्यानें आपलें जयपूरचें राज्य मिळालें तेव्हां त्यानें रामपुर्‍याचा भाग होळकरास बहाल केला. ही गोष्ट चंद्रावतास आवडली नाहीं. त्यांनीं योग्य संधि मिळताच होळकराविरूद्ध बंड उभारलें (इ. स. १७७१), या वेळीं तुकोजी होळकर हा विसाजीपंत बिनीवाल्याबरोबर उत्तर हिंदुस्थानात अडकला होता. परंतु अहल्याबाईनें हिंमत खचूं न देता स्वत:च बंडवाल्याशीं तोंड देऊन मंदस्तेर जवळच्या पळसुडा येथील लढार्ईत त्याचा पराजय केला (मालकम). पुढें १७८७ त रजपुतांनी लालसोट येथें महादजी शिंद्याचा पराभव केला. व होळकरांचा निबाहेडा महाल खालसा करून त्याचें जावद शहर घेतलें. तेव्हा चंद्रावतास जोर येऊन त्यांनी पुन्हा बंड केलें. हे पाहून अहल्याबाईनें सैन्य जमा करून ते अंबाजीपंत राघोरणसोड इत्यादि लोकांबरोबर रजपुतावर पाठविलें. परंतु ह्या सैन्यावर रजपुतानींच कडर्या मुक्कामीं छापा घालून अबाजीपंतांस ठार केलें. तेव्हा अहल्याबाईनें तुळाजी शिंदे नांवाचा आपल्या माहेरचा एक इसम व मागील खेपेस चंद्रावताचें बंड मोडणारा तिच्या पाहर्‍यावरील शरीफभाई यांजबरोबर आणखी पांच हजार स्वार देऊन त्यांना रवाना केलें. या फौजेनें रजपुतांचा पराभव करून जावद, निंबाहेडा, राणीपुरा वगैरे किरकोळ महालांत ठाणीं घालून खुद्द रामपुराहि सर केला. यानें तर रजपुतांनीं आमदेचा आश्रय केला, परंतु तोहि किल्ला लवकरच काबीज होऊन अहल्याबाईची फत्ते झाली. (इ.स.१७८८) आपल्या राज्यांतील धाडे घालून त्यावर उपजीविका करणार्‍या गोंड लोकांचा अहल्याबाईनें ज्या रीतींनें बंदोबस्त केला तिजवरून तिचें व्यवहार चातुर्य फार उत्तम रीतीनें व्यक्त होत आहे; तिनें हे लोक आपल्या हद्दींतून कोणाचा माल जाऊं लागला म्हणजे मालकापासून जो भीलकवडी नांवाचा कांहीं कर घेत असत तो मान्य केला. परंतु त्याच्या मोबदल्यांत तिनें यांच्याकडून पडित जमीनीची लागवड करून घेतली व त्यांनां कांही हद्द नेमून देऊन तींत जर कोठें चोरी झाली तर आपण तपास लावून देऊं असा त्यांच्याकडून करार करून घेतला. पुष्कळ दिवसांच्या करारानें जमीन पट्टयानें देण्याची पद्धत अहल्याबाईनेंच सुरू केली असें म्हणतात (मालकम भाग २)

तथापि अहल्याबाईचें जें आज सर्वतोमुखी नांव झालें आहे तें तिच्या युद्धकौशल्यामुळें किंवा मुत्सद्दीपणामुळें नसून औदार्य, न्यायप्रियता, भूतदया, सदाचरण, इत्यादि लोकोत्तर गुणांमुळेंच होय. ह्या गुणांमुळें तिला आपली कारकीर्द यशस्वी करून दाखवितां आली, एवढेंच नव्हे तर पाटीलबाबा, नानाफडनवीस यांसारख्या मुत्सद्दीमंडळीसारखें अखेरपावतों वजन राहिलें. अहल्याबाई म्हणजे साक्षात मातुश्री असें समजून पाटीलबावा तिच्याशीं वागत, पत्रव्यवहार करीत व बोलत. नाना फडनवीस, हरिपंत इत्यादि तत्कालीन प्रमुख मंडळीचें मत अहिल्याबाई आपल्या कामकाजात विचारी; परंतु ती आपलें काम करतांनां दुसर्‍याचें व्रथा वर्चस्व आपल्यावर पडूं देत नसे. तुकोजी अहिल्याबाईपेक्षां दोनतीन वर्षोनीं मोठाच होता, तथापि तो तिला 'आई' असें म्हणे व त्याचें वर्तन तिच्याशीं दासानुदासासारखें होतें. अहल्याबाईची न्यायप्रियतेबद्दल ख्याति होती. तिच्या धर्मशील वर्तनामुळें तत्कालीन राजे-रजवाड्यांचा तिजवर इतका विश्वास होता कीं आसपासचीं संस्थानें तिच्याकडे आपले तंटे घेऊन येत. (उदाहरणार्थ, महेश्वर दरबारची बातमीपत्रें भाग १, पा. १२४; भाग २ पा. १७० पहा.) त्यांचे गृहकलह अहल्याबाईनें मिटविले इतकेंच नव्हे तर प्रसंगविशेषीं त्यांची दाद पुणें दरबारापावेतों लावून त्यांस योग्य न्याय मिळवून दिला (पान ११ पहा) यामुळें पुणें दरबारांत कोणास अन्याय झालासा वाटल्यास तो अहल्याबाईकडे येई. मल्हारराव वारला तेव्हां होळकराच्या खजिन्यात १६ कोट रुपये होते. या शिवाय त्या वेळीं संस्थानचे खाजगी व दौलत असे दोन फार मोठे भेद मानण्यांत येत. खाजगी म्हणजे राजपत्‍नीच्या नांवानें व्यक्तिविषयक असलेली देणगी अथवा उत्पन्न,व दौलत म्हणजे सरकारी उत्पन्न. यापैकीं खाजगीवर पेशव्यांचा कांहीं हक्क नसे; दौलतीच्या मुलुखाचें मात्र अर्धें उत्पन्न पेशव्यांस द्यावें लागे. अहल्याबाईच्या हातीं इतका पैसा आला असतांहि तिनें त्याचा दुरुपयोग मुळींच केला नाहीं. दौलतीचा पैसा तिनें प्रजासंरक्षणार्थ खर्च केला. इतकेंच नव्हें तर प्रसंग पडल्यास खाजगीचा पैसाहि दौलतीच्या कामी ती उपयोगांत आणी. अशा रीतीनें दौलत व खाजगी यांतील पैसा सरकारी कामांत खर्च करून जी शिल्लक उरली तिचा तिनें एकंदर हिंदुस्थानांत लोकोपयोगी सार्वजनिक कामें करून ठेवण्यांत व्यय केला. होळकरांच्या खासगी खजिन्याचा तिच्या हातीं जो पैसा आला तो सर्व धर्मकार्यांत खर्च करण्याकरितां म्हणून तिनें एकीकडे काढून ठेवला होता. तिनें लोकांच्या सोयीसाठीं जागोजाग अन्नछत्रें, धर्मशाळा, व विहिरी, रस्ते व घाट बांधले आहेत. तिनें काशीविश्वेश्वराचें मंदिर व गया येथील विष्णुपदाचें मंदिर पुन: नवें बांधलें आणि कलकत्त्यापासून काशीपावेतों मोठा थोरला रस्ता बांधळा. [हरप्रसाद शास्त्रीची ''स्कूल हिस्टरी ऑफ इंडिया] '' काशीविश्वेश्वराप्रमाणेंच सोरटी सोमनाथाचें देवालयहि तिनें नूतन बांधवून त्यांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. (महेश्वर दरबारचीं बातमीपत्रें भाग २, पानें ८६-८७).

याप्रमाणें आसेतुहिमाचल तिनें असलीं पवित्र कार्यें करून आपलें नाव अजरामर करून ठेविलें. तिनें कोणतें काम कोठें करून ठेविलें याची माहिती तिच्या संस्थानांत सापडत नाहीं, तर ती अन्य ठिकाणीं एके जागीं कशीं सांपडणार? कारण तिनें कित्येक गुप्त दानें केलीं आहेत, तर कित्येक ठिकाणीं जीं देवळें, अन्नछत्रें इत्यादि नित्य खर्चाचीं लोकोपयोगी कामें केलीं आहेत त्याच्या दानधर्माचा संबंध त्याच गांवीं घरें बांधून किंवा जमिनी खरेदी करून त्याच्या उत्पन्नाशीं लावून दिला. यामुळें त्याची दाद संस्थानापर्यंत येतच नाहीं.

अहल्याबाईच्या शेवटच्या दिवसांत तिजवर जीं एकामागून एक अनेक कौटुंबिक संकटें गुदरलीं त्याची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. तिचे दोघे भाऊ तिच्या उतारपणींच वारले. तिच्या मुलीचा मुलगा नथ्याबा-ज्यास आपल्या मागून होळकरांची गादी द्यावयाची असा तिचा विचार होता तो – इ. स. १७९० त आपल्या वयाच्या तेविसाव्या वर्षी क्षयानें वारला. त्याच्या मागून त्याच्या १८ व १० वर्षांच्या दोन स्त्रियांनीं सहगमन केलें. नथ्याबाचा दहनविधि करून मंडळी परत येतात तोंच काशीराव होळकरांची स्त्री म्हणजे तुकोजी होळकरांची सून आनंदीबाई म्हणून होती तिचें देहावसान झालें. पुढें एक वर्षानें तिचा जावई यशवंतराव फणसे वाखा होऊन चार तासांत वारला. त्याच्या मागून अहल्याबाई नको नको म्हणत असताहि तिची मुलगी मुक्ताबाई सती गेली. यावेळीं अहल्याबाईच्या वयाची पासष्ट वर्षें उलटलीं होतीं. तरी हे सर्व आघात खंबीरपणानें व शांततेनें सहन करून आपला कारभार पाहूं लागली. अशा स्थितींत सुद्धां जेव्हा दुसर्‍या वर्षी शिंद्याचा सरदार गोपाळराव यानें तुकोजीची कुरापत काढून त्यावर आपली फौज घातल्यामुळें तुकोजीनें' येथें असा प्रसंग गुदरला ! इत:पर खर्चाची व फौजेची मदत झाली पाहिजे' अशीं महेश्वरास पत्रें पाठविलीं, तेव्हांचें तिचें वर्तन एखाद्या तरुण वीरासहि लाजविण्यासारखें होतें. तिनें पांच लक्ष रुपयांच्या हुंड्या सुभेदारांकडे पाठवून पत्र लिहिलें कीं 'हिंमत न सोडतां हरामखोराचें पारिपत्य करावें. खर्चाचा व फौजेचा श्वेत (सेतु) बांधते. म्हातारपणीं जरब खाल्ली असल्यास लिहून पाठवावें. मी डेरे दाखल होतें.' असो. खडर्याची लढाई झाल्यावर अहल्याबाईनें फार दिवस काढले नाहींत. ती शके १७१७ च्या श्रावण वद्य १४ स परलोकवासी झाली.

अहल्याबाई दिसण्यांत फार सुंदर नव्हती तरी तिचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसे. तिचीं वस्त्रें पांढरीं शुभ्र पण साधी असत. तिची वृत्ति शांत असे, परंतु तिला असत्याचा तिटकारा असल्यामुळें जेव्हां कोणी तिच्याशीं तसें आचरण करी तेव्हां तिला इतका कोप चढे कीं तिच्या कृपेतील मंडळीहि तिजपुढें जाण्यास धजत नसत. तिचीं धार्मिक व्रतें व उपवास खडतर असून तीं तिनें अखेरपावेतों चालूं ठेविलीं होतीं. तिच्या कारकीर्दींत इंदूर संस्थानांतील प्रजेचा उत्कर्ष झाला. त्यावेळीं ह्या संस्थानाचे ६ भाग व ८७ तालुके होते. तिच्या कारकीर्दींच्या उत्तरार्धांतील (इ. स. १७६६-९५) इंदूर संस्थानाच्या उत्पन्नाची सरासरी काढली तर ती १,६०,३०,७३४. येतें. मालकम साहेबानें अहल्याबाईची दिनचर्या मोठ्या काळजीनें व कौतुकानें लिहून ठेविली असून तींत तो म्हणतो कीं, ''अहल्याबाई ही सूर्योदयापूर्वीं घटका दीड घटका उठून स्नान करी व नंतर पूजाअर्चा करी. यानंतर ती नियमित कालपर्यंत पुराण श्रवणास बसे. नंतर ती दानें देऊन आपणाससमक्ष ब्राह्मणास भोजनें घालीं. हें होत आहे न होत आहे तोंच तिचें ताट वाढून येई. तिच्या भोजनात सारे शाकभज्यांचे पदार्थ असत. ......भोजन आटोपल्यावर पुन: कांहीं वेळ परमेश्वरस्तव करून थोडा वेळ वामकुक्षी करी. नंतर ती पोषाख करून सरकारी कामकाज करावयास दरबारात जात असे. ...... ती दरबारात जाई तेव्हा बहुधा दोन प्रहर होत. तेथें ती सूर्यास्तापर्यंत म्हणजे सुमारें सहासात वाजेपर्यंत बसे. यानंतर दोन तीन तास पूजाअर्चा व फराळ वगैरे कृत्यात जात. मग ती नऊ वाजावयाच्या सुमारास सरकारी काम पुन्हा पाहूं लागे. तें ती अकरा वाजेपर्यंत पाही व त्यानंतर निजावयास जात असें.''

[संदर्भ ग्रंथ.- याच लेखात पहा.]

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .