विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहार(१) - (राजपुताना.) उदेपूर संस्थानांतील एक खेडे. हे शहरापासून दोन मैलावर उ. अ. २४°० ३५' व पू. रे. ७३० °४४' वर आहे. इ. स. १९०१ मध्यें लोकवस्ती ९८२. येथें एक मिशनरी शाळा आहे व चितोड सोडल्यानंतरच्या काळांत जे मेवाडचे राणे होऊन गेले त्याचीं स्मारकें या गांवीं आहेत. त्यांना महासती असें नाव आहे. त्यांत दुसरा अमरसिंग राणा याचें स्मारक विशेष प्रेक्षणीय आहे. परंतु बहुतेक सर्वच उत्तम कारागिरीचे नमुने म्हणतां येतील.
विक्रमादित्याच्या पूर्वजानीं वसविलेल्या तांबवती नगरीच्या ठिकाणीं असादित्यानें दुसरें शहर निर्माण केलें. त्यावरच बांधलेल्या एका शहराचे अवशेष पुर्वेला दृग्गोचर होतात. पहिल्यानें यास आनंदपूर म्हणत. त्यासच पुढें अद्दार हें नांव प्राप्त झालें. सध्यांच्या नाश पावून अवशिष्ट राहिलेल्या भागास धुलकोट म्हणतात. येथें १० व्या शतकांतील चार कोरींव लेख व कांहीं नाणीं सांपडलीं. कांहीं जैन मंदिरें व एक हिंदु देवालय यांचे अवशेष अजून दिसतात. (इं. गॅ.)
(२)- (संयुक्तप्रांत) बुलंदशहर जिल्हा. अनुपशहर तहशिलींत असलेलें एक शहर. उ. अ. २८० °२८' व पू. रे. ७८°० १५'. लो. सं. (स. १९०१) २३८२. अहार हा शब्द अहि आणि हार या दोन शब्दांपासून बनला आहे. अहि म्हणजे सर्प व हार म्हणजे सत्र. जनमेजय राजानें आपलें सर्पसत्र या ठिकाणीं केलें. अशी प्रजलित कल्पना आहे व त्यावरून असें नांव पडलें. हास्तिनापूर वाहून गेल्यावर सोमवंशीय राजांचीं हे शहर राजधानी झालें. दुसरा एक प्रचलित समज असा आहे कीं, कृष्णाची भार्या रुक्मिणी येथें राहत असे व ज्या देवळांतून कृष्णानें तिला हरण करून नेली तें देऊळ अजून दाखवितात. हें ठिकाण खरोखरच फार पुरातन आहे. अकबरच्या कालीं अहार एका परगण्याचें मुख्य ठिकाण होतें. हें शहर गंगेच्या तीरीं उंचावर बसलें असून या ठिकाणीं बरींच देवळें आहेत. जून महिन्यांत येथें स्नानाकरितां मोठी यात्रा जमते. (इ. गॅ.)