विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहांळींव - या वनस्पतीस लाटिन मध्यें लेपिडियम साटिव्हम, इंग्रजीत कॉमन केस, संस्कृतांत अहालिंब, गुजराथी भाषेंत अशेळीयो. हिंदींत हालो, मराठींत ''हालीव'' अथवा अहांळीव हीं प्रचलित नांवें आहेत. त्याचें बीं तपकिरी रंगाचें, मोहोरी एवढें पण अणकुचीदार लांबट असतें. दक्षिण महाराष्ट्रांत व गुजराथेंत अहांळींव कोरडवाहू अगर पाणथरी शेतांत बियाच्या पिकाकरितां पेरितात. अहांळिवाचें रोपटें कोंवळें असतां त्याची भाजी करितात. ती भाजी अंगांत उष्णता आणणारी आहे असें म्हणतात.
साहेब लोकांत मस्टर्ड (मोहरी) व केस (अहाळींव) ह्यांची कोंवळीं रोपें उपटून स्वच्छ धुवून बारीक चिरून शिरका वगैरे पदार्थ घालून हिरवीच कोशिंबीर करून खातात. अगर कोथिंबिरीप्रमाणें दुसर्या पदार्थास स्वाद आणण्याकरितां घालतात. ह्या दोन वस्तू पेरण्यास कोठेंतरी (कुंडींत, टोपलींत अगर बागेंत) जागां असल्यास गृहकृत्यांत दक्ष व हौशी स्त्रिया, आपल्याकडील स्त्रिया जशा मिरच्या, कोथिंबीर करण्यास परिश्रम घेतात त्याप्रमाणें, जरूर पेरतात. कारण त्या ताज्या उपटून वापरण्यांत त्यांचा स्वाद विशेष असतो.
खुरपण्याच्या अणीनें ४-६ बोटांवर रेघा पाडून खतावलेल्या मातींत रांगोळी प्रमाणें चिमटीनें बीं पेरावें व हातानें बीं झाकून पाणी घालावें. ४-५ दिवसांत बीं उगवून वर येतें. तें उगवल्यावर जसें लागेल तसें उपटून वापरतात.
अहांळिवाची लागवड महीनदीकाठीं कोरडवाहून जमीनींत करितात. जेथें अफू होते तेथें याची लागवड करितात. खेडा जिल्ह्यांत याची लागवड होते. हें पीक गोराडू जमिनींत चांगलें येतें. याचें बीं अफूच्या वाफ्याच्या वरंब्यावर पेरितात. खेडा जिल्ह्यांत याचें बीं मोहरींत टाकितात. या पिकासाठीं जमीन तयार करून तींत एकरीं शेणखताच्या सुमारें दहा गाड्या देतात. आक्टोबर महिन्यांत दोन तीन पौंड बीं वाफ्यांत टाकितात. याला एक खुरपणी देऊन तें पातळ करितात. पेरल्याबरोबर पाणी देतात. दुसरें पाणी चार दिवसांनीं देतात. पुढें प्रत्येक वेळीं दहाबारा दिवसांच्या अंतरानें आठ वेळ पाणी देतात. पीक जानेवारींत तयार होतें, तें कापून आणून ठोकून दाणे तयार करितात. पीक स्वतंत्र असल्यास एकरीं ५००-६०० पौंड उत्पन्न होत. दरमणी ३।४ रुपये किंमत पडते (१ मण ४०= पौंड).
हें बीं खानदेशांत पाटाच्या किंवा नदीच्या कांठीं पेरतात हें उष्ण, कडू व पुष्टिदायक आहे व त्वग्रोग, वायू व गुल्म यांचा नाश करणारें आहे. अशी समज आहे.
उ प यो ग.- अहांळीवाची खीर करतात. प्रथम दूध उकळत ठेऊन त्यांत अहांळीव टाकावें व तें चांगलें मऊ होऊन खिरीसारखें आटले म्हणजे त्यांत गूळ किंवा साखर घालावी. ही खीर वातनाशक असून कमरेस बळकटी देऊन धातुपुष्टी करते. अहांळीवाचे लाडू अगर खीर बाळंतिणीस दिल्यास शक्ति येऊन दूध अधिक वाढतें असें म्हणतात. [ ले. ग. के. केळकर. ]