विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहिच्छत्र - (अहिक्षत्र). अर्वाचीन रामनगर. ह्या प्रसिद्ध प्राचीन नगराचें नांव अद्यापि कायम आहे. तथापि हल्ली लोकांनीं हें शहर सोडिलें आहे. पांडवांच्या वेळीं ही उत्तरपंचाल देशाची राजधानी होती. अहिक्षेत्र किंवा अहिच्छत्र अशा दोन प्रकारांनीं हें नांव लिहितात. येथील मूळचा आदिराजा याजवर सर्पानें आपल्या फणाचें छत्र केलें होतें अशी दंतकथा आहे. येथें एक जुना किल्ला आहे. तो आदिराजानें बांधिला असें म्हणतात. भारतांत अहिच्छत्र असें नांव आढळतें (५.१९). भारतांत सांगितलें आहे कीं, पांचाल देश हिमालयापासून चर्मण्वती (हल्लींच्या चंबळा) नदीपर्यंत पसरला होता. उत्तर पंचाल (हल्लींचें रोहिलखंड) याची राजधानी अहिच्छत्रा होती व दक्षिण पंचाल (अंतर्वेदी) ची राजधानी कांपिल्य (हल्लींची कांपिल) होती. कांपिल ही बुदाऊन आणि फरुकाबाद यांच्यामध्यें गंगेच्या जुन्या पात्रावर आहे. भारती युद्धापूर्वीं पांचाल देशचा राजा द्रुपद ह्यास द्रोणानें जिंकून उत्तरपंचाल आपण ठेवून दक्षिणपंचाल द्रुपदास दिला (म. भा. १.१३८).
आदिराजा आणि सर्प यांची दंतकथा आहे. तशाच प्रकारची एक कथा बुद्ध ग्रंथांत आहे; परंतु बौद्धांनीं ती आदिराजाच्या कथेवरून रचिली असावी. कारण आदिराजाची कथा प्राचीन आहे. अहिच्छत्र किंवा अहिक्षेत्र हें नांव अनेक शहरांनां आहे.
टॉलेमी ज्याला अदिसद्र म्हणतो तें हेंच नगर असावें. अहिच्छत्र शहराचा घेर ३ मैल आहे व त्याच्याभोंवतीं नैसर्गिक तट आहे, असें ह्युएनत्संग लिहितो. हें सर्वांशी जमतें. याच्या उत्तरेस व पूर्वेस एक ओढा आहे आणि पश्चिम व दक्षिण बाजूस रामगंगा आणि घोग्रा यांच्यामध्यें किल्ला आहे. ह्युएनत्संगच्या वेळीं येथें १२ विहार, चार, पाचं स्तूप आणि वैदिक धर्माचीं ९ देवालयें होतीं. हल्लीं किल्ला मोडकळीस आला आहे; आंत जिकडे तिकडे जंगल आहे, तरी ३२ बुरूज अद्यापि दुरुस्त आहेत.
ह्युएनत्संगानें या राज्याचा घेर ४०० मैल सांगितला आहे. यावरून त्यांत रोहिलखंडाचा पूर्व भागहि येत असावा. [ दीक्षित-भारतवर्षीय भूवर्णन, विल्सन-विष्णुपुराण २.१६१; एसेज पु. १ पा. ४८,२९१ वगैरे महाभारत. डौसन-हिंदु क्लासिकल डिक्शनरी]