विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहिरी , ज मी न दा री-(मध्यप्रांत.) चांदा जिल्ह्यांत ही जमीनदारी सर्वांत मोठी आहे. एकंदर क्षेत्रफळ २५ चौ. मैल. या जमीनदारीची गडचिरोळी तहशिलींत आणखी ७७ खेडीं असून त्यांचें क्षेत्रफळ ५५ चौरस मैल आहे, व ती मालगुजारी हक्काची आहेत. या जमीनदारीची उत्तरेस झरापाप्रा, पोटेगांव, खूटगांव आणि पै-मुरंदा जमीनदारी, पूर्वेस बस्तर संस्थान, दक्षिणेस शिरोंचा तहशील, पश्चिमेस प्राणहिता नदी, दिनानाला आणि गडचिरोळी तहशिलीचा कांही भाग आहे. हींतून वैनगंगा, प्राणहिता, आणि इंद्रावती या नद्या वाहतात. बहुतेक सर्व जंगल आहे.
इतिहास :- हल्लीच्या जमीनदाराच्या मानसु बापु नांवाच्या पूर्वजास चांदाच्या एका गोंड राजानें सुमारें सहा शतकापूर्वीं ही जमीनदारी बक्षिस दिली. परंतु ही केव्हां मिळाली त्याची तारीख ठरविण्याइतका कागदी पुरावा नाहीं. कोकशा नांवांचा जमीनदार इ. स. १७०३ पासून १७६९ पर्यंत होऊन गेला त्यावेळेपासून खात्रीलायक माहिती या जमीनदारीबद्दल मिळूं शकते. हा त्यावेळच्या चांद्याच्या शेवटच्या गोंड राजाच्या वतीनें मराठ्यांच्या विरुद्ध लढला होता. हा रामशहाचा (इ. स. १६७२-१७३५) नातेवाईक असून त्यास साधो आणि मूला बुरिया नांवाच्या बंडखोरांचा मोड करण्याकरितां म्हणून ही जमीनदारी इनाम मिळाली होती. या बंडखोरांनीं सूरजगड किल्ला आपल्या ताब्यांत घेतला होता. कांहीं वर्षांनीं यास जय प्राप्त झाला. यामागून त्याचा वंशज भीमराव अथवा व्यंकटराव (खरें नांव कोणतें याविषयीं संशय आहे) यास ही जमीनदारी मिळाली (इ. स. १७७० ते १८१८) यानें इ. स. १७७३ सालच्या मराठ्यांच्या आपआपसांतील भांडणांत मुधोणीचा पक्ष घेतला होता. या वेळीं हा व याचा भाऊ मोहनशा यांच्याकडे चांद्याचें लष्करी आधिपत्य होतें व याचा तिसरा भाऊ विश्वासराव याच्या ताब्यांत माणिकगड किल्ला होता. या तिघांनीं पुण्याकडून आलेल्या एका लष्करी तुकडीचा पराभव केला होता. या तुकडीनें मुधोजीचा कबिला पकडून अटकेंत ठेविला होता. या तिघा भावांनीं त्याची सुटका केली असें मेजर लुसी स्मिथ म्हणतो. भीमरावानें आपली कीर्ति मागें ठेविली आहे. मुलुखांत चांगल्या रीतीनें यानें बंदोबस्त ठेवला होता व आसपासचे लहान सहान जमीनदार यानें आपल्या निशाणाखालीं आणले होते. याच्याच अमदानींत ही जमीनदारी इतकी मोठी वाढली आहे. याच्यामागून दर्याबाईनें सहा महिनेच या जमीनदारीचा उपभोग घेतला व नंतर भुजंगरावाच्या ताब्यांत ही जमीनदारी आली. ही वेळ मोठी आणीबाणीची होती. याचवेळीं जेंकिन्सेंन आप्पासाहेबास पकडलें होते व यावेळीं भुजंगरावानें आपल्या घराण्याच्या लौकिकाप्रमाणें आपल्या राज्यकर्त्यांची बाजू राखली व चांदा शहराच्या रक्षणार्थ झालेल्या लढाईंत यानें ब्रिटिशांविरूद्ध लढाई केली. पुढें चांदा शहराची लूट झाल्यावर भुजंगरावाकडेच ही जमीनदारी इ. स. १८४७ पर्यंत राहिली त्यानंतर त्याचा मुलगा व्यंकटेशराव याजकडे आली परंतु तो इ. स. १८५१ सालीं मरण पावला. यानंतर भीमरावची विधवा स्त्री लक्ष्मीबाई हिच्याकडे ही इस्टेट आली. पुढें ती इ. स. १८६१ मध्यें मरण पावली. इ. स. १८५७ च्या बंडांत मोलपल्लीच्या जमीनदारानें राजपूरच्या परगण्यांत लुटालुट सुरू केली व पुढें थोड्याच वेळानें घोट-अरपल्लीचा जमीनदार व्यंकटराव त्यास येऊन मिळाला व यांनीं उघड ब्रिटिशराजाविरुद्ध बंड उभारलें. यावेळीं त्यांनीं प्राणहिता नदीवरील चिंचगोडी येथील तारखात्यापैकीं गारटियंड आणि हॉल यांस ठार मारिलें. या वेळीं या लक्ष्मीबाईंच्या सहाय्यानेंच बाबुरावास पकडण्यांस आलें व या तिच्या कामगिरीबद्दल घोट अरपल्ली जमीनदारींतील ६७ खेडीं हिच्या स्वाधीन करण्यांत आली. ती अद्याप याच जमीनदारींत चालत आहेत. बंड संपल्यावर व जिकडे तिकडे शांतता झाल्यानंतर या जमीनदारींत विशेष लिहिण्यासारखें कांहीं घडलें नाहीं. लक्ष्मीबाईच्या नंतर झालेले जमीनदार मेंगराव (इ. स. १८६१-१८६६); सावित्रीबाई (इ. स. १८६६-१८७१) धर्मराव (इ. स. १८७१ ते १८९३). या जमिनदारींत दत्तक फार वेळ झाले आहेत. इ. स. १८९३ सालापासून ही जमिनदारीं भुजंगराव नांवाच्या जमिनदाराकडे आली आहे. हा जमिनदार वाईट चालीचा असल्यामुळें इस्टेटीस कर्ज होत गेलें व इ. स. १९०२ सालीं जमीनदार आपली जमिनदार चालविण्यास नालायक आहे असें सरकारनें ठरविलें व इस्टेट कोर्ट ऑफ वार्डसच्या ताब्यांत दिली. या वेळीं इस्टेटीस सुमारें एक लाख कर्ज झालें होतें. यावेळीं जमीनदारास कोणी चिथावल्यावरून त्यानें लहानसें बंडच उभारलें. परंतु त्याचा ताबडतोब मोड करून भुजंगरावास चांद्यास आणून ठेवलें व ज्यांचें त्यांत अंग होतें त्यांनां इस्टेटींतून काढून टाकल्यावर जमीनदारास पुन्हा अहिरीस जाण्यास परवानगी दिली.
का र भा र- या जमिनदारींत एकंदर ३८० खेडीं आहेत. बहुतेक खेड्यांची वहिवाट जमिनदाराकडूनच होते. परंतु कांहींची ठेकेदारांकडून होते. जरवंदी आरि मोलंपल्ली तालुके या दुय्यम जमीनदार्या आहेत. जरवंदींत १७ खेडीं असून अहिरीच्या जमिनदारांनीं इ. स. १८५८ मध्यें जागोराव गोंड यास कांहीं लग्नसंबंधाच्या ठरावांत वार्षिक १०० रुपये कर ठेऊन वंशपरंपरेनें दिली. मोलंपल्ली तालुका हा बंडखोर बाबुरावाच्या जमिनदारीचा भाग असून तो लक्ष्मीबाईनें भोलापट्टनमच्या जमीनदाराला १०१ रुपये टाकोळी ठरवून सर्व हक्कासहित दिला. हल्लीं या तालुक्यांत २३ खेडीं असून टाकोळी १७२ रु. आहे. कोर्ट आफ वार्डसनें इस्टेट ताब्यांत घेण्यापूर्वी जीं खेडीं जमिनदाराच्या ताब्यांत होतीं असें समजलें जात असें त्या खेड्यांची वहिवाट भूमिया करीत असत. या लोकांचें वजन फार असल्यामुळें बहुतेक उत्पन्न ते स्वत:च घेत असत. कुळें देखील यांच्यावर सर्वतोपरी अवलंबून असतात. ज्यावेळीं पाहणी केली त्यावेळीं भूमियास काढून टाकले असतांना जी खेडीं पूर्वीं चांगलीं भरभराटींत होतीं तीं ओसाड पडलीं असें कांहीं ठिकाणीं आढळून आलें. लोकसंख्या (१९११) ३७४२१ होती. येथील जमीन चांगली असून पाऊसहि वेळेवर पडत असल्यामुळें दुष्काळ फारसा पडत नाहीं. येथें राहणारे लोक राजगोंड, मारिया, कोया, तेली, मरार वगैरे जातींचे आहेत.
पि कें :- भात (मुख्यपीक), ऊस, ज्वारी, मूग, उडीद, कुळीथ वगैरे. १९०६-७ सालीं लागवडी खालील क्षेत्रफळ ५७९५८ एकर होतें व सारा १३६०० होता.