विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहेरिया - (संस्कृत अखेटिक शिकारी) उत्तर हिंदुस्थानांत आढळणारी, शिकारी, पारधी व चोरटे यांची जात. यांची संख्या जवळ जवळ ३५,४७७ आहे. यांपैकीं पुष्कळसे पंजाब व संयुक्तप्रांत यांत राहातात. हे द्राविड वंशांतील असावे असें दिसतें. हे वन्यधर्मीं असल्यानें, अभिजात हिंदु वर्गापासून भिन्न अशा देवता यांच्यांत आहेत. अभिजात विचारांचे असे कांहीं अहेरिया देवी उपासक आहेत. पण वास्तविक संयुक्तप्रांतात त्यांची जातिविशिष्ट देवता मेखासुर (सं. मेष + असुर= मेषासुर) असून तिच्या उत्पत्तीविषयीं त्यांनां कांहीं माहिती नाहीं. कदाचित ती प्राचीन प्राणिपूजासंप्रदाय दर्शवीत असावी. गूगा किंवा जाहीर पीर, या प्रसिद्ध साधूची मुसुलमान पुरोहिताच्या द्वारें पूजा करण्यांत येते (क्रूक, पॉप्युलर रिलिजन,;. २११ पासून पुढें). यांचा दुसरा मुसुलमान साधु म्हणजे मुरादाबाद जिल्ह्यांतील अमरोहाचा मियान किंवा मीरान साहेब होय, (शेआट्रायर, दबिस्तान ३. २३५). जखिया या देवतेचीहि हे पूजा करतात. जखिया हा देवत्वाप्रत पोंचलेला एक झाडूवाला होता. त्याला डुक्कर बली देण्यांत येतें व त्या प्रसंगीचा झाडूवाला पुरोहित त्याचें थोडेंसें रक्त मुलांच्या कपाळाला फांसतो; त्यामुळें भुताखेताची बाधा होत नाहीं अशी समजूत आहे. बराई व चामर या दोन लहान ग्राम देवतांनाहि पूजितात. चामराला गव्हाचा रोट अर्पण करण्यांत येतो; विशेष प्रसंगीं मेषबलिदान होतें, व त्याचें मांस देवासमोर लगेच भक्षण करण्यांत येतें. हे लोक प्रसिद्ध रामायणकार वाल्मीकि ॠषि यांस आद्यगुरुस्थानीं मानतात ही गोष्ट जरा चमत्कारिक दिसते. देवतांनां बलि विशिष्ट कुलांतील मनुष्यानेंच द्यावा लागतो; या कृत्याला नेहेमींचा पुरोहित चालत नाहीं. कांहीं विधींतून बळीचा वध करण्यांत येत नाहीं तर त्याच्या कानांतून रक्त काढून सोडून देण्यांत येतें. मृताच्या भुताची या लोकांनां फार भीति वाटते; म्हणून प्रेताला अग्नि दिल्यावर घरीं जातांना ते चितेकडे दगड फेंकतात, हेतु हा कीं, मृताच्या भुतानें आपल्याबरोबर येंऊ नये.
पं जा बां ती ल :- लो. सं (१९११) १९,५०५ यांची हिंसार, गुरगांव, कर्नल, व अंबाला हे जिल्हे आणि पतियाळा व झिंद या संस्थानांत मुख्यत्वें करून वस्ती आढळते. पतियाळा संस्थानांत कांही थोडे अहेरी लोक शीख व महंमदी संप्रदायी आहेत. बाकी सर्व हिंदू आहेत. ते गवताचा व्यापार व मजूरी करितात. हंगामांत पिकाच्या कापणीकरितां टोळ्या करून फिरतात. दिसण्यांत व शरीरानें ते बाबरियासारखे असून गांवाबाहेर राहतात.
(संदर्भग्रंथ-कूक-ट्राईब्स अँड कास्टस ऑफ दि नॉर्थ वेस्टर्न प्राव्हिन्सेस अँड औध; पाप्युलर रिलिजन अँड फोक लोअर ऑफ नार्दर्न इंडिया. ए. रि. ए. सेन्सस रिपोर्ट-पंजाब. वेज-ए-ग्लॉसरी ऑफ दि ट्राईब्स अँड कास्टस ऑफ दि पंजाब अँड नॉर्थ वेस्ट फॉटियर प्राव्हिन्स)