विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अळंबें - ही एक छत्रीच्या आकारांत उगवणारी वनस्पति आहे. ती उकिरडयावर सडलेल्या पदार्थांवर, वाळलेल्या शेणावर आणि क्वचित् चांगल्या जमिनीवरहि उगवते. याचीं निरनिराळ्या भाषेंतील नांवें-लॅ. फंगी. इं. मश्रूम. सं. भूछत्र. गुज. फुग्यू. हिंदी-छतोनाछता, सांवकी छत्री. बंगाली.- कोडक छता, व्यांगेर छाता. कानडी-आळवि. नाई छत्तरिगे हीं होत. अळंबें दोन प्रकारचें असतें. विषारी व गोडें. विषारी अळंबें दोन प्रकारचें असते. विषारी व गोंडें. विषारी अळंबें खाल्लें असतां अम्मल चढतो, पोट फुगतें, व वांति होऊन मन भ्रमिष्ट होतें. अळंब्याच्या ८ जाती आहेत. चुड्ये, चितळें, गवतें, कुबळें, कुरटी, तेलंगी, भुयफोड आणि मोग्रळे. चुड्ये हातभर उंच वाढतें व त्याची छत्री लहान असते. गवतें फार बारीक असतें. कुरटी अगदीं लहान असतें. तेलंगी हें सर्वांत उत्कृष्ट समजलें जातें. याची छत्री वीत सव्वावीत व्यासाची असते. भुयफोड हें वाटोळें असून फुगीर असतें. त्याचें छत्र होत नाहीं. मोग्राळ्याचे मोगर्यासारखे किंचित् टोंकदार कळे असतात.
अळंब्याचें बीं अति सूक्ष्म असून त्याचा कशानेंच नाश होत नाहीं. शिजवलें असतां शिजत नाहीं. कुजत नाहीं. जनावरांच्या पोटांतून हें बीं तसेंच बाहेर पडतें. ह्यामुळें शेणावर व उकिरड्यावर हीं झाडें फार उगवतात.
अळंब्याचे कळे औषधाकरितां सुकवून ठेवितात. देवी व गोंवर पोटांत पडूं नये म्हणून हे कळे ऊन पाण्यांत वाटून देतात, तसेंच मूळव्याधीवर व दुसर्या रोगावर याचा उपयोग होतो असें म्हणतात.
अळंब्याची भाजी व कोशिंबीर करून शुद्र लोक खातात. (पदे. मोडक-पदार्थ वर्णन).