विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अळसुंदे - चवळीच्या जातींपैकीं एक वेल. लँटिनमध्यें ज्याला विग्ना कटजंग म्हणतात त्या वर्गांतील हा आहे. ही एक मोठ्या, लांबट शेंगांची व मोठ्या दाण्याची चवळीची जात असते. वेलास दुसर्या झाडाचा आधार लागतो. चवळीप्रमाणें जमिनीवरच हे वेल वाढत नाहींत. आधार न दिल्यास तितके उंच होत नाहींत. अळसुंद्याचें पीक बागाईत व ओल राहणार्या शेतांत बिन पाण्यावरहि करतात. पावसाळ्यांत बीं पेरतात व हिवाळ्यांत व उन्हाळयांत शेंगा तयार होतात. कोंवळ्या शेंगांची भाजी व जून शेंगांतील सोलाण्यांची व वाळलेले दाणे भिजवून फुगले म्हणजे त्यांची उसळ करतात. अळसुंद्याचें बीं चवळीच्या दीड दोनपट मोठें लांबट व तपकिरी रंगाचें असतें. कोंकणांत व बेळगांवाकडे अळसुंदे पिकतात. रत्नागिरी जिल्ह्यांत त्यास वालीच्या शेंगा असेंहि म्हणतात.