विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अळू (तेरें) - यास इंग्रजींत, तेरो, एडोस, स्क्रॅच कोको, टॅनिआ, इजिप्शियन अॅरम, हीं नांवे असून अरबी, काचू, काच्ची, पंजाब-राब, मुंबई:-अळूं, तेरें; तेलगू:-शामापंथा. इत्यादि निरनिराळीं नांवें आहेत.
उ त्प त्ति स्था न :-हिंदुस्थानांतील उष्ण प्रदेशांत व सिलोन प्रांतांतहि हें होतें. याचीं पानें कमळाच्या पानासारखीं असून देंठ लांब असतात. याचा कंद खाण्याच्या उपयोगी पडतो व ह्याच्या पानाचीहि भाजी करून खातात. याची लागवड बंगाल, आसाम, मद्रास, राजपुताना, दक्षिण, हिमालयनजीकचा प्रदेश इत्यादि सर्वं हिंदुस्तानभर आहे.
या झाडाच्या रानटी व लागवड केलेली अशा दोन जाती आहेत. रानटी अळूचे कंद खात नाहींत, फक्त पानें खातात. रानटीं झाडाच्या तीन जाती आढळतात. पहिल्या जातीचीं पानें निळसर, दुसरीचीं पानें भुरकट व तिसरीचीं हिरवीं असतात. हीं रानटी जातींचीं झुडुपें उष्ण प्रदेशांतील दलदलीच्या जागेंत होतात.
लागवड केलेल्या जातींत गुरीकाचु व असुकाचु हे दोन प्रकार असून एकाचीं पानें व देंठ हीं हिरवी, व दुसर्याचीं जांभळ्या रंगावर असतात. परंतु या दोघांचे कंद सारखेच असतात. लागवड करण्याच्या वेळीं, त्यांचे कांदे लावतात. गुरीकाचूचे कांदे डिसेंबरमध्यें व असुकाचूचे कांदे फेब्रुवारीमध्यें तयार होतात.
ला ग व ड :- ''हीं झाडें वालुकायु्क्त मातींत चांगलीं होतात इतर जमीनींत तीं चांगलीं होत नाहींत. याची लागवड गोराडूच्या कंदाप्रमाणेंच करितात. लागवड करताना देंठासकट कंदाचे डोळे जमिनींत पुरतात. कापून ठेविलेले कंदाचे डोळे, जमिनींत पुरण्यापूर्वी काहीं दिवस राहिले तरी ते खराब होत नाहींत. त्याचप्रमाणें वाढलेले कंद पक्क होऊन जमिनींत पुष्कळ दिवस राहिले तरी वाईट होत नाहींत.
मुंबई प्रांतांत याची लागवड फारशी नाहीं. परसांत मोरीचें पाणी जमतें अशा ठिकाणीं याचे कंद लावितात. गुजराथेंत विहिरीजवळ याचे वाफे असतात. ते १२ फूट लांब ते ६ फूट रुंद या प्रमाणाचे करून त्या प्रत्येकांत सुमारें ४० झाडें लावितात. वाफ्यांनां भरपूर खत व पाणी द्यावें लागतें व त्यामधील गवतहि वरचेवर काढावें लागतें. कंद सुमारें १२ इंचाच्या अंतरानें लाविले जातात. सुमारें १० महिन्यांनीं हे कंद तयार होतात. कानपुरामध्यें एका एकरांत सुमारें ५० मण व कोइमतूरमध्यें ६२५० पौंड कांदे तयार होतात.
उ प यो ग.- याच्या कांद्यांत पुष्कळ पिष्टसत्व (स्टार्च) असतें. कांदे हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. त्रावणकोरमध्यें याचे निरनिराळे खाण्याचे प्रकार करतात. न्यू गिनीमध्यें या कांद्यांचें पीठ करून त्याचीं बिस्किटें करितात. हे कांदे बहुधा १ रुपयास १॥ मण या भावानें मिळतात.
कांद्यांचे देंठ व पानें यांचें भाजी, आमटी, रायतें इत्यादि निरनिराळे प्रकार होतात. पिकलेलीं पानें व देंठहि गुरांना चारतात, व त्यापासून गुरें चांगलीं पुष्ट होतात.
रा सा य नि क गु ण ध र्म. -या झाडांत एक तिखट व कडवट पदार्थ असतो. झाडाचा रस अंबट असतो व त्याचा उपयोग रक्तस्तंभंक म्हणून करितात. १८८८ मध्यें पेडलर वार्डननीं या झाडावर प्रयोग करून या विषारी तिखट पदार्थांचा शोध लाविला, व हा विषारी पदार्थ ऑक्सलेट ऑफ लाइम याच्या स्फटिकामुळें त्या झाडांत येतो असें त्यांनीं निश्चित केलें. या विषारी पदार्थांचें वीष, अंबट पदार्थाच्या सान्निध्यानें बाधक होत नाहीं आणि म्हणूनच या झाडाची भाजी करतांना चिंच अवश्य घालतात. नाहीं तर जिभेस खाज सुटते. (वॅट.)