विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अळें - (पुणें जिल्हा) जुन्नरच्या पूर्वेस १६ मैलांवर हा एक लहानसा गांव आहे. हा पूर्वी होळकरांकडे होता. परंतु पुढें तो त्यांनीं ब्रिटिश सरकारच्या हवालीं केला. दर शुक्रवारी येथें आठवड्याचा बाजार भरतो. अळें येथील कोळवाडींत दर वर्षीं चैत्र शुद्ध एकादशीस म्हसोबाची जत्रा भरते. सुमारें हजार दीड हजार लोक जत्रेस येतात. ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर महाराजांनीं वेद बोलविले त्या रेड्यास येथें पुरलें अशी समजूत आहे, येथें त्याची समाधि असून तीवर देऊळ बांधलेलें दाखवितात. सभामंडपाचें काम अर्धेच राहिलें आहे.
इ. स. १८२७ मध्यें कॅप्टन क्लन्सनें असें वर्णन केलें आहे कीं, हा गांव त्यावेळीं होळकरांकडे असून त्यांत ३०० घरें. चार दुकानें, विहिरी व एक मारुतीचें देऊळ होतें. (मुं. गॅ. पु. १८. भाग ३.)